केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घाबरू नये असे आवाहन केले असले तरी स्वाइन फ्लूची भीती हटता हटेना, अशी स्थिती आहे. शिवाय रोज नवनवीन रूग्ण दाखल होण्याची प्रक्रियाही थांबलेली नाही. देशभरातून स्वाइन फ्लूचे रूग्ण सापडत असून आज आतापर्यंतच्या दिवसांत देशभरातून ९६ संशयित रूग्ण सापडले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वाइन फ्लू आता गुजरातकडे वळला आहे. एका अनिवासी दाम्पत्यामध्ये एच १ एन १ विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अहमदाबादच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. हे दाम्पत्य नुकतेच अमेरिकेहून परतले होते. या दोन नव्या रूग्णांमुळे गुजरातमध्ये स्वाइन फ्लूग्रस्तांची संक्या १० वर पोहोचली आहे.
दरम्यान, या रोगाचे मुख्य केंद्र बनलेल्या पुण्यात एका अल्पवयीन मुलीसह आणखी सहा नवे रूग्ण सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांची प्रकृती गंभीर आहे.
चंडिगडमध्ये एका २९ वर्षीय इंजिनयरला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रूग्णालयात दाखल केले आहे. हा रूग्ण मित्राबरोबर कॅनडाला गेला होता. त्याच्या मित्रालाही स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला दिल्लीत एडमिट करण्यात आले. चंडिगडमध्ये आतापर्यंत ४४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.