श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे । कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाली म्हणती त्या ॥१॥ स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत । करोनी माझे मुख निमित्त । वदले श्रीस्वामीराज ॥२॥ आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा । हा ग्रंथ संपूर्ण करावा । भक्तजनांकारणे ॥३॥ संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनी तत्त्वता । गेले स्वस्थानी यतिराज ॥४॥ शके अठराशे पूर्ण । संवत्सर बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ॥५॥ दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥ षट्चक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदोन । आत्मज्योत निघाली पूर्ण । हृदयामधुनी तेधवा ॥७॥ जवळ होते सेवेकरी । त्यांच्या दुःख झाले अंतरी । शोक करिता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥ अक्कलकोटीचे जन समस्त । दुःखे करून आक्रंदन । तो वृतान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥ असो स्वामींच्या लीला । जना सन्मार्ग दाविला । उद्धरिले जडमुढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥ कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी । पालशेत ग्रामामाझारी । जन्म माझा झालासे ॥११॥ श्रेष्ठ चित्तपावन जातीत । उपनाम असे थोरात । बळवंत पार्वतीसुत । नाम माझे विष्णु असे ॥१२॥ तेथेचि बालपण गेले । आता कोपरलीस येणे केले । उपशिक्षक पद मिळाले । विद्यालयी सांप्रत ॥१३॥ वाणी मारवाडी श्रेष्ठ । नाम ज्यांचे शंकरशेट । त्यांसी स्नेह झाला निकट । आश्रयदाते ते माझे ॥१४॥ त्यांची स्वामीचरणी भक्ती । भावार्थे पूजन करिती । धिंवसा उपजली चित्ती । स्वामीचरित्र श्रवणाची ॥१५॥ ते मजला सांगितले । मी स्वामी गुणानुवाद गाइले । हे स्वामी चरित्र लिहिले । अल्प मतीने अत्यल्प ॥१६॥ शब्द सोपे व्यावहारिक भाषा । प्रत्येक अध्याय लहानसा । आबालवृद्धा समजे असा । लघु ग्रंथ रचिला हा ॥१७॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण । कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन । आधार स्वामीचरित्रास कोण । हेचि कथन केलेसे ॥१८॥ श्रीगुरु कर्दळीवनातूनी निघाले । स्वामीरुपे प्रगटले । भुवरी प्रख्यात झाले । हे कथन द्वितीयाध्यायी ॥१९॥ तारावया भक्तजनाला । अक्कलकोटी प्रवेश केला । तेथीचा महिमा वर्णिला । तृतीयाध्यायी निश्चये ॥२०॥ स्वामींचा करावया छळ । आले दोन संन्यासी खल । तेचि वृत्त सकल । चवथ्यामाजी वर्णिले ॥२१॥ मल्हारराव राजा बडोद्यासी । त्याने न्यावया स्वामींसी । पाठविले कारभाऱ्यांसी । पाचव्यांत ते कथा ॥२२॥ यशवंतराव सरदार । त्यासी दाविला चमत्कार । तयांचे वृत्त समग्र । सहाव्यात वर्णिले ॥२३॥ विष्णुबुवा ब्रह्मचारी । त्यांची स्वामीचरणांवरी । भक्ती जडली कोण्याप्रकारी । ते सातव्यांत सांगितले ॥२४॥ शंकर नामे एक गृहस्थ । होता ब्रह्मसमंधे ग्रस्त । त्यासी केले दुःखमुक्त । आठव्यात ते कथा ॥२५॥ खर्चोनिया द्रव्य बहुत । त्यांनी बांधिला सुंदर मठ । ते वर्णन समस्त । नवव्यात केलेसे ॥२६॥ चिदंबर दीक्षितांचे वृत्त । वर्णिले दशमाध्यायात । ते ऐकता पुनीत । श्रोते होती सत्यचि ॥२७॥ अकरावा आणि बारावा । तैसाचि अध्याय तेरावा । बाळाप्पाचा इतिहास बरवा । त्यामाजी निरुपिला ॥२८॥ भक्तिमार्ग निरुपण । संकलित केले वर्णन । तो चवदावा अध्याय पूर्ण । सत्तारक भाविका ॥२९॥ बसाप्पा तेली सद़्भक्त । तो कैसा झाला स्वामीभक्त । त्याची कथा गोड बहुत । पंधराव्यात वर्णिली ॥३०॥ हरीभाऊ मराठे गृहस्थ । कैसे झाले स्वामीभक्त । सोळा सतरा यांत निश्चित । वृत्त त्यांचे वर्णिले ॥३१॥ स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू । त्यासी लागला भजनछंदू । जे दादाबुवा प्रसिद्धु । अठराव्यात वृत्त त्यांचे ॥३२॥ वासुदेव फडक्यांची गोष्ट । आणि तात्यांचे वृत्त । वर्णिले एकोणविसाव्यांत । सारांशरुपे सत्य पै ॥३३॥ एक गृहस्थ निर्धन । त्यासी आले भाग्य पूर्ण । तेचि केले वर्णन । विसाव्यांत निर्धारे ॥३४॥ स्वामी समाधिस्त झाले । एकविसाव्यांत वर्णिले । ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले । पूर्ण केले स्वामीचरित्र ॥३५॥ शके अठराशे एकोणवीस । वसंतऋतू चैत्र मास । गुरुवार वद्य त्रयोदशीस । पूर्ण केला ग्रंथ हा ॥३६॥ बळवंत नामे माझा पिता । पार्वती माता पतिव्रता । वंदोनी त्या उभयंता । ग्रंथ समाप्त केलासे ॥३७॥ स्वामींनी दिधला हा वर । जो भावे वाचील हे चरित्र । त्यासी आयुरारोग्य अपार । संपत्ती, संतति प्राप्त होय ॥३८॥ त्याची वाढो विमल किर्ती । मुखी वसो सरस्वती । भवसागर तरोन अंती । मोक्षपद मिळो त्या ॥३९॥ अंगी सर्वदा विनय असो । वृथाभिमान तो नसो । सर्व विद्यासागर गवसो । भक्तश्रेष्ठा लागूनी ॥४०॥ ज्या कारणे ग्रंथ रचिला । जिही प्रसिद्धीस आणिला । त्यांसी रक्षावे दयाळा । कृपाघना समर्था ॥४१॥ मी केवळ मतिमंद । परी भावे घेतला छंद । कृपाळू तू सच्चिदानंद । पूर्ण केला दयाळुवा ॥४२॥ दोन्ही कर जोडोनी । आता हेचि विनवणी । ग्रंथसंरक्षकांलागोनि । सुखी ठेवी दयाळा ॥४३॥ आता ज्ञानी वाचक असती । त्यांस करु एक विनंती । मी केवळ हीनमति । कवित्व करू नेणेची ॥४४॥ परी माझी ही आर्त उत्तरे । वाचावी ऐकावी आदरे । उबग न मानावा चतुरे । स्वामीचरित्र म्हणोनी ॥४५॥ जयजयाजी परमानंदा । वैकुंठवासी श्रीगोविंदा । भक्ततारका आनंदकंदा । अनामातीता अभेदा ॥४६॥ अरिमर्दना सर्वेशा । विश्वंभरा अविनाशा । पुराणपुरुषा अनंतवेशा । भवपाशा सोडवी ॥४७॥ जयजयाजी कमलासना । कमलावरा कमलनयना । विधिताता कमलवदना । हृदयकमली वसावे ॥४८॥ मत्स्य कूर्म वराह जाण । नृसिंह आणि वामन । परशुराम दशरथनंदन । कृष्ण बौद्ध कलंकी तू ॥४९॥ स्वामीचरित्र सुंदर उद्यान । त्यातील कुसुमे वेचून । सुंदर माळ करोन । आला घेवोनि विष्णु कवि ॥५०॥ आपुल्या कंठी तात्काळ । घालोनि चरणी ठविला भाल । सदोदित याचा प्रतिपाल । करावा बाळ आपुले ॥५१॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । एकविंशोऽध्याय गोड हा ॥५२॥