बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्शनची खासीयत आहे, ती कौटंबिक चित्रपटांची. त्यांचे चित्रपट कुटुंबात बसून छानपैकी बघता येतात. यात हिंसा, संघर्ष यांना फार थारा नसतो. याचा अर्थ चित्रपटात कुठेच डार्क शेड नसतात, असे नाही. पण नकारात्मक म्हणून दाखवलेली माणसे काही परिस्थितीमुळे तशी वागतात, असे दाखविले जाते. बडजात्या कुटुंबापैकीच एक सुरज बडजात्याने कौटुंबिक चित्रपटाचे नवे यशस्वी समीकरण काही वर्षांपूर्वी तयार केले. सुरजला चित्रपट तयार करणे काही नवीन नव्हते. घरातच सगळे वातावरण असल्याने त्याला या माध्यमाची चांगलीच जाण होती. म्हणूनच एेन तरूण वयात त्याला 'मैने प्यार किया' च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली. . हा काळ असा होता की हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या चित्रपट संन्यासामुळे मारधाडीचे चित्रपट कमी झाले होते. त्यांना प्रतिसादही फारसा मिळत नव्हता. अमिताभचे चित्रपट पाहणारी पिढी वयाने वाढली होती. आता नव्या पिढीला भावतील असे विषय असणारे चित्रपट हवे होते. म्हणूनच आमीर खानचा कयामत से कयामत तक ही लव्हस्टोरी असणारा चित्रपट हीट ठरला होता. थोडक्यात हिंदी चित्रपटसृष्टीत रोमॅंटिसिझम सुरू झाला होता. सुरजने याचा नेमका फायदा उठवला. प्रेमकथा मांडताना त्याला विरोध असा फाॅम्युला आकर्षक पद्धतीने मांडला. जोडीला राम लक्ष्मणचे संगीत. नायिका म्हणून भाग्यश्री पटवर्धन या नव्या अभिनेत्रीला आणले व तोपर्यंत अवघ्या एका चित्रपटात काम केलेल्या सलमान खानला नायक म्हणून सादर केले. ही जोडी आणि चित्रपट दोन्ही प्रचंड गाजले. चित्रपट सुपरहीट ठरला. लता मंगेशकर व एस. पी बालसुब्रमण्यमच्या आवाजातील गाणी देशभर गाजली. 'मैने प्यार किया'मुळे प्रेमपटांची लाट आली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अमिताभच्या काळात लयाला गेलेले संगीताचे महत्त्व या काळात पुन्हा वाढले. त्यामुळे चांगली गाणी व प्रेमकथा हा यशस्वी होण्याचा फाॅम्युला बनला. सुरज बडजात्या पहिल्याच चित्रपटाने स्टार दिग्दर्शकांमध्ये गणला जाऊ लागला. यानंतर १९९४ मध्ये आला हम आपके है कौन. बडजात्यांच्या चित्रपटात मुल्य, संस्कृती यांना खूप मह्त्त्व असते. त्यामुळे कुटंब एकत्रितरि्त्या त्यांचे चित्रपट पाहू शकतात. हे लक्षात ठेवून सुरजने चित्रपटाची मांडणी केली. कथा म्हणजे काय, तर एका कुटुंबातील लग्न. आणि त्यात जुळलेले प्रेम. तीन तासाच्या या चित्रपटात शेवटच्या वीस मिनिटात कथा म्हणून काहीतरी घडते. तोपर्यंत सगळे काही लग्नकार्य. त्यामुळे श्रीमंतांघरच्या लग्नाची व्हीडीओ कॅसेट अशीही खिल्ली उडवली गेली. पण तिकीटखिडकीवर काहीही परिणाम झाला नाही. चित्रपट धो धो चालला. काळ्या बाजारात तिकीटासाठी लोकांनी पाहिजे तेवढे पैसे खर्च केले. चार चार पाच पाच वेळा लोकांनी चित्रपट पाहिला. राम लक्ष्मण यांचे संगीत आणि लता मंगेशकर, एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आवाज हे कॉम्बिनेशन याही वेळी यशस्वी ठऱले. आतापर्यंत सर्वाधिक गल्ला गोळा करणारा चित्रपट म्हणूनही त्याने लौकीक मिळविला. लोकांना दैन्य, दुःख, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार यापेक्षा जे आपल्याकडे नाही, असे चकचकीत घर, छान छान नातेसंबंध, मोठी घरं, छान साड्या नेसलेल्या महिला असे 'गुडी गडी' वातावरण पडद्यावर पहायला आवडते. त्यामुळे श्रीमंतांघरचा चित्रपट अशी हेटाळणीयुक्त संभावना करूनही हम आपके है कौनचे यश नाकारता येणार नाही. उलट या चित्रपटाने यशस्वितेचा नवा मार्ग चित्रपटसृष्टीला दाखविला. त्यामुळे त्यानंतर यश चोप्रांच्या यशराज फिल्सने याला शाहरूख खान व एनआरआय फाॅम्युल्याची जोड देऊन अनेक चित्रपट हीट केले. बडजात्यांचा हा फाॅम्युला पुन्हा काही दिवसांनी मात्र तितका चालला नाही. त्यांचाच मै प्रेम की दिवानी हूँ हा चित्रपट फ्लॉप ठरला. हम साथ साथ है हा मात्र, बर्यापैकी चालला. काही दिवसांपूर्वीच आलेला 'विवाह' सुद्धा फारसा चालला नाही. एकेकाळी एक ट्रेंड सेट करणार्या बडजात्यांनी त्याच पद्धतीचे चित्रपट तयार करणे सुरू ठेवले. वास्तविक काळ बदलला आहे, याची नोंद त्यांनी घेतली नसावी. दिल चाहता है पासून वेगळ्या प्रकारचे चित्रपट सध्या चालत आहेत. त्यामुळे आगामी काळात सुरज कशा प्रकारचे चित्रपट देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सुरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट- मैन प्यार किया, हम आपके है कौन, मै प्रेम कि दिवानी हूँ, हम साथ साथ है, विवाह.