चिरतारूण्याचे दुसरे नाव हेमामालिनी

IFMIFM
काही वाक्य कानाला खटकतात. अशी वाक्यं जणू तप्त पोलाद कानात ओतल्यासारखी वाटतात. कारण काही गोष्टीच अशा असतात, की त्या सनातनरित्या तशाच रहातात, अशी मनाची समजूत असते. 'ती' ही त्यातलीच एक. सपनोंका सौदागरमधून म्हाताऱ्या राजकपूरची नायिका म्हणून ती बॉलीवूडच्या तारकादळात सामील झाली आणि त्यानंतर अगदी आजपर्यंत तेजाने लखलखत आहे. अगदी परवा परवाचा बागबान आला तेव्हाही ती म्हाताऱ्या अमिताभपेक्षा 'चार्मिंग' वाटत होती. थोडक्यात तिला वयाचं बंधन कधी पडलंच नाही. म्हणूनच बॉलीवूडमध्ये तिच्या आधी आणि नंतरही कित्येक तारका आल्या नि विझूनही गेल्या. पण गेल्या (आणि) याही पिढीच्या स्पनात येऊन छळणारी ड्रिमगर्ल मात्र तीच राहिली. 'हेमामालिनी' तिचं नाव.

तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊन तिच्याविषयीच्या काही मनोरंजक बाबी.

जन्मापूर्वीच ना
जन्मापूर्वी कुणाचं नाव ठेवल्याचं कधी ऐकलंय? नाही ना? कारण मुलगा होणार की मुलगी हेच माहिती नसताना नाव कसं ठेवणार? पण हेमामालिनीच्या आई जया चक्रवर्ती यांना मुलगीच होईल हा पक्का विश्वास होता. म्हणूनच तिचं नाव हेमामालिनी ठेवायचं हे त्यांनी पक्कं केलं होतं. गर्भार असताना त्यांनी घरात दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांची चित्रे लावली होती. त्यांना स्वतःला खरे तर नर्तक व्हायचे होते. पण ते शक्य झालं नाही. म्हणून मुलीने तरी नर्तकी व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अर्थात पुढे मुलीने ती पूर्ण केली. १६ ऑक्टोबर १९४८ ला हेमामालिनीचा जन्म झाला. गोरीपान दिसणारी, गब्दूल दिसणारी ही मुलगी पुढे जाऊन ड्रिमगर्ल बनले असे कुणालाही त्यावेळी वाटले नसते.

ड्रिमगर्लचे आगमन...
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिकांना विविध विशेषणे जोडली आहेत. देविकाराणींना फर्स्ट लेडी ऑफ इंडियन स्क्रीन, नर्गिस यांना लेडी इन व्हाईट, मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन, सायराबानू ब्युटी क्वीन. या मांदियाळीत हेमामालिनी अतिशय योग्य असे म्हणजे ड्रीमगर्ल हे विशेषण मिळाले. स्वप्नात येणारी मोहक ड्रिमगर्ल. हेमामालिनीने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले ते शोमॅन राजकपूरबरोबर. चित्रपट होता सपनोंका सौदागर. आणि साल होते १९६८.

IFMIFM
त्यावेळी हेमामालिनी म्हणजे कोवळी शेंग तर राजकपूर म्हणजे जून भोपळा अशी ही जोडी होती. हेमामालिनी तेव्हा वयात येत होती. तर राजकपूरच्या चेहर्‍यावर वय दिसत होतं. चौदा वर्षांपासूनच हेमामालिनीला चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या होत्या. सपनोंका सौदागरमध्येही ती खरे तर लहान दिसत होती. पण निर्माता व दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला साडी नेसायला लावली आणि हेमा तरूण मुलगी वाटली. पहिला चित्रपट राजकपूरबरोबर केला तरी तिला यश मिळाले ते १९७० मध्ये आलेल्या 'जॉनी मेरा नाम'मुळे. हेमामालिनीच्या भवितव्याचा अदमास राजकपूर यांना आधीच लागला होता. ते म्हणाले ही होते, '' ही मुलगी एके दिवशी मोठी स्टार होईल.'' त्यांचे भविष्य तंतोतंत खरे ठरले.

बडबडी बसंती
दक्षिण भारतीय अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीला नविन नाहीत. पद्मिनी, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, मीनाक्षी शेषाद्री, श्रीदेवी, जयाप्रदा अशी तारकांची मांदियाळीच आहे. पण यातही सर्वाधिक काळ रूपेरी पडद्यावर चमकणारी अभिनेत्री एकमेव म्हणजे हेमामालिनी. आता तिच्या मुली चित्रपटात काम करत असतानाही तीही काम करते आहे. (आणि मुलींपेक्षा चांगली दिसतेय.) नुकत्याच आलेल्या 'लागा चुनरी में दाग' मध्येही ती आहेच. तिला पाहिल्यावर आजही लोक टाळ्या वाजवतात, हे तिच्या लोकप्रियतेचे लक्षण.

संसदेत खासदार असलेली हेमामालिनी पण लोकांच्या मनात आजही बसंती म्हणूनच आहे. तिची 'शोले'मध्ये चालणारी अखंड बडबड आजही धमाल उडवते. म्हणूनच कोणत्याही प्रचारसभेत गेल्यानंतर हेमामालिनीला बसंतीचे संवाद म्हणण्याचा आग्रह केला जातो.

हेमामालिनी - फारशी माहित नसलेल
* राजकपूरच्या सत्यम शिवम सुंदरममध्ये सुरवातीला हेमामालिनीला घेण्याचे ठरले होते. पण अंगप्रदर्शन करणारी भूमिका असल्याने तिने नकार दिला.
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सीता और गीता हा चित्रपट एवढा आवडला होता, की त्यांनी तो अनेकदा बघितला आहे.
* हेमामालिनी सौंदर्य राखण्यासाठी आजही योग व व्यायाम करते.
* आठवड्यात दोन उपवास ती करते. शुक्रवार हा त्यातला एक दिवस.
* मुलगी इशाच्या बाबतीत कोणता चित्रपट स्वीकारायचा कोणता नाही, हा निर्णय हेमामालिनी घेतात.
* कांजीवरम साड्या, शेवंतीचा गजरा आणि दागिने या हेमामालिनीच्या आवडीच्या बाबी आहेत.