भारतीय सिनेजगताची मल्लिका-ए-तरन्नुम या नावाने ज्यांची ओळख आहे त्या सुप्रसिध्द पार्श्वगायिका अल्लाहवासी उर्फ नूरजहाँ यांनी आपल्या आपल्या आवाजाची आणि अभिनयाची मोहिनी घातली. ती गीते आजही ताजीतवानी आहेत.
अनमोल घडी, जीनत, जुगनू, दुहाई, खानदान आणि मिर्झा साहिबाँ सारख्या त्यांच्या उत्तम गायिकीने सजलेले चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 21 सप्टेंबर1926 मध्ये पंजाबमधील कसुर या छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटूंबात नूरजहाँ यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील चित्रपटगृहात काम करत होते. घरातच फिल्मी वातावरण असल्याने नूरजहाँ आपसुखच संगीताकडे वळल्या.
पार्श्वगायिका म्हणून आपली ओळख करण्याचा संकल्प त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांचा कल लक्षात घेऊन आईने प्रोत्साहन दिले. घरातच संगीताचे धडे देण्यास सुरूवात केली. नूरजहाँ यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण कजानबाई यांच्याकडून तर शास्त्रीय संगीतचे शिक्षण उस्ताद गुलाम मोहम्मद तथा उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्याकडून घेतले. 1930 मध्ये त्यांना 'इंडियन पिक्चर'ने 'हिंद के तारे' या मूक चित्रपटात काम करण्याची संधी दिली. यानंतर काही दिवसांनी त्यांचे कुटूंब पंजाबमधून कलकत्यात स्थलांतरीत झाले. या दरम्यानच्या काळात त्यांना 11 मूक चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली.
1931 पर्यंत नूरजहाँ यांनी बालकलाकार म्हणून आपली ओळख केली. 1932 मध्ये प्रदर्शित झालेला 'शशि पुन्नु' हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट होता. यावेळी त्यांनी कोहिनूर यूनाइटेड आर्टिस्टच्या बॅनरखाली काही चित्रपटांत काम केले. कलकत्यामध्ये त्यांची ओळख निर्माता पंचोली यांच्याशी झाली. पंचोली यांना नूरजहाँ यांना गुल-ए-बकावली या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
या चित्रपटासाठीच त्यांचे 'साला जवानियाँ माने और पिंजरे दे विच' हे पहिले गाणे रेकॉर्ड झाले. सुमारे तीन वर्ष कलकत्यात राहिल्यानंतर नूरजहाँ पुन्हा लाहौरमध्ये निघून आल्या. याठिकाणी त्यांची भेट संगीतकार जी.ए. चिश्ती यांच्याशी झाली. त्यांनी नूरजहाँ यांना स्टेजवर गाणे म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि त्यांनी तो मान्यही केला.
1939 मध्ये पंचोली निर्मित गुल-ए-बकावली या संगीतमय चित्रपटच्या यशानंतर नूरजहाँ यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख झाली. यानंतर 1942 मध्ये पंचोली यांच्याच खानदान या चित्रपटातून त्यांना मोठी प्रसिध्दी मिळाली. 'खानदान' चित्रपटातील 'कौन सी बदली में मेरा चाँद है आजा' हे गाणे श्रोत्यांमध्ये खुपच लोकप्रिय झाले. यावेळी त्याहनी दिग्दर्शक शौकत हुसैन यांच्याशी लग्न केले आणि त्या मुंबईत आल्या. शौकत यांच्या दिग्दर्शकाखाली त्यांनी नौकर, जुगनू (1943) सारख्या चित्रपटात अभिनय केला.
WD
त्या आपल्या आवाजामध्ये सातत्याने प्रयोग करत असायच्या. आपल्या या वैशिष्ठ्यामुळेच त्यांना ठुमरी गायनाची महाराणी म्हटले जाऊ लागले. त्यांचा दुहाई (1943), दोस्त (1944) आणि बडी माँ, विलेज गर्ल (1945) सारखे चित्रपट यशस्वी ठरले. त्यांच्या आवाजाची जादू श्रोत्यांना मोहीत करू लागली आणि या प्रकारे नूरजहाँ मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये मल्लिका-ए-तरन्नुम म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
1945 मध्ये यांचा 'जीनत' हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'ना भरी शिकवे ना किए... कुछ भी ना जुवाँ से काम लिया...' ही कव्वाली लोकप्रिय झाली. 1946 मध्ये त्यांना निर्माता-दिग्दर्शक महबूब खान यांच्या अनमोल घडी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली नूरजहाँ यांचे गीत आवाज दे कहाँ है.., आजा मेरी बर्बाद मोहब्बत के सहारे, जवाँ है मोहब्बत आजही लोकांच्या ओठावर आहेत.
1947 मध्ये भारताच्या विभाजनानंतर नूरजहाँ यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेता दिलीप कुमार यांनी नूरजहाँ यांना भारत रहाण्याची विनंती केली तेव्हा त्या म्हणाल्या 'मी जेथे जन्माला आले तेथेच रहाणार आहे' पाकिस्तानात गेल्यानंतरही त्यांनी चित्रपटात काम करणे सुरू ठेवले.
सुमारे तीन वर्षे पाकिस्तानात फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिध्द केल्यानंतर नूरजहाँ यांनी चॅनवे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शक केले. यानंतर 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दुपट्टा' ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले.
'दुपट्टा' मधील नूरजहाँ यांच्या आवाजातील गीते ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. केवळ पाकिस्तानच नव्हे तर भारतातही ही गीते लोकप्रिय ठरली. ऑल इंडिया रेडियोपासून सिलोन पर्यंत नूरजहाँ यांच्या आवाजाची जादू पसरली होती.
या दरम्यान त्यांनी गुलनार (1953), फतेखान (1955), लख्ते जिगर (1956),इंतेजार (1956), अनारकली (1958), परदेसिया (1959), कोयल (1959) आणि मिर्जा गालिब (1961) सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घातली. 1963 मध्ये नूरजहाँ यांनी अभिनयाच्या दुनियेला अलविदा केला.
1966 मध्ये त्यांना पाकिस्तान सरकारकडून तमगा-ए-इम्तियाज या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 1982 मध्ये इंडिया टॉकीच्या गोल्डन ज्युबली कार्यक्रमात त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण मिळाले. त्यावेळसला त्यांच्या चाहत्यांच्या मागणीला मान देत त्यांनी 'आवाज दे कहाँ है दुनिया मेरी जवाँ है' हे गीत सादर केले.
1996 मध्ये त्यांनी गाणे थांबविले. त्यावेळेला प्रदर्शित झालेल्या 'सखी बादशाह' या पंजाबी चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गाणे म्हटले. त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये एक हजार गीते गायली. हिंदी चित्रपटाव्यतीरिक्त त्यांनी पंजाबी, उर्दू आणि सिंधी चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाची जादू घातली. आपला दिलकश आवाज आणि अदांनी सगळ्यांना महदोश करणा-या नूरजहाँ यांनी 23 डिसेंबर 2000 मध्ये जगाचा निरोप घेतला.