काळाचा परिणाम सर्वांवर होतो असं म्हणतात. पण बहुधा प्रसिद्ध गायिका आशा भोसले त्याला अपवाद असाव्यात कारण आठ सप्टेंबरला पंच्च्याहत्तरीत प्रवेश करणार्या आशाताईंचा आवाज आजही तरूण आहे. नुसताच आवाज नाही तर त्यांचा उत्साहही तितकाच तरूण आहे. वय वगैरे बंधने त्यांना लागू नसावीत की काय असे त्यांच्याकडे पाहून वाटते.
आशाताई कॅबरे सॉंग ज्या सहजतेने गाऊ शकतात त्याच सहजतेने त्या भजनही गाऊ शकतात. तरूण आहे रात्र अजूनही गाणार्या आशाताई पांडुरंग कांतीही तितक्याच तल्लीनतेने गाऊ शकतात आणि दोन्ही गाण्यांचे मूड्सही अचूक पकडू शकतात. पण हे सारे इतक्या सहजासहजी घडले नाही. त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. असे म्हणतात की एका वटवृक्षाखाली दुसरा वृक्ष उभा राहू शकत नाही. पण आशाताईंनी हे खोटे ठऱविले. लता मंगेशकर हे नाव हिंदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील तळपत असतानाही आशाताईंनी प्रचंड संघर्ष करून स्वतःचे एक वेगळे स्थान बनविले. या स्थानापर्यंत पोहोचणेही सामान्य गायिकांच्या दृष्टीने अशक्य आहे.
यशस्वीतेचे रहस्य आशाताईंच्या मते रियाझ त्यांच्या यशाचे रहस्य आहे. कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचूनही त्या आजही पूर्णपणे समर्पित होऊ रियाझ करतात. वर्षांपासून चालत आलेला नियम त्या आजही त्याच निष्ठेने, शिस्तीने आणि समर्पित भावनेने पाळत आहेत. नियम पाळण्याविषयी त्या आजही जागरूक असतात. त्यामुळे जे खाल्ल्यावर गळ्याला त्रास होतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या पदार्थाकडे ढुंकून पाहिलेही नाही.
आपल्या यशाबद्दल आशाताई इतरांचे आपल्याप्रती असलेले ऋणही कृतज्ञतेने व्यक्त करतात. त्या काळातील दिग्गज संगीतकारांबरोबर काम केल्याने आपल्यामध्ये खूप सुधारणा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडूनच आपल्याला अनेक बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळाल्याचे त्या मानतात. गाताना श्वास कधी घ्यावा, कधी सोडावा, शब्दांचे योग्य उच्चार, भाषेचे ज्ञान असे अनेक पैलू आपल्याला या संगीतकारांमुळे कळले, असे त्या कृतज्ञतेने सांगतात.
काळाबरोबर चाल आशाताईंच्या बाबतीत महत्त्वाची म्हणजे त्या काळाच्या मागे पडल्या नाहीत. त्याच्याबरोबरच त्यांनी हातमिळवणी करून त्या चालल्या. त्यामुळे त्यांचे गाणे आजही जुने मागच्या पिढीतले वाटत नाही. नव्या पिढीसाठी त्यांनी तसे गायनही केले. शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी, सुगम संगीत, गझल गात असताना डिस्को, कॅबरेतील गाणी, इंग्रजी गाणी आणि अगदी रॉक, पॉप गाणीही त्या गायल्या. नुसत्या गायल्या नाही तर अगदी त्या पिढीला आवडतील अशा पद्धतीने गायल्या. म्हणून तर जानम समझा करो सारखा त्यंचा पॉप अल्बमही चांगलाच हीट ठरला.
एवढे नाव कमावूनही आशाताई आजही जमिनीवर आहेत. प्रसिद्धी त्यांच्या पायापाशी लोळण घेत असते. पण आशाताई त्याकडे लक्षही देत नाहीत. कुठलही अहंपण बाळगत नसल्याने नव्या संगीतकारांबरोबरही त्या तितक्याच उमेदीने काम करतात. त्यांना हवं तसं गातात.
(आशाताईंची तुम्हाला आवडणारी टॉप टेन गाणी खाली लिहा)
आरडी आणि आशा आयुष्यातील पहिलं लग्न दुर्देवाने अतिशय त्रासदायक ठरले तरी आशाताईंचे सूर खर्या अर्थाने जुळले ते आर. डी. बर्मन यांच्यासमवेत. आजही आरडींची आठवण काढली की आशाताई हळव्या होतात. आरडी एक महान संगीतकार होते, पण त्यांना ते श्रेय मिळत नाही, याचे आशाताईंना दुःख होते. आताही रिमिक्सची जी गाणी असतात त्यात ८० टक्के गाणी आरडींची असतात. आरडीच्या संगीताचे चिरतरूणपण यातून दिसते असे त्यांचे म्हणणे आहे.
आरडींशी झालेली पहिली भेट आजही त्यांच्या लख्ख स्मरणात आहे. अरमान चित्रपट तयार होत असताना एस. डी. बर्मन यांनी हा माझा मुलगा आहे, असे सांगून आरडीशी आशाताईंची ओळख करून दिली. त्यावेळी त्यांच्यात फार काही बोलणे झाले नाही. पण आरडींनी एक वही आशाताईंकडे देऊन त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यावेळी पुढे यांच्याशीच आपण लग्न करू असे आशाताईंना वाटलेही नसेल.
सध्याचे संगीत पूर्वीच्या काळी गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी खूप रिहर्सल करावी लागायची. महिनोंमहिने अभ्यास केला जायचा. गायक आणि संगीतकार गाण्याला आणखी मधुर कसे करता येईल, याचा प्रयत्न करायचे. त्यामुळेच या काळातील गाणी आजही जास्त ऐकली जातात. त्या तुलनेत नव्या गाण्यांचे आयुष्य कमी आहे, असे आशाताईंचे म्हणणे आहे. पण एकूणातच सध्याचा संगीताचा दर्जा त्यांना अस्वस्थ करतो.
आशाताई आजही बिझी पंच्च्याहत्तरी गाठली तरी आशाताई थकलेल्या नाहीत. त्यांचे काम पूर्वीच्याच जोमाने सुरू आहे. त्यांनी काम कमी केलेय. पण त्याचे कारण संगीताचा दर्जा हे आहे. पण इतर कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले आहे. स्टेज शो, रेकॉर्डिंग, नातवांशी खेळणे सारे काही सुरू आहे. त्यांची रेस्टॉरंटची साखळीसुद्धा आहे. बर्मिंगहॅम, कुवेत आणि दुबईपाठोपाठ त्यात आणखी दोन रेस्टॉरंट उघडणार आहेत.
(आशाताईंची तुम्हाला आवडणारी टॉप टेन गाणी खाली लिहा)