बॉलीवूडचा 'क्लिंट इस्टवूड'

IFMIFM
रफ टफ चेहरा, त्याला साजेशी उंची, डोक्यावर काऊबॉय छाप टोपी, तोंडात सिगार, खांद्यावर बंदुक, हातात पिस्तूल आणि कमरेला बुलेट बेल्ट, लॉंग लेदर शू आणि घोडा.... फिरोज खान यांना आठवलं की ही वैशिष्ट्येही त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात. मेन स्ट्रिमधल्या नायकांचं ग्लॅमर फिरोज खानला तो देखणा असूनही कधीच लाभलं नाही. केवळ त्याच्यासाठी म्हणून कुणी पिक्चर पहायला गेलं असं कुणीही सांगणार नाही. पण तरीही तो दुर्लक्षिण्याजोगा नक्कीच नव्हता. त्याच्या वैशिष्ट्यांसह तो लक्षात रहातो, हीच त्याचं महत्त्व अधोरेखित करणारी बाब आहे. आणि ही त्याची सगळी वैशिष्ट्य केवळ आपण वेगळं दिसावं म्हणून नव्हती, ती सगळी अंगभूत होतीच. म्हणूनच पडद्याबाहेरचा फिरोज खानही पडद्यापेक्षा वेगळा नव्हता.


पन्नासच्या दशकात दीदी व जमाना या चित्रपटातून त्याचे करीयर सुरू झाले. मग रिपोर्टर राजू (१९६२) हा त्याचा पहिला चित्रपट. यात पत्रकाराचा रोल त्याने केला होता. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्याच्याकडे नव्हते. पण तरीही कॅमेर्‍यासमोर कसे जायचे त्याला ठाऊक होते. रामानंद सागरच्या आरजू चित्रपटाचा खरा हिरो राजेंद्रकुमार होता.पण छोट्या भूमिकेतही फिरोज खान लक्षात राहिला. असीत सेन यांच्या सफरमध्ये राजेश खन्नाच्या जोडीलाही तो होता. पण दुर्लक्षिला गेला नाही.

हिरो म्हणून कुणी त्याला घेईना म्हणून मग त्याने १९७२ मध्ये स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. अपराध हा त्याचा पहिला चित्रपट. अगदी हॉलीवूड स्टाईलचा चित्रपट होता तो. मग त्यानंतर धर्मात्मा, कुर्बानी, जॉंबाज हे त्याचे चित्रपट आले. बॉलीवूडला हॉलीवूडी परिणाम देण्याची धडपड होती. म्हणूनच हे चित्रपटही त्या धाटणीचे काढले. हॉलीवूड अभिनेता क्लिंट इस्टवूड यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी अशा अनेक चित्रपटातही काम केले. काला सोना, अपराध, खोटे सिक्के हे त्यातलेच.

त्याला लेडी किलर असेही पुढे म्हटले जाऊ लागले. कुर्बानीमध्ये त्याचे व झीनत अमानचे बिनधास्त प्रसंग आजही आठवतील. खाणे-पिणे व ऐश करणे ही त्याच्या जगण्याची त्रिसुत्री होती. ती त्याच्या चित्रपटातही उतरली. त्याचबरोबर एक बेफिकीर वृत्तीही आली. म्हणूनच राज कपूरच्या संगममधील राजेंद्र कुमारचा रोल व मनोज कुमारचा 'आदमी' मधून रोलही त्याने याच बेफिकीरीतून लाथाडला होता. अर्थात, नंतर त्याला याचे वाईटही वाटले.

त्याने आपल्या कुर्बानी या चित्रपटात नाजिया हससलाही गायला लावले. नाजियाचे 'आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए' हे गाणे गाजले. जॉंबाज फार गाजला नाही. मग दयावान, यलगार, जानशीन व प्रेम अगन हे चित्रपट तर साफ आपटले. मग फिरोज खान हे नावही बॉलीवूडच्या ग्लॅमरच्या दुनियेत झाकोळले गेले. त्यांचे तीन बंधू संजय, अकबर व समीर हेही याच दुनियेत होते. या सगळ्यांत फिरोज खान यांच्यावरच प्रसिद्धीचा झोत जास्त काळ राहिला.

मुलगा फरदीनला पुढे आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्याची गाडी काही रूळावर आली नाही. वय झाल्यानंतरही फिरोज खान यांनी काही रोल केले. त्यात ते लक्षात रहाण्यासारखे होते.

IFMIFM
त्यांना घोड्यांचा खूप शौक होता. म्हणूनच त्यांनी बेंगलुरूला एक फार्महाऊस घेतले होते. तिथे घोडे ठेवले होते. कर्करोगाने त्यांना पोखरल्यानंतरही या घोड्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यामुळे मृत्यूआधी त्यांना आपले घोडे पाहण्याची इच्छा होती. म्हणूनच प्रकृतीत थोडी सुधारणा दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बेंगलुरूला जाण्याची परवानगी दिली. तिथे गेल्यानंतर त्यांनी डोळे भरून घोड्यांना पाहिले आणि २७ एप्रिलला अखेर प्राण सोडला.

त्यांच्या निधनाने एक बिनधास्त, बेफिकीर वृत्तीचा अभिनेता गेला.