इन आँखो की मस्ती के.....

IFMIFM
दिसतं तसं नसतं, अशी म्हण आहे. आयुष्याचंही तसंच असतं. जेवढं वरून उथळ दिसतं, तितकंच आत खोल असतं. चेहरा मनाचा आरसा असतो, असं कितीही म्हटलं तरी प्रत्येक गोष्ट तो दाखवतोच असं नाही.

सौंदर्य आणि प्रसिद्धीच्या बुरख्याआड कितीतरी गोष्टी दडल्या असतात, हे कुणाला माहित असतं. जीवन असे काही समोर येऊन छळ करतं, की त्यापासून सोडवू म्हणता सुटत नाही. वय आणि सौंदर्य जिच्यापुढे येऊन स्तब्ध झालंय, त्या रेखाच्या बाबतीत हे सारे काही लागू पडतं. रेखाचं जीवन म्हणजे जीवनाच्या उभ्या आ़डव्या रेषांचा कोलाज आहे. एका रेषेच्या आड दुसरी रेषा लपलेली. त्यामुळे तिच्याखाली काय दडलंय त्या रेखालाच ठाऊक.

रेखाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला तेव्हा ती तेरा वर्षांची चिमुरडी होती. हिंदीशी काहीही संबंध नाही. पाठिशी बड्या आईबापाचं वलय तेवढं होतं. प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावल्ली यांची रेखा ही कन्या. त्यामुळे चित्रपट तिला नविन नव्हता. चेहऱ्यावर रंग फासणे आणि जे नाही ते दाखवणे तिला लहानपणीच जमून गेले. तिच्या उर्वरित आयुष्यात ती याच 'भूमिका' फक्त वठवत राहिली.

IFMIFM
रेखाच्या आयुष्याची रेषा लहानपणापासूनच काहीशी वेगळी निघालेली. एकाकी. प्रेमाच्या, मायेच्या सहवासाच्या शोधात निघालेल्या रेखाला लहानपणी ते कधीच मिळालं नाही. आणि मोठेपणीही ती ते मिळवू शकली नाही. नशीबाची रेषा तिच्या आयुष्यापासून समांतर राहिली. ती कधीच तिला येऊन मिळाली नाही.

रेखा स्वभावाने अतिशय लाजाळू आहे. स्वतःविषयी बोलणेही ती टाळते. असं म्हणतात, की तिच्यापेक्षा तिचं मौन जास्त बोलतं. पण एकदा ती एका मुलाखतीत म्हणाली होती, वडिल या शब्दाचा अर्थ काय हे मला अजूनही समजत नाही. फादर म्हटलं की मला चर्चचे फादर आठवतात. वडिल हा शब्द माझ्यासाठी कृतघ्नतेशी नाते सांगतो.' रेखाच्या मनात वडिलांविषयीचा कोरडेपणा असल्याचे हे एकच उदाहरण नाही. जेमिनी गणेशन यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा रेखा राकेश रोशनच्या 'कोई मिल गया'चे शूटींग करत होती. बातमी ऐकल्यानंतर तिचा चेहरा अगदी निर्विकार होता. कोरड्याठक्क चेहर्‍यानेच तिने पुन्हा शूटींग सुरू करा असे सांगितले.

नवीन निश्चलबरोबर रेखाचा पहिला चित्रपट आला 'सावनभादो'. चित्रपट खूप गाजला आणि चित्रसृष्टीला नवा चेहरा मिळाला. सौंदर्य आणि उत्साह या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता, पण त्याचवेळी त्याच्या आत काही दर्दही असल्याचा पुसट भास होत होता.

IFMIFM
रेखाच्या आतली अभिनयाची उर्जा ओळखण्याचे आणि तिला वाव देण्याचे काम केले ह्रषिकेश मुखर्जी यांनी. खूबसूरतमध्ये तिने रंगवलेली अवखळ तरूणी गाजली. अवखळपणातून परिपक्व स्त्रीकडे वाटचाल करणारी ही भूमिका म्हणजे रेखाच्या आयुष्याचं प्रतिबिंब.

यानंतर रेखा खूप बदलली. बॉलीवूडमध्ये रेखा प्रसिद्धीच्या झोतात असताना दुसरीकडे तिचे वैयक्तिक आयु्ष्य मात्र, गाढ अंधार होता. आपले एकटेपण तिने अमिताभमध्ये विरघळवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण अमिताभने कुटुंबाला प्राधान्य दिले आणि तोच तिच्या आयुष्यातून निघून गेला. दोघांनी अनेक चित्रपट एकत्रित केले. मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, खून पसीना असे हिट चित्रपट दिले. सिलसिला हा त्यांच्यातील शेवटचा चित्रपट. यानंतर ही जोडी कधीही एकत्र आली नाही.

सौम्य बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या अमिताभ बच्चन या पुस्तकासंदर्भात त्यांना रेखाशी बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा सुरवातीला ती काहीही बोलली नाही. पण नंतर जेव्हा तिने बोलणे सुरू केले ते अगदी धबधब्यासारखे. तिच्या डोळ्यातील चमकच काही वेगळे सागंत होती.

IFMIFM
अशीच एक घटना आहे. काही वर्षांपूर्वी एका श्रद्धांजली कार्यक्रात लता मंगेशकर सिलसिला चित्रपटातील 'ये कहॉं आ गये हम' हे गाणे गात होत्या. त्यावेळी अमिताभ या गाण्यातील संवाद म्हणत होते, ' बेचैन हालात इधर भी है और उधर भी, तनहाई की एक रात इधर भी है और उधर भी.....' या संवादावेळी सर्व कॅमेरे रेखाच्या चेहर्‍यावर होते. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावर जे भाव होते, त्यातूनच तिचे अमिताभवरील प्रेम किती गहिरे आहे, याची कल्पना येते.

अमिताभनंतर तिचे खासगी जीवन संकुचित होत गेले. नंतर रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवालशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येतून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा रोख अर्थातच रेखावर होता. पुढे विनोद मेहराबरोबर नाव जोडलं गेलं. त्याचाही अचानक मृ्त्यू झाला. त्यावेळीही रेखाकडे बोटे दाखविण्यात आली. या सगळ्या गदारोळात ती एकटीच होती.

त्यानंतर मग ती फक्त काम करत राहिली. एकेक चित्रपट येत गेले. तिचे कौतुक होत गेले. आपला खरा चेहरा आत दडवून ती फिल्मी चेहरा समोर ठेवून ते कौतुक ती स्वीकारू लागली. आजही चित्रपट येताहेत जाताहेत. ती मात्र आजही तशीच आहे. जशी ती त्यावेळीही होती. भलेही आयुष्याची पन्नाशी का उलटेना.

रेखा आजही चालतेय. जगाशी समांतर अंतर राखून.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा