आमीर खान 14 मार्चला 43 वर्ष पूर्ण करून 44 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसाचे त्याच्या जीवनात वेगळेच महत्त्व आहे.
कारण गेल्या एका वर्षात आमीरमध्ये बराच बदल झाला आहे. मागचा वाढदिवस एका अभिनेत्याच्या रूपात साजरा करणारा आमीर हा वाढदिवस अभिनेता आणि दिग्दर्शकाच्याही रूपात साजरा करणार आहे.
'तारे जमीं पर' चित्रपट बनवून आपल्यातला एका संवेदनशील कलाकार त्याने दाखवून दिला. चित्रपटाला व्यवसाय न समजता कलेचे माध्यम समजतो यातूनच त्याचं वेगळेपण दिसून येतं.
चित्रपटातून पैसे कमाविणे हे लक्ष्य त्याने कधीच समोर ठेवले नाही. हे स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम असून त्यातून चांगला आशय लोकांपर्यंत जायला हवा असे त्याला वाटते. म्हणूनच आगामी काळात त्याच्याकडून अजून चांगल्या चित्रपटांची अपेक्षा करता येईल.
एकाच पठडीतील चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणार्या आमीरने चित्रपटसृष्टीत स्थिरावल्यानंतर मात्र आपला मार्ग बदलला. वाईट किंवा फालतू कथानक असलेले चित्रपट करण्यापेक्षा घरी बसलेले चांगले, असे त्याला वाटते. म्हणूनच तो चांगले कथानक असेल तर चित्रपट करतो. शिवाय चित्रपटांची संख्याही त्याने कमी केली आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाविषयी लोकांना उत्सुकता असते. त्यात काही तरी नक्की वेगळे असणार अशी लोकांना खात्री असते.
आमीरने आपला वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 'गजनी' या आगामी चित्रपटासाठी तो सर्व केस काढून टाकून टक्कल करणार आहे. केस कापण्यासाठी त्याने आजचा दिवस निवडला आहे. तो आज सायंकाळी केस कापणार असून त्यानंतर कुटुंबासमवेत डिनर घेणार आहे. मात्र त्याच्या या निर्णयाने त्याची पत्नी किरण नाराज असल्याचे समजते.