अनिल, जॅकी, सनी झकास काऊबॉय मूडमध्ये होते. गोविंदा किमी काटकर-नीलम सोबत नाचायला लावत होता. धर्मेंद्र-जितेंद्र धावत नव्हतेच. संजय दत्तची लुडबूड सुरू झाली होती. आमीर, सलमाननं चेह-याची चिकणमाती लावायला घेतली होती. 'अशातच तो संपला, अगदी संपला' या ठरावावर प्रत्येकाने मनातल्या मनात सहीही करून टाकली होती. 'शहेनशाह' चा पार ‘छोटे मिया' झाला होता.
IFM
IFM
मीनाक्षी शेषाद्रीबरोबर केविलवाणं बागडून झालं. 'नमक हलाल', 'मुकद्दर का सिकंदर'च्या पुण्याईवर 'जादूगर' केला, पण 'तुफान'मुळे गटांगळ्या खात असलेली होडी पार उलटीच झाली. 'आज का अर्जुन' व 'अग्निपथ' हिट झाले नाहीत. (नव्वद साली दहा आठवडे म्हणजे खोल भोवरा. हल्ली तीन आठवडे म्हणजे स्वर्गप्राप्ती) 'इंद्रजीत' व 'अकेला' आले होते, हे सांगावं लागतं. दाढी वाढवून निरीक्षण सुरू झालं. काय चाललंय, आपण कुठे आहोत?
खुदाला गवाह ठेवून दाढी वाढवली तरी सुरकुत्या लपणार नाहीत. मग, पाच वर्षं जाऊ दिली. 'मृत्युदाता' चा फुगा पहिल्याच आठवड्यात फुटला. समजलं, शाहरूख, अजय, सुनील, अक्षय मस्त खेळत आहेत. 'जाहिरात आणि मी? झोप झाली नाही का?' हा प्रश्न विचारता विचारताच 'बीपीएल'ची जाहिरात केली. तेव्हाच जोर का झटका धीरेसे लागला होता. आपलं काय होणार, भीती कुठेतरी होतीच. करोडपतीनं तारलं. नवं रूप सा-यांना आवडलं. तेच तेच करून उपयोग होत नाही, अक्षय, सैफची पिढी आपल्याला पाहत नाही पण तेच ते करण्याची खुमखुमी जातही नाही अशा कात्रीत.
IFM
IFM
ऐन उमेदीत वेगळं फारसं केलं नाही. जे काही तेव्हा मोजकं होतं ते खूप चांगलं होतं, हे नक्की. कुठे गेला तो 'चुपके चुपके' मधला धमाल प्राध्यापक?, 'बेमिसाल' मधला मनस्वी 'सुधीर', कुठे गेला तो भावोत्कट 'सिलसिला'?...अगदी 'आलाप'ही ऐकू आला नाही कधीच त्यानंतर. दुसरी कुठलीच 'मंझिल' गाठावीशी वाटली नाही. अगदी 'अभिमाना'नं गाणंही म्हणणं नाही. ‘आनंद’ची 'कॉंन्टिन्यूटी' नंतर फाऱशी झालीच नाही. अगदी 'शराबी' 'शक्ती' मधले क्लोजअप्सही पाहण्यासारखे होते.
पण कळलंच नाही. मेहरा, देसाईंनी वापरून घेतलं. मुखर्जी, चोप्रांनी वेगळ्या भूमिकांसाठी क्वचित विचारलं. निहलानींनीशी अगदी चुकामूक होता होता भेट झाली. बेनेगलांशी लपाछपी सुरू आहे. फसवणूक स्वतःची झालीच. प्रेक्षकांचीही.
IFM
IFM
अखेर काहीतरी चमत्कार झाला. 'ए साला!..आपुन' पेक्षा 'मैं कोई लेखक नही हू.बागबान मेरी कहानी नही है'. असं काहीतरी वेगळं ऐकू आलं, हे समाधान होतं. 'फादरली फिगर' ची सेकंड इनिंग छान जमली खरी पण तोच तोपणाची भळभळ वाहणारी जखम 'एक रिश्ता', 'कभी खुशी कभी गम' मध्ये आणखी चिघळवली.
प्रत्येक सिनेमात बाप-मुलाचे गहिवरते प्रसंग. इकडचा उचलून तिकडे ठेवावा. पण चाललंय... नक्कीच काही वेगळं चाललंय. काहीतरी नवलाई आहे. 'लक्ष्य' नक्कीच काही वेगळं देऊन गेला. 'चीनी कम' असूनही चवदार होता. 'ब्लॅक' ने अभिनय उजळवला. मनापासून दाद मिळवून गेला. प्रेक्षक 'निशःब्द' झाले. 'पहेली' सुटली. हे खरं वेगळेपण. थोडं उशिराच असलेलं...
पण मध्येच 'बब्बन' बनून स्वतःचा 'गोपाळ' केला. घाव चाहत्यांच्या 'वर्मी' लागला. सिनेमानं 'राम' म्हटला. मोटारसायकली चालवून, उंचावरून उड्या मारून सुपरस्टारपद मिळतं. अभिनेतेपद नाही. नसीर, ओम पुरी, कमल हासन चे नुसते एक फुटी चेहरेच समोरच्याला खाऊन टाकतात. अख्खे सहा फूटही कधी कधी थिटे पडतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच. बघायला मिळेल एखादा कादंबरीकार?, एखादा वकील जो केवळ दमदार संवाद टाकेल आणि केस जिंकून देईल?, आणखी कुणीही जो केवळ मुद्राभिनयाने खिळवून ठेवेल? मिळेल का 'एखादा मैंने गांधी को नही मारा' साऱखा एखादी भूमिका? मासेसला खूप खूष केलं. आता क्लासेसचं भरपूर अपील घेऊऩ जाईल. तशा भूमिकांची सुरूवात तर झालेलीच आहे. पोटेन्शिअली अजून पाच वर्षं नक्कीच आहेत. ती आणखी अभिनयसंपन्न होतील का? तरूण दिग्दर्शक खास भूमिका लिहून घेत आहेत, हे खरं असेल तर व्हायलाच पाहिजेत..
बघू या. 'टाईम मशीन' काय करतंय, 'अल्लादीनचा दिवा' काही प्रकाश पाडतोय का? वेल डन टिल डेट. स्टिल समथिंग मोअर...