आजपासून सुरू जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

येथे आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला किदांबी श्रीकांत आणि स्पर्धेचे दोन वेळा कांस्य पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. भारताचे हे दोन्ही खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात असून त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करून नवीन इतिहास घडविण्याची संधी आहे.
 
सिंधुने 2013 आणि 2014मध्ये सलग कांस्य पदक जिंकले होते. मात्र, पुरूष वर्गात कोणत्याही खेळाडूला पदक जिंकता आले नाही. यंदाच्या मोसमात के. श्रीकांतने सलग दोन सुपर सीरीज जिंकल्याने या स्पर्धेत त्याच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा वाढल्या आहेत. मागील वर्षी दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या श्रीकांतने यावर्षी इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपनचा किताब जिंकून नवीन इतिहास रचला होता.
 
या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा थेट दुसऱ्या फेरीत कोरियाच्या किम ह्यू मिन किंवा इजिप्तच्या हदाया होस्नी हिच्याशी लढत होणार आहे. त्यानंतर उपान्त्यपूर्व फेरीत तिची लढत चीनच्या शून यू हिच्याशी होणार आहे.
 
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी के. श्रीकांत म्हणाला की, या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याबाबत मी विचार करत नसून, प्रत्येक स्पर्धेप्रमाणे एक-एक टप्पा पार करत पुढील रणनीती आखत खेळणार आहे. तसेच या स्पर्धेच्या तयारीसाठी मी ऑस्ट्रेलिया ओपननंतर अमेरिका आणि न्यूझीलंड ओपन स्पर्धेत सहभागी झालो नाही, असे त्याने सांगितले. पुरुष एकेरीत श्रीकांतशिवाय समीर वर्मा, अजय जयराम आणि बी. साई प्रणीत आदी खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती