महिला हॉकी विश्वचषकात भारताने पहिला सामना जिंकला आहे. कर्णधार सविता पुनियाच्या शानदार गोलकीपिंगच्या जोरावर टीम इंडियाने मंगळवारी शूटआऊटमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. पूर्ण वेळेनंतर 1-1 अशी बरोबरी राहिल्याने सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला. भारताची गोलकीपर आणि कर्णधार सविता पुनियाने शूटआऊटमध्ये अनेक गोल वाचवले. तसेच, सामन्यादरम्यान कॅनडाच्या खेळाडूंना गोल करण्यापासून रोखण्यात आले. सविताचा वाढदिवसही 11 जुलैला होता. भारतीय खेळाडूंनी तिला विजयाची भेट दिली.
भारतीय संघ पहिल्या क्वार्टरमध्येच 1-0 ने पिछाडीवर होता. कॅनडाच्या मॅडेलिन सेकोने 11व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. दोन क्वार्टर म्हणजेच हाफ टाइमपर्यंत कॅनडाच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये म्हणजेच चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने सतत काउंटर अॅटॅक सुरू ठेवला. याचा फायदा टीम इंडियाला मिळाला.नवनीत कौरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.