पॅरालिंपिक काय असतं? भारतीय पथकाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (09:51 IST)
ऑलिंपिक स्पर्धेच्या शानदार आयोजनानंतर टोकियो नगरी पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.ऑलिंपिक प्रमाणे दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.द इंटरनॅशनल पॅरालिंपिक कमिटीद्वारे खेळांचं आयोजन केलं जातं.
पॅरालिंपिक आणि हिवाळी ऑलिंपिक यामध्ये फरक आहे.शारीरिकदृष्या अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठी पॅरालिंपिक स्पर्धा होते.भारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत12 पदकं पटकावली आहेत.भारताने सुवर्ण,रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी 4 पदकं पटकावली आहेत.
यंदाच्या स्पर्धेत 54 सदस्यीय खेळाडूंचं पथक स्पर्धेत सहभागी होत आहे.देवेंद्र झझारिया आणि मयप्पन थांगवेलू पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी आतूर आहेत.1972 मध्ये जर्मनीत झालेल्या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
पॅरालिंपिक स्पर्धेचा इतिहास
पॅरालिंपिक या शब्दात पॅरलल अर्थात समांतर हा अर्थ दडला आहे.ऑलिंपिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरुप असतं.
सर ल्युडविक गटमन या डॉक्टरांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं प्रारुप पक्कं झालं.नाझी जर्मनीतून इंग्लंडला रवाना झालेल्या या डॉक्टरांनी स्टोक मँडव्हिले रुग्णालयात मणक्याच्या दुखापतींकरता विभाग सुरू केला होता.
पहिली पॅरालिंपिक स्पर्धा 1948 साली ब्रिटनमध्ये भरवण्यात आली होती. तेव्हा या स्पर्धेचं नाव स्टोक मँडव्हिले गेम्स असं होतं.दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेले काही सैनिकही या स्पर्धेत खेळले होते.16 पुरुष खेळाडूंसह काही महिला खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
ही स्पर्धा पॅरालिंपिक गेम्स या नावाने 1960 पासून सुरू झाली. रोम इथं झालेल्या या स्पर्धेत 23 देशातले 400 खेळाडू सहभागी झाले होते.
पॅरालिंपिक स्पर्धेच्या सुसूत्रीकरणासाठी 1989मध्ये द इंटरनॅशनल पॅरालिंपिक कमिटीची स्थापना करण्यात आली.
पॅरालिंपिक स्पर्धेचं बोधचिन्हात लाल, निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे.अगिटो म्हणजे लॅटिन भाषेत 'आय मूव्ह' असा अर्थ होतो.
गतीकेंद्रित खेळांना म्हणजेच जगभरातल्या पॅरालिंपिकपटूंना एकत्र आणणारं व्यासपीठ असं या चळवळीचं स्वरुप आहे.
पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय निकष असतात?
खेळाडूंच्या शरीरातील इंपेअरमेंट अर्थात अपंगत्वानुसार पॅरालिंपिकपटू विविध खेळांमध्ये सहभागी होतात.
पॅरालिंपिक स्पर्धेत दहा विविध अपंगत्व स्वरुपांचा विचार करण्यात येतो. याचे तीन उपप्रकार आहेत. फिजिअल इंपेअरमेंट (शारीरिक अपंगत्व),व्हिजन इंपेअरमेंट (दृष्टी अपंगत्व) आणि इंटलेक्च्युअल इंपेअरमेंट (बौद्धिक अपंगत्व)
काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्वअसलेल्या खेळाडूंना खेळता येतात मात्र काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात.
प्रत्येक प्रकारात, खेळाडूंच्या शारीरिक अपंगत्वाची पाहणी केली जाते.सर्व खेळाडूंना जिंकण्याची समान संधी असावी यादृष्टीने काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.
पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंचा विचार करून त्यांना खेळताना मदत व्हावी यासाठी काही सुविधा देण्यात येतात.
पराअॅथलिटना गाईड रनरची सुविधा देण्यात येते.व्हिज्युअली इंपेअर्ड सायकलपटूंना गाईडच्या बरोबरीने मार्गक्रमण करतात.त्यांना पायलट म्हटलं जातं.
व्हिज्युअली इंपेअर्ड जलतरणपटूंच्या मदतीसाठी टॅपर्स असतात.पोहताना कधी वळायचं किंवा शर्यतीचा शेवट झाला आहे हे सांगण्यासाठी टॅपर त्यांच्या डोक्यावर किंवा शरीराच्या भागाला स्पर्श करून सांगतात.
टोकियो इथं दुसऱ्यांदा पॅरालिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.1964 मध्ये टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धा झाली होती.यंदा या स्पर्धेत 160 देश आणि प्रदेशांचे मिळून 4,400 पॅरालिंपिकपटू सहभाही होणार आहेत.
अफगाणिस्तानचा दोन सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते सहभाही होऊ शकणार नाहीत.ऑलिंपिकप्रमाणे या स्पर्धेतही रेफ्युजी संघ असणार आहे.यामध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे.
कोरोना नियमावलीमुळे ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे पॅरालिंपिक स्पर्धाही प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल.मात्र टीव्हीच्या माध्यमातून विक्रमी प्रेक्षकसंख्येचं उद्दिष्ट गाठण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. 2016 पॅरालिम्पिक स्पर्धा 4.1 बिलिअन प्रेक्षकांनी पाहिली होती.
भारतात पॅरालिंपिक स्पर्धेचं थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स आणि युरोस्पोर्ट्स इंडिया वाहिनीवर होणार आहे.डिस्कव्हरी अॅपवरही स्पर्धा पाहता येईल.यंदाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत 22 खेळांच्या स्पर्धा होतील. बॅडमिंटन आणि तायक्वांदो या खेळांचं पॅरालिंपिक पदार्पण होत आहे.