यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत राफेल नदाल अपसेटचा बळी ठरला आहे. 22 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालचा अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोने 6-4, 4-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. यासह नदालचे यंदाचे तिसरे ग्रँडस्लॅम आणि कारकिर्दीतील पाचवे यूएस ओपन जिंकण्याचे स्वप्न भंगले. नदालने आपल्या कारकिर्दीत विक्रमी 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, चार यूएस ओपन, दोन विम्बल्डन आणि दोन ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे.
सोमवारी आर्थर अॅशे स्टेडियमवर खेळताना 24 वर्षीय नदालविरुद्ध तीन तास 31 मिनिटे झुंज दिली आणि शानदार खेळ केला. यूएस ओपनमध्ये चार वेळचा चॅम्पियन राफेल नदालचा पराभव करून टियाफोने दुसऱ्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 2018 मध्ये जॉन इस्नरनंतर या स्पर्धेत शेवटच्या आठमध्ये पोहोचणारा टियाफो हा पहिला अमेरिकन खेळाडू आहे.
लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर आंद्रे रुबलेव्हने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. आता रुबलेव्हचा सामना टियाफोशी होणार आहे.