अविश्‍वसनीय, जादूई विजेतेपद – रॉजर फेडरर

बुधवार, 19 जुलै 2017 (12:36 IST)
विम्बल्डनचे विजेतेपद आठव्यांदा जिंकल्यानंतर रॉजर फेडररला अश्रू आवरता आले नाहीत आणि ते स्वाभाविकच होते. त्याने 2012 मध्ये सातवे विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर गेल्या पाच वर्षांत दोन वेळा अंतिम फेरी गाठली. परंतु दोन्ही वेळा त्याला जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला. अपयशाची ही मालिका फेडररने या वेळी खंडित केली, तीही एकाच स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद करताना.
 
फेडररने त्याधी उपान्त्य फेरीत 11व्या मानांकित टॉमस बर्डिचला, उपान्त्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित मिलोस रायोनिचला, तर चौथ्या फेरीत 13व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला पाणी पाजले होते. तत्पूर्वी तिसऱ्या फेरीत झ्वेरेव्हला पराभूत करणाऱ्या फेडररविरुद्ध या स्पर्धेत एकाही प्रतिस्पर्ध्याला एकही सेट जिंकता आला नाही. विम्बल्डन स्पर्धेत बियॉर्न बोर्गनंतर (1976) ही कामगिरी करणारा फेडरर पहिलाच खेळाडू ठरला. त्यामुळेच या विजेतेपदाचे वर्णन फेडररने जादूई आणि अविश्‍वसनीय असे केले आहे.
 
सार्वकालिक महान टेनिसपटू असा लौकिक मिळविणाऱ्या रॉजर फेडररने आपल्या असामान्य कारकिर्दीत जिंकलेल्या एकूण 19 ग्रॅंड स्लॅम मुकुटांमध्ये विम्बल्डनच्या आठ, ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या प्रत्येकी पाच, तसेच फ्रेंच ओपन स्पर्धेतील एका मुकुटाचा समावेश आहे. त्याने एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकले आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून त्याने गेल्या पाच वर्षांचा ग्रॅंड स्लॅम मुकुटांचा वनवास खंडित केला.
 
इतकी वर्षे विजेतेपदाला वंचित राहूनही आपणकधीच निराश झालो नाही, असे सांगून फेडरर म्हणाला की, मी नेहमीच स्वत:वर विश्‍वास ठेवला आणि विम्बल्डन विजेतेपदाचे स्वप्न पाहणे कधीच थांबविले नाही. तरीही गेल्या वर्षीच्या पराभवानंतर मी पुन्हा हा करंडक उंचावू शकेन अशी खात्री मला वाटत नव्हती. आणि म्हणूनच आज आठव्यांदा विम्बल्डन जिंकताना जे काही घडले ते केवळ अद्‌भुत असल्याची माझी भावना आहे.
 
गेल्या वर्षीप्रमाणेच या वेळीही विम्बल्डननंतर दीर्घकाळ ब्रेक घेण्याची इच्चा असल्याचे सांगून फेडरर म्हणाला की, निवडक स्पर्धा खेळल्यामुळेच चांगली कामगिरी करता येईल असे मला वाटते. केवळ फ्रेंच ओपनच नव्हे तर संपूर्ण क्‍ले-कोर्ट मोसमातून सुट्टी घेतल्यामुळे विम्बल्डनसाठी मी ताजातवाना राहू शकलो. मला वाटते की या संपूर्ण स्पर्धेतील निकालांमधून माझा निर्णय योग्य असल्याचेच दिसून येते.
 
सिलिचची केली प्रशंसा 
सिलिचबद्दल सहानुभूती व्यक्‍त करताना फेडरर म्हणाला की, नियती काही वेळा किती क्रूर बनते याचे हे उदाहरण आहे. परंतु दुखापत होऊनही सिलिच ज्या प्रकारे झुंजला, त्यामुळेच तोच अंतिम लढतीचा खरा हीरो आहे असे मी म्हणेन. संपूर्ण स्पर्धेत सिलिचने केलेल्या अफलातून कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. सिलिचला उपान्त्य फेरीत अमेरिकेच्या सॅम क्‍वेरीविरुद्धच्या लढतीत डाव्या पावलाला झालेल्या ब्लिस्टर्सचा फटका अंतिम लढतीत बसला. पहिल्या सेटच्या अखेरीस लंगडणाऱ्या सिलिचला दुसऱ्या सेटनंतर मैदानावरच पायावर उपचार करून घ्यावे लागले, तेव्हा विम्बल्डन विजेतेपदाची संधी सुटल्याची जाणीव होऊन त्याला भावना आवरता आल्या नाहीत. सिलिचने याआधी 2014मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकताना आपला पहिला ग्रॅंड स्लॅम मुकुट पटकावला होता. मात्र त्यानंतर त्याला एकाही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचता आलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा