भारतीय महिला संघाने सोमवारी येथे जागतिक टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत उझबेकिस्तानचा पराभव केला, परंतु पुरुष संघाला यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अहिका मुखर्जी आणि श्रीजा अकुला यांना विश्रांती देण्यात आली असतानाही भारताने उझबेकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. अर्चना कामत आणि दिया चितळे यांनी संधीचा फायदा घेत आपले सामने जिंकले तर सिनियर सहकारी मनिका बत्रा यांनीही विजय मिळवत भारताला 3-0 असा विजय मिळवून दिला. अर्चनाने रिमा गुफ्रानोवचा 11-7, 11-3, 11-6 असा पराभव केला तर मनिकाने मर्खाबो मॅग्दिवाचा 11-7, 11-4, 11-1 असा पराभव केला.
दियाने चुरशीच्या लढतीत रोझालिना खडजिएवाचा 11-6, 10-12, 11-4, 11-6 असा पराभव करत भारताचा विजय निश्चित केला. चीनविरुद्ध 2-3 असा पराभव पत्करून आपल्या मोहिमेची सुरुवात करणारा भारतीय महिला संघ सलग दोन विजयांसह गट एकमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. गट एकच्या अंतिम सामन्यात मंगळवारी संघाचा सामना स्पेनशी होणार आहे. या संघाने गेल्या सामन्यात हंगेरीचा 3-2 असा पराभव केला होता.
पुरुष गटात अनुभवी शरथ कमल, विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी आपापल्या एकेरी लढती गमावल्या. त्यामुळे भारताला तिसऱ्या मानांकित कोरियाविरुद्धच्या गटातील तिसऱ्या सामन्यात 0-3 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.