रिओ ऑलिम्पिकचे पदक जिंकल्यानंतरही साक्षीचे पाय अद्याप जमिनीवरच आहे. यश तिच्या डोक्यात गेले नाही. तिच्या स्वभावातही तसूभर बदल झाला नाही. ती तिच्या गटात श्रेष्ठ आहे तरीही आमचे समीकरण चांगले जुळते. महणूनच मी अजूनही तिच्यासोबत सराव करते. आम्ही दोघीही एकमेकींना प्रोत्साहित करीत असतो, असे विनेश फोगाट म्हणाली.
गतवर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय कुस्तीपटू होण्याचा इतिहास रचला, परंतू विनेश दुर्देवी ठरली. गुडघ्याच्या विचित्र दुखापतीमुळे विनेशला ऑलिम्पिकला मुकावे लागले मात्र साक्षीबद्दल तिच्या मनात कोणतीही कटूता दिसत नाही.
मी कॅडेट गटापासून तिला ओळखते व आमची घट्ट मैत्री आहे. ती अजूनही माझ्यासोबतच सराव करते. ऑलिम्पिकनंतर जेव्हा मी दुखापतीतून बरी झाली तेव्हा साक्षीने मला विचारले की माझ्यासोबत सरावाला केव्हापासून सुरूवात करणार, असे तिने सांगतिले. आम्ही बर्याच काळापासून साथीदार आहोत आणि सरावादरम्यान आम्हा दोघींना एकमेकींचा फायदा होता, असे फोगाट म्हणाली.