राहुल जाधव : व्यसनाच्या विळख्यात अडकलेला 'गँगस्टर' कसा बनला मॅरेथॉन रनर?

शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (11:11 IST)
NITIN NAGARKAR/BBC
"माझं नाव राहुल जाधव. मी गँगस्टर होतो. मी एक अ‍ॅडिक्ट होतो."राहुल जाधव आपली ओळख करुन देताना ही तीन वाक्यं न चुकता उच्चारतात.राहुल जाधव यांच्याकडे पाहिलं तर आता या दोन्ही गोष्टींवर विश्वास बसणे कठीण आहे. पण त्यांच्याशी बोलल्यावर कळतं की, अथक परिश्रमानंतर त्यांनी गुन्हेगारी जग आणि व्यसनाच्या विळख्यातून आपली सुटका करुन घेतली आहे.मलेशियात असलेल्या डॉनसाठी काम करणारा एक पूर्वाश्रमीचा गँगस्टर आता तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याची प्रेरणा देत आहे. त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया.

पहाटे पहाटे त्यांचा दिवस सुरू होतो तो व्यसनमुक्ती केंद्रांमधूनच. तिथं आपल्या समोर बसलेल्या प्रत्येक रुग्ण, व्यसनाधीन व्यक्तीला ते आपला हा प्रवास आवर्जून सांगतात. ही ओळख सांगणारे राहुल जाधव आता व्यसनमुक्ती केंद्रासाठी समुपदेशक म्हणून काम करत आहेत.

राहुल यांचा जन्म झाला डोंबिवलीमध्ये. वडिलांच्या उत्पन्नावर घर चालायचं. पण राहुल यांना मात्र साद घालत होत्या घरासमोरच्या टोलेजंग इमारती आणि त्यातल्या मित्रांचं आयुष्य.त्यांचं स्वप्न होतं आपल्याला आदर मिळावा आणि ओळख मिळावी. यासाठी अभ्यासापासून ते खेळ अगदी अभिनयापर्यंत अनेक प्रयोग त्यांनी केले. हे करता करता आपल्याला हे जमत नाही, अशी नोंद त्यांच्या मेंदूने पक्की करुन घेतली.इतकी की आधी अभ्यासात चांगलं असलेले राहुल नंतर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या संगतीला लागले. जशी संगत बदलली तशा सवयीही.
 
अशीच चोऱ्या माऱ्या करणाऱ्यांशीही गाठ पडली. अधून-मधून व्यसन करणं सुरू झालं. पण हे सगळं करतानाच मोठं होऊन काही तरी करुन दाखवण्याचं स्वप्न मात्र डोक्यात पक्कं शिरलेलं होतं आणि त्याचा शोध देखील सुरू होता.वातावरण आणि वागणूक अशी की, कोणाकडूनच आदराची अपेक्षाही करता येत नसल्याचं राहुल सांगतात. हा 'आदर' शोधताना त्यांच्या आयुष्याने भलतीच कलाटणी घेतली.
 
गुन्हेगारी जगताकडे पावले वळली
राहुल सांगतात, “आमच्या बरोबर अजून एक मित्र होता, जो आमच्या पेक्षा मोठा होत. तो एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करायला जायचा. एका कॉम्प्लेक्समध्ये रहायचा. "टाय वगैरे घालून जायचा. लग्नही झालेलं होतं. इतका मितभाषी होता की, कधी त्याच्या तोंडातून एखादी शिवीसुद्धा बाहेर पडायची नाही.

एक दिवस या मित्राला मुंबई क्राईम ब्रँचवाले घेऊन गेले.”पुढे ते सांगतात, "पेपरमध्ये बातमी वाचून राहुल यांना कळलं की, या मित्रावर अनेक गंभीर गुन्हे होते. मैत्री अशी की, या मित्राला मदत करायला पाहिजे असं राहुल यांनी ठरवलं. त्याच्या बायकोकडून माहिती घेऊन राहुल अटकेतल्या या मित्राला भेटायला दादरच्या भोईवाडा कोर्टात गेले. आपण काय मदत करू शकतो असं विचारलं. मित्राने एक नंबर देत 'शेठ'ना फोन करुन पैसे मागवायला सांगितले."
 
राहुल सांगतात, "त्याने दिलेला नंबर मलेशियाचा होता. मुंबईतून मलेशियात गेलेल्या एका डॉनचा. हा डॉन मुंबईत काहीही घटना झाली की न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलला फोन करुन त्याची जबाबदारी घ्यायचा डॉन माझ्याशी खूप आदराने बोलला. मला अपेक्षित नव्हतं. मला माझ्या परिसरातही कोणी विचारत नव्हतं. अचानक इतक्या मोठ्या माणसाने मला रिस्पेक्ट दिल्यावर मी पण थोडा हवेत गेलो. आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे 20-25 लाख रुपये हवालाद्वारे पाठवले.”

मित्र जामिनावर बाहेर आला आणि त्याने या मदतीची परतफेड म्हणून जाधवांना काही पैसे देऊ केले. उत्पन्नाचं साधन शोधत असलेल्या राहुल यांना हे अनपेक्षित होतं. पण आपण हे काम केलं तर आपल्याला उत्पन्न आणि आदर मिळेल असं त्यांच्या डोक्यात आलं.उत्पन्नाचं साधन शोधत असतानाच अचानक या साऱ्या गोष्टी राहुल यांच्यासमोर आल्या.
 
ते सांगतात, "डोक्यात विचार आला की आता आपली या डॉनशी ओळख झाली आहे. त्याच्याकडून पैसेदेखील मिळत आहेत. मग हेच काम केलेलं काय वाईट. या व्यवसायात असणाऱ्या लोकांचा देखील आदर होतोच. भलेही तो भीतीयुक्त आदर का असेना. मला हा आदर हवा होता आणि हा मार्ग निवडला."हवाला, खंडणी गोळा करणे, हत्यारांची खरेदी-विक्री इत्यादी कामे राहुल करू लागले.

ते ज्या डॉनसाठी काम करत होते, त्यांची टोळी फुटली आणि त्यानंतर त्यातल्या एकाची निवड केल्यावर कामाचं हे स्वरूप बदललं. राहुल जाधव सांगतात, "नवीन ग्रुपमध्ये विश्वासू लोक कमी होती. जे होते त्यांना पोलीस पकडत होते. नवीन लोक होते ज्यांना ही कामं जमत नव्हती. मला त्यांच्याकडून काम करुन घ्यावं लागत होतं आऊटसोर्सिंग चालू झालं."
 
"मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये शुटर्सची कमी होती म्हणून आऊटसोर्सिंग चालू झालं. काही लोकांना काम जमत नव्हतं मग मला स्वतःला काम करावं लागलं. पूर्वी लॉजिस्टिक्स मध्ये होतो. मग मला समोर यावं लागलं. समोर यायला लागल्यावर माझ्या मनावरील तणाव वाढला, भीती वाढली,” असं राहुल सांगतात.
या भीतीवर मात करण्यासाठी व्यसनाची सुरुवात झाली. पण ते व्यसन दिवसेंदिवस वाढतच गेलं.
 
"मी जो ओकेजनल सोशल ड्रिंकर (अधून-मधून मद्यपान करणारा) होतो, तो रेग्युलर क्रॅानिक अल्कोहोलिक झालो. कारण भीती होती की पोलीस मारून टाकतील. विरुद्ध टोळीतले लोक मारुन टाकतील. असुरक्षित आयुष्य होतं. त्यामुळे ते विसरण्यासाठी सारखं दारू प्यायला लागलो. आता दारू चढायची बंद झाली. मग इंग्लिश वरुन देशीवर आलो. देशी चढायची बंद झाली. मग त्याच्यावर चरस घेऊ लागलो."
 
'असा अडकलो व्यसनाच्या विळख्यात'
एक-एक व्यसन करताना कुठल्याच व्यसनाचा परिणाम होत नव्हता असं राहुल सांगतात.
"चरस पण चढत नव्हतं. मग त्याच्यावर बटन्स म्हणजे ट्रायका नायट्रागेट, नायट्राटेन चालू केलं. एवढ्या गोळ्या घेतल्यावर जेवण जात नव्हतं. अशक्त झालो. माझं वजन 40-42 पर्यंत आलं.
 
"एवढा अशक्त झाल्यावर मला काम करायला जमत नव्हतं. मी आक्रमक व्हायला लागलो. मग माझ्याबरोबर सगळ्यांनी दारू प्यायचं बंद केलं. मी एकटा पडायला लागलो. कधी कधी माझ्या हातून चुका व्हायच्या," राहुल आपल्या आयुष्याची व्यथा मांडतात. त्याचा परिणाम असा झाला की मित्र तर दुरावले. पण ज्याच्यासाठी काम सुरू होतं त्या डॉनचाही विश्वास कमी झाला. अशातच फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांना मुंबई क्राईम ब्रँचनी अटक केली. अटक केली तेव्हाही राहुल नशेतच होते.
 
राहुल सांगतात, "पकडलं तेव्हा मला माहीत नव्हतं की मला पकडलंय. जाग आली तेव्हा मी लॉकअपमध्ये होतो. लॉकअपमध्ये मला विथड्रॉल सिंप्टम्स (व्यसन न केल्यामुळे व्यसनींना होणारा त्रास) सुरू झाले. पोलिसांना मी म्हणलं मला दारू द्या. पोलीस म्हणाले तू काय लग्नाला आलाय का की तुला दारू द्यायची. मी म्हणालो दारू दिली नाही तर मला कसंतरी होतं. ते हसायला लागले. पण मला त्यांना समजावून सांगता येत नव्हतं. त्यांना समजावून सांगत होतो मला चरस तरी द्या. त्यांनी सिगरेट दिली प्यायला.”

काही काळाने तुरुंगातून सुटका झाली. पण व्यसन मात्र सुटत नव्हतं. मग मात्र त्यांचा पालकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना डॉ. आनंद नाडकर्णींच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थमध्ये नेलं. तिथं डिटॉक्सिफिकेशन झालं.
 
पण राहुल यांची अवस्था पाहता डॉ. नाडकर्णींनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना पुढे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात अ‍ॅडमिट करण्याचा सल्ला दिला. मे 2013 मध्ये राहुल जाधव मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाले. इथे ते उपचार घ्यायचे.

राहुलचा व्यसन सोडवण्याचा निश्चय व्हायचा. पण बाहेर गेलं की, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की पुन्हा व्यसनाला सुरुवात व्हायची. हे चक्र थांबत नव्हतं. त्यात पोलिसांचा ससेमिरा सुटत नव्हता. जे. डे. खून खटल्यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागत होतं. आणि त्यातून मग काम मिळणं अवघड होत होतं.

अशा परिस्थितीमध्ये घरी राहून आईवडिलांना राहुल मदत करायला लागले. पण त्यातही लोकांचे टोमणे थांबत नव्हते. राहुल सांगतात, "बाहेर लोक म्हणत होते की, हा समाजाला लागलेली कीड आहे. इथे पण आजूबाजूने ऐकायला येत होतं की, हा या घराला लागलेली कीड आहे. तर मग माझ्या डोक्यात आलं की, मी किडा आहे तर मी या माणसांमध्ये काय करू.

"माझी जागा इथे नाही. मी तिथे जातो. मी मुक्तांगणमध्ये काऊन्सिलरला फोन केला तुम्ही काय मला बाहेर पाठवू नका. मी तिथेच येतो."राहुल मुक्तांगणमध्ये आले आणि त्यांनी पडेल ते काम करायला सुरुवात केली. आधी वॉर्ड सुपरवायझर त्यानंतर हाऊसकिपिंगचं काम त्यांनी केलं.
 
टॉयलेट्स साफ करण्याचं कामही त्यांनी केलं. हेतू होता की व्यसन सोडायचे. अशात जे जास्त काळ केंद्रात राहिले आहेत अशांची बैठक सुरू असताना मुक्ता पुणतांबेकर यांनी त्यांना विचारलं की, कोणाला मॅरेथॅानमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे का? राहुल यांनी लगेचच तयारी दाखवली. ते सांगतात, "मुक्ताताई म्हणाल्या तुला काय अनुभव आहे का धावायचा? मी म्हणालो इतके वर्षं मी धावलोय पोलिसांपासून. एकदा मी लॉक अपमधून पळालो. एकदा कोर्टातून पळालो. पळता येतं. बाकी काय येतं का नाही माहीत नाही. मला पळता येतं."

तयारी झाली आणि मॅरेथॅानमध्ये सहभाग घेतला. या मॅरेथॅानमध्ये धावतानाच सोबतची एक व्यक्ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यांना उचलायला धावलेल्यांमध्ये राहुल जाधवही होते. "त्याला उचललं आणि अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि पुन्हा धावायला लागलो. विचार करायला लागलो यार मी एकाला वाचवलं. इथं मी लोकांना धमकावत होतो, मारत होतो मग मी याला वाचवलं कसं काय?”

आजवरच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण असल्याचं राहुल जाधव सांगतात. या धावण्याची सवय होत होती. पण तरीही आपण काय करायचंय याचं उत्तर मात्र त्यांना सापडलं नव्हतं. हेच उत्तर शोधता शोधता ते मॅरेथॅान पेक्षाही जास्त अंतर धावले. उत्तर सापडलं ते वेगळंच."विचार करत मी धावत होतो. विश्रांतवाडी, पिंपरी चिंचवड असं करत लोणवळा स्टेशनपर्यंत पोहोचलो. अंदाजे 63 किलोमीटर साडेसहा तासात धावलेलो.
 
'माझी आनंदाची व्याख्याच बदलली'
"मॅरेथॉनसाठी 42 किमी धावण्याची प्रॅक्टिस करावी लागते. मी सहजपणे 63 किलोमीटर धावलो आणि मला रिलॅक्स वाटलं. मला इतकं रिलॅक्स वाटलं की जेव्हा दारू, दारूवर चरस, चरसवर नायट्राच्या 10 गोळ्या घ्यायचो. त्यावेळी जसा आनंद मिळायचा तसा आनंद मला 63 किमी धावल्यावर मिळाला. माझी आनंदाची, समाधानाची व्याख्याच बदलली. मला खूप मजा आली."
 
एकीकडे धावणं सुरू झालं दुसरीकडे करियरचा प्रवासही. मुक्तांगणमध्येच त्यांना समुपदेशनाची जबाबदारी दिली गेली. समुपदेशन करता करता त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.आता ते 9 व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनमुक्ती समुपदेशक म्हणून काम करत आहेत.
 
राहुल सांगतात, "जेलमध्ये होतो मला सुटण्याची आशा नव्हती. मी जेलमध्ये जायच्या आधी मी विचार केला नव्हता की मी जेलमध्ये जाईन. आधीच मरुन जाईन, असं वाटायचं. जेलमधून सुटल्यावर परत अ‍ॅडिक्शन चालू झालं. माझं आयुष्य हे असंच गटारातल्या किड्यासारखं राहणार आहे असं वाटत होत होतं. मग मुक्तांगणमध्ये आलो. पुढे असं वाटत होतं लग्न होईल का नाही. कोणी मुलगीच देत नव्हतं. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर मला असुरक्षितता जाणवत होती. माझं होईल का नाही आणि झालं शेवटी.”

आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल ते सांगतात, "आता माझी ओळख बदलली आहे. माझं नाव राहुल जाधव. मी एक क्रिकेटप्रेमी होतो. त्यानंतर एक फुटबॉल प्रेमी होतो. एक चांगला गोलकीपर होतो. त्यानंतर मी अ‍ॅडिक्ट होतो. मला अ‍ॅडिक्ट म्हणून ओळखतात आणि गँगस्टर म्हणून देखील ओळखतात.

मला पोलिसांनी बऱ्याच केसेसमध्ये अटक केली होती. त्यानंतर मी मुक्तांगणमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर मी आता एक रनर म्हणून ओळखला जातो. एक काऊन्सिलर म्हणून ओळखला जातो. सोशल वर्कर म्हणून ओळखला जातो. मी एक चांगला नवरा आहे. चांगला मुलगा आहे. आणि आता मी एक चांगला नागरिकही आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती