प्रज्ञानानंदा बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, जाणून घ्या त्याचा प्रवास
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (07:33 IST)
Twitter
Pragnanananda :भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाला बुद्धिबळ विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता त्याची अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनशी लढत होणार आहे.
विश्वनाथन आनंदनंतर या सर्वोच्च पायरीपर्यंत जाणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे.
कारुआनाला त्याने 3.5-2.5 असे पराभूत केले.
विश्वनाथन आनंदने ट्वीटर म्हणजे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रज्ञानंदचं कौतुक केले आहे. ''प्रज्ञानंद अंतिम फेरीत पोहोचला, त्याने फॅबियानो कारुआनाला टायब्रेकवर पराभूत केलं आणि आता तो मॅग्नस कार्लसनशी लढत होईल. काय भारी कामगिरी आहे!'' असं त्यांनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्रज्ञानानंदा कोण आहे आणि त्याचा आतापर्यंत प्रवास कसा झाला आहे, तो कसा घडला?
प्रज्ञानानंदा फक्त बारा वर्षांचा होता तेव्हा त्याला बुद्धिबळातला ग्रँडमास्टर होण्याचा मान त्याला मिळाला होता. भारतात तर ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला होता.
पण, जगभरात हा मान पटकावण्याची त्याची संधी फक्त तीन महिन्यांनी हुकली. 12 वर्षं, 10 महिने आणि 12 दिवसांचा असताना त्याने हा किताब जिंकला.
इटलीतल्या ऑस्टिसी शहरात ग्रेडाईन ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या फायनल पूर्वीच प्रज्ञानानंदा आवश्यक ते एलो गुण मिळवले. आणि ग्रँडमास्टर किताब आपल्या नावावर केला.
सोळा वर्षीय इराणी खेळाडू आर्यन घोलामी याचा पराभव करत तो आठव्या राऊंडमध्ये पोहोचला होता. त्यानंतर त्याने इटालियन ग्रँडमास्टर मोरोनी ल्युका ज्यनिअर यांचा पराभव केला.
हे दोन्ही खेळाडू फिडे (जागतिक बुद्धिबळ संघटना) क्रमवारीत खूपच वरच्या क्रमांकावर असल्यामुळे प्रज्ञानानंदाला ग्रँडमास्टर किताब मिळाला.
ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी 2482 पेक्षा जास्त एलो रेटिंग असलेल्या खेळाडूला हरवावं लागतं. ही कामगिरी प्रज्ञानानंदाने या स्पर्धेत केली.
प्रगल्भ आणि सुहास्य चेहरा
अगदी तेरा वर्षांचा होण्यापूर्वीच प्रज्ञानानंदाने खेळातला एक कसलेला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या आधी युक्रेनचा सर्जेई कारजकिन 12 वर्षं आणि 7 महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर झाला होता.
सर्जेई ग्रँडमास्टर झाला ते वर्षं होतं 2002.
प्रज्ञानानंदाचा आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे त्याचे वडील रमेश बाबू यांच्यामुळे. रमेश बाबू स्वत: पोलिओग्रस्त आहे.
रमेश बाबू तामिळनाडू सरकारच्या सहकारी बँकेत चेन्नईमध्ये काम करतात. प्रज्ञानानंद आणि त्याची मोठी बहीण यांना बुद्धिबळाच्या स्पर्धांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या पत्नी नागालक्ष्मी यांच्यावर येऊन पडतं.
प्रज्ञानानंदाची बहीण वैशाली सुद्धा बुद्धिबळ खेळते. आणि त्याच्याबरोबर इटलीतल्या स्पर्धेत तिनेही भाग घेतला. तिथे दुसऱ्या क्वालिफायर फेरीपर्यंत ती पोहोचली होती.
आता पुढच्या स्पर्धेत तिने तिसरी क्वालिफायिंग फेरी पार केली तर ती ही ग्रँडमास्टर होईल.
"माझी मुलगी वैशाली बुद्धिबळाच्या क्लासला जायची. तिचा खेळही चांगला आहे. पण, खेळात मोठी उंची गाठायची असेल तर तुम्हाला स्पर्धेसाठी दूरचा प्रवास करावा लागणार.
घरची आर्थिक परिस्थिती बघता मी प्रज्ञानंदाला बुद्धिबळापासून दूर ठेवायचंच ठरवलं होतं. पण, तो 4 वर्षांचा होता तेव्हापासून तो आपल्या बहिणीबरोबर बुद्धिबळ खेळायला लागला.'' प्रज्ञानानंदाच्या वडिलांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
''आपल्या वयाच्या मुलांबरोबर खेळण्यापेक्षा तो बुद्धिबळाच्या पटावरच्या 64 घरांमध्ये जास्त रमायचा.''
"प्रज्ञानानंदा आणि त्याच्या बहिणीमध्ये चार वर्षांचं अंतर आहे.त्यामुळे पहिल धडे त्याने बहिणीकडूनच गिरवले." वडिलांनी आम्हाला आणखी माहिती दिली.
असा घडला प्रज्ञानानंदा
"पोलिओमुळे मला लांबचा प्रवास करता येत नाही. मग माझी पत्नी मुलांबरोबर जाते. दोन्ही मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यामुळे केंद्र सरकार आणि बुद्धिबळ अकॅडमीकडूनही आर्थिक मदत मिळते.
त्यामुळे आशियाई स्तरावरच्या स्पर्धा मुलं खेळू शकली.
सुरुवात मात्र सोपी नव्हती. मला कर्ज काढून पैसे उभारावे लागले. पण, माझी गरिबी मुलांच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं वाटायचं," ते म्हणाले.
रमेश बाबू यांचं कुटुंब चेन्नई शहराच्या सीमेबाहेर राहतं. घरात सगळीकडे मुलांनी जिंकलेले कप आणि पदकं आहेत. 2015मध्ये चेन्नईत आलेल्या पुरात काही कप वाहून गेले.
प्रज्ञानानंदाने आठ वर्षांखालील गटातली जागतिक चॅम्पियनशिप 2013मध्ये जिंकली. पुढे दोनच वर्षांनी तो दहा वर्षांखालील मुलांच्या गटात विजेता ठरला.
पाचव्या वर्षी स्पर्धेला सुरुवात केलेला प्रग्नानंदा दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर झालेला होता. तेव्हा तो वयाने सगळ्यात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर होता.
भारतीय बुद्धिबळ संघाचे कोच आर बी रमेश यांनीही प्रज्ञानंदाला मार्गदर्शन केलं आहे.
"आंतरराष्ट्रीय मास्टर झाल्यानंतर पुढचं लक्ष्य होतं ते ग्रँडमास्टर होण्याचं. त्यासाठी काही कठोर नियम आणि अटी आहेत. त्यानुसार एलो रेटिंग मिळवणं हे आव्हान होतं.
शिवाय तीन प्रकारच्या स्पर्धांसाठी पात्र ठरावं लागतं. तिथे जिंकावं लागतं." ग्रँडमास्टर होण्याचे नियम आर बी रमेश यांनी बीबीसी तामिळला समजावून सांगायला सुरुवात केली.
"गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने इटलीतली चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. हा पहिला टप्पा होता. तिथे त्याला पहिलं सर्टिफिकिट मिळालं. 2018मध्ये हेराक्लिऑन स्पर्धेत त्याने दुसरा टप्पाही पूर्ण केला.
आणि आता इटलीमध्येच ग्रेडाईन स्पर्धा जिंकून तीनही टप्पे त्याने पूर्ण केले."
प्रज्ञानानंदाच्या खेळाचं वैशिष्ट्य काय?
या प्रश्नावर कोच यांचं उत्तर होतं,"क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे तीन भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल तर शेवटही तुम्ही चांगला कराल.
तीनही स्पर्धांमध्ये प्रज्ञानानंदाने तेच करून दाखवलं."
ग्रँडमास्टर किताबाचं महत्त्व
"ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. आणि लहान वयात ती मिळवणं सोपंही नाही. सगळ्यात लहान ग्रँडमास्टर आहे सर्जेई. त्याने मॅग्नस कार्लसनला हरवलं आहे.
कार्लसन स्वत: 13 वर्षांचा होता जेव्हा ग्रँडमास्टर झाला. आपला खेळ असाच सुरू ठेवला तर प्रग्नानंदालाही चांगली संधी आहे." कोचनी सांगितलं.
"बुद्धिबळ खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं. आता ग्रँडमास्टर झाल्यावर अशा निमंत्रितांच्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रज्ञानानंदाला बोलवतील.
आणि त्यातून त्याला चांगलं व्यासपीठ मिळेल."
"प्रज्ञानानंदाने खेळ सुरू केला तेव्हा त्याला त्याच्या बहिणीला हरवायचं होतं. आता त्याला जागतिक चॅम्पियन व्हायचं आहे. हे खरंच मोठं स्वप्न आहे." असं म्हणताना त्याच्या वडिलांचे डोळेही स्वप्नाळू झाले होते.