खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशात आयोजित केली जाणार आहे. यामध्ये देशातील सहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशातील आठ शहरांव्यतिरिक्त दिल्लीत हे कार्यक्रम होणार आहेत. भोपाळमधील तात्या टोपे नगर स्टेडियमवर 30 जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा होणार आहे. तर, 11 फेब्रुवारीला भोपाळमध्येच समारोप सोहळा होणार आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मशाल, थीम सॉन्ग आणि शुभंकराचे अनावरण भोपाळ येथील शौर्य स्मारक येथे करण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रिमोटचे बटण दाबून युवा खेळांच्या थीम सॉंगचे अनावरण केले आणि अमरकंटक टॉर्चला रवाना केले. तेव्हा शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, जानेवारी हा मध्य प्रदेशसाठी सुवर्ण महिना आहे. या महिन्यात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे मध्य प्रदेशात जल्लोष आणि उत्साह आहे. युवा खेळांच्या संघटनेमुळे राज्यात खेळाचे वातावरण आहे.