पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर

गुरूवार, 27 जून 2024 (00:45 IST)
हॉकी इंडियाने अखेर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 16 सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या संघाचे कर्णधारपद अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग सांभाळणार असून हरमनप्रीत तिसऱ्यांदा  ऑलिम्पिक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.हार्दिक सिंगची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते.टीम इंडियाला आगामी ऑलिम्पिक गेम्समध्ये पूल बी मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांव्यतिरिक्त बेल्जियमच्या संघाचा समावेश आहे.
 
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी जाहीर झालेल्या भारतीय हॉकी संघात अनुभवी खेळाडू पीआर श्रीजेश गोलरक्षकाची जबाबदारी सांभाळेल, तर मनप्रीत सिंग मिडफिल्डर असेल. कर्णधार हरमनप्रीत सिंगशिवाय बचाव संघात हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित आणि संजय या खेळाडूंचा समावेश आहे. अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि गुरजंत सिंग यांच्या नावाचा फॉरवर्ड खेळाडूंमध्ये समावेश आहे. 
 
भारतीय संघ 27 जुलैला न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर 29 जुलैला संघाचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना 30 जुलैला आयर्लंडशी, 1 ऑगस्टला बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
 
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय हॉकी संघ
गोलरक्षक – पीआर श्रीजेश.
बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय.
मिडफिल्डर - राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद.
फॉरवर्ड - अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग.
पर्यायी खेळाडू - नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक.
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती