भारताने हॉकीच्या आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषक जिंकला.साखळी फेरीतले सर्व सामने आणि सर्वोत्तम ४ गटात अपराजित राहण्याचा विक्रम केल्यानंतर भारतीय संघ मलेशियावर मात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून भारताने आपल्या खेळात आक्रमकता ठेवली होती. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या ताळमेळाचं उत्तम उदाहरण अवघ्या तिसऱ्या मिनीटाला दिसून आलं. एस. व्ही. सुनील आणि रमणदीप सिंह यांनी रचलेल्या सुरेख चालीचं रुपांतर गोलमध्ये झालं. तिसऱ्या मिनीटाला मिळालेल्या या आघाडीमुळे भारताचा संघ सामन्यात वरचढ झालेला पहायला मिळाला. यानंतर पहिल्या सत्रात भारताने मलेशियाला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही.