भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तत्पूर्वी, शनिवारी देशाच्या मुलींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात आला. या विजयानंतर हॉकी इंडियाने ट्विट करून प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.
सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर ताबा राखला. जपानही जोरदार प्रयत्न करत होता पण भारताची गोलरक्षक सविता पुनियाने जपानचे प्रयत्न हाणून पाडले. पूर्वार्धाच्या अखेरीस जपानला अनेक पेनल्टी शूटआऊट मिळाले पण सवितासह संघाने सर्व पेनल्टी फेल करत गोल होण्यापासून वाचवले. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दुसरा गोल केला. यानंतर लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यांनी शेवटच्या क्षणी आणखी दोन गोल केले, ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला.भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सविता पुनिया म्हणाली की खूप छान वाटत आहे.