सानियाने रचला इतिहास

सोमवार, 13 जुलै 2015 (10:41 IST)
सानिया-हिंगीसची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने विम्बल्डनच्या कोर्टवर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सानियाने तिची स्वीत्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने महिला दुहेरीच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सानियाचं हे पहिलंच विम्बल्डन ग्रँडस्लॅम असून असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय टेनिसपटू ठरली आहे. दरम्यान, मार्टिनाने तब्बल १७ वर्षांनंतर हा मान पुन्हा मिळवला आहे.
 
सानिया-मार्टिना जोडीने रशियाच्या एकाटेरिना मकारोवा-एलेना वेस्नीना जोडीचा ५-७, ७-६ (७-४), ७-५ असा पराभव केला. तब्बल २ तास ४७ मिनिटं हा सामना चालला. सानिया-मार्टीना जोडीने पहिला सेट ५-७ असा गमावला. मात्र हा सेट गमावूनही बॅकफूटवर न जाता दुस-या सेटमध्ये सानिया-मार्टिनाने सुरेख खेळ केला. हा सेट अत्यंत चुरशीचा झाला. शेवटी टायब्रेकरवर ७-४ अशा फरकाने सेट जिंकून सानिया-मार्टिनाने बरोबरी साधली. तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही बाजूने आक्रमक खेळ झाला. या सेटमध्ये ५-५ अशी स्थिती असतानाच काळोखामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर ऑल इंग्लंड क्लबचं छत बंद करून सामना पुन्हा सुरू करण्यात आला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर सानिया-मार्टिना जोडीने लागोपाठ दोन गेम जिंकत विजयाला गवसणी घातली. 
 
विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीत जेतेपद मिळवणारी सानिया ही पहिली भारतीय टेनिसपटू ठरली असून सानिया-मार्टिना जोडीला बक्षीस म्हणून तब्बल ५.४७ लाख डॉलर ( ३ कोटी ३४ लाख रुपये) एवढी घसघशीत रक्कम आणि चषक मिळाला आहे. 
 
दरम्यान, सानियाने यापूर्वी महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत ऑस्टड्ढेलियन ओपन (२००९) आणि फ्रेंच ओपनचे (२०१२) विजेतेपद मिळवले आहे. तर, गेल्या वर्षी तिने ब्रुनो सोअर्ससह अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. सानियाने आपल्या पूर्ण कारकीर्दीत बक्षीसरूपात ५० लाख डॉलर्स (३१ कोटी ६० लाख रुपये) एवढी कमाई केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा