भारताला ‘सुवर्ण’संधी

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (07:17 IST)
सुवर्णपदकाची आशा; सिंधूचे रौप्य निश्चित
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅड‍मिंटन महिला एकेरीत भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित झाल्या असून उपांत्य फेरीत गेलेल्या पी.व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे आहे. 
 
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2013 आणि 2015 असे सलग दोनवेळा कांस्यपदक जिंकणार्‍या सिंधूच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे सोशल मीडियावर सिंधूवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
 
आक्रमक सुरूवात केलेल्या पी. व्ही. सिंधूने पहिल्या सेटमध्ये 19-18 अशा फरकाने आघाडी घेत विजयाचे संकेत दिले. ओकुहारावर दबाव ठेवत खेळणार्‍या सिंधूच्या आक्रमक पवित्र्याला सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत ओकूहाराने 18 गुणांपर्यंत मजल मारत अंतर कमी करण्यात यश मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सुरवातीच्या टप्प्यात जपानी प्रतिस्पर्धी चिवट प्रतिकार करीत होती, त्या वेळी तर एक रॅली पाऊण मिनीट आणि ३९ स्ट्रोक्‍सपर्यंत चालली. दुसरी गेम 11-10 अशा स्थितीत असताना प्रशिक्षक गोपीचंद यांनी दिलेला सल्ला फायद्याचा ठरला. त्यांनी तिला ताकदीने खेळायला सांगितले. सिंधूने इथेच ‘टॉप गिअर’टाकला. सलग 8 गुणांची आघाडी घेऊन सिंधूने आक्रमणाचा खरा अर्थ समजावून सांगितला. 
 
पण, सिंधूने आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी फटक्‍यात राखलेले वैविध्य, तसेच क्रॉस कोर्टस्‌चा केलेला खुबीने वापर या बाबी महत्त्वाच्या ठरत होत्या. 
 
निकाल
पी. व्ही. सिंधू वि.वि. ओकुहारा नाजोमी 
21-19, 21-10  
 
अंतिम लढत
पी. व्ही. सिंधू वि. कॅरोलिन मरिन
सायंकाळी 7.30 वा. (भारतीय प्रमाणवेळ)

वेबदुनिया वर वाचा