सलामीवीर विरेंद्र सेहवागला निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडून स्वत:स सिद्ध करण्याची शेवटची संधी दिली आहे. आता त्याच्यासमोर लौकीकास साजेसा खेळ करून निवड सार्थ ठरवण्याचे आव्हान आहे.
सेहवागने कसोटी पर्दापण केल्यापासून पन्नासच्या सरासरीने धावा केल्या. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. तो खेळपट्टीवर येतो अनियंत्रित फटकेबाजी करतो आणि 20-30 धावसंखेवर नाहक विकेट गमावून बसतो. पर्यायाने भारतीय फलंदाजीस खिंडार पडण्यासोबतच तो स्वत:वरीही अन्याय करून बसतो. दोन वर्षापासून प्रतिभेशी न्याय करू शकणारी खेळी तो करू शकलेला नाही. त्याला दृष्ट लागल्यासारखे झाले असून सर्व हळहळ करत बसतात.
नाहीतर मुल्तानचा सुल्तान म्हणून ख्याती असलेल्या या नवाबाचा फोडून काढणारी फटकेबाजी पाहयला कुणाला आवडणार नाही. तो मैदानावर आला की सेहवाग आजतरी पूर्वी खेळायचा तसा खेळेल म्हणून सर्वजण आस लावून बसलेले असतात. भल्याभल्या गोलंदाजांना सीमापार करून तो झलकही दाखवतो मात्र पुढच्याच क्षणास आत्मघातकी फटका खेळून बाद होऊन तंबूत परततो आणि याचबरोबर सर्व आशांवर पाणी फेरल्या जाते.
शीखरावर पोहचल्यावर यश पचवणे व ते कायम राखणे खडतर आव्हान असते. मोठे खेळाडू हे साध्य करण्यात यशस्वी होतात, यातच त्यांची महानता असते. सेहवागही त्या पंक्तित आला होता, मात्र नकळतपणे अचानक बाजूला होऊन बसला. जणूकाही त्याच्या मनाने महानतेस ठोकर मारून फकीर बनण्याचा बेत केला असावा. नियतीच हे घडवून आण आहे की सेहवागच नियती ठरवत आहे, हे कोडे अवघड होऊन बसले आहे.
सेहवागची प्रतिभा व लौकिक बघूनच चाहत्यांप्रमाणेच निवडकर्त्यांनीही त्यास परत एकदा प्रोत्साहित केले आहे. सेहवागचे मन त्यास कसा प्रतिसाद देते हे पंधरा दिवसात स्पष्टच होईल.