सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.
गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.