सर्पदोष दूर करणारे नागचंद्रेश्वर मंदिर

शुक्रवार, 24 जुलै 2020 (16:53 IST)
महाकाल नगरी उज्जैनला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात आपल्याला एक नवीन मंदिर सापडेल. परंतु, या मंदिरांपेक्षा नागचंद्रेश्वराचे मंदिर अगदी निराळे आहे. महाकालच्या शिखरावर बांधलेल्या या मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडले जातात. ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी! यामुळे नागराज तक्षकाचे दर्शन दुर्लभ मानले जाते. या दिवशी दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांची गर्दी आपल्याला दिसते. एका दिवसात अंदाजे दीड लाख भाविक नागराजाचे दर्शन घेतात.
 
मंदिरात शिवशंभूची प्रतिमा आहे. या प्रतिमेत शिवशंकर 
 
आपल्या संपूर्ण कुटूंबासह नाग सिंहासनावर बसलेले आहेत. भगवान विष्णूऐवजी भोलेनाथ सर्पशय्येवर विराजमान आहेत असे जगातील हे एकमेव असे मंदिर आहे. मंदिरातील मूर्तींमध्ये शंकर, गणेश आणि पार्वतीबरोबर दशमुखी सर्पशय्येवर आहेत. शिवशंभूच्या गळ्यात आणि हातात भुजंग लपेटलेला आहे. सर्पराज तक्षकाने शिवशंकराची घोर तपस्या केली होती. या तपस्येमुळे प्रसन्न होऊन भोलेनाथाने तक्षकाला अमरत्वाचे वरदान दिले. वरदानानंतर तक्षकराजाने भगवान शिवाच्या सानिध्यातच राहण्यास सुरवात केली, असे पुराणात सांगितले आहे.
 
हे मंदिर खूप प्राचीन असून इ.स. 1050 मध्ये राजा परमार भोज याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर शिंदे घराण्याचे महाराज राणोजी शिंदे यांनी 1732 मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोंद्धार केला त्यावेळी या मंदिराचा देखील जिर्णोंद्धार केला होता. या मंदिराचे दर्शन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा सर्पदोष होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उघडणार्‍या या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांग लागलेली असते. सर्वांच्या मनात एकच इच्छा असते की नागराजावर विराजमान असलेल्या शिवशंभूची एक तरी झलक पाहण्यास मिळावी. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती