मंगळागौरीसाठी उखाणे Mangalagaur Ukhane

मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (08:16 IST)
सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी 
 
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
 
सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे
 
जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले
 
सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास 
 
मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी, 
….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी
 
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह 
 
मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला 
 
आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…
रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन 
 
गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात 
 
मंगळागौरीला पुजल्या आहेत सौळा पत्री
…रावांची मी आहे कुशल गृहमंत्री
 
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने 
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने 
 
संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन,  आशिर्वाद मागते सौभाग्याचा  
 
संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा
….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा 
 
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी
… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
 
श्रावणात बरसतात सरींवर सरी, 
मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी 
…रावांची सखी मी बावरी 
 
श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…
मंगळागौरीच्या दिवशी ….
रावांचे नाव घेते आणि फुलवते संसाराचा फुलोरा
 
मेघमल्हार बहरताच, 
श्रावणसर कोसळते,
…रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते 
 
सासर आहे छान, सासू आहे हौशी
…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
 
सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती
…राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी 
 
पानाफुलांनी सजवले मंगळागौरीसाठी मखर
…राव करतात नेहमीच माझ्यावर प्रेमाची पाखर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती