श्री साईसच्चरित - प्रस्तावना

(१) आपल्या ह्या आर्यावर्तांत सद‌गुरुकृपेवांचून मोक्ष नाहीं अशी द्दढ समजूत, द्दढ भावना, द्दढ सिद्धान्त आहे; व हा सिद्धान्त आजकालचा नाहीं, फार पुरातन आहे. तो वेदकालापासून आहे व त्यास वेदशास्त्रांचा आधार आहे. सदुरु कोणत्याहि जातीचे, धर्माचे, वयाचे, प्रत्यक्ष अथवा ग्रंथरूप, स्त्री असोत अथवा पुरुष असोत, साधुसंत, देवता, माता, पिता असोत, बंधुभगिनी असोत, मित्रसखा असोत, नवरा असो वा बायको असो, ज्ञात असोत वा अज्ञात असोत, ते कसे असावेत, त्यांची सेवा कशी करावी, त्यांची कृपा केव्हां होते, ते उपदेश केव्हां करतात, ज्ञानप्राप्ति केव्हां होते व ज्ञानोत्तर मनोवृत्ति कशी बनते याचें सर्वोत्कृष्ट वर्णन भगवान्‌ श्रीसमर्थ सद्नुरु झानेश्वरमहाराज यांनीं आपल्या श्रीमद्भगवद्नीताभाष्यांत केलें आहे. महाराज लिहितात :---
 
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं अथि आणावें । तरी संतां या भजावें । सर्वस्वेंसीं ॥१६५॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥१६६॥
तरी तनुमनुजीवें । चरणासीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥१६७॥
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणें अंत:करण बोधलें । संकल्पा न ये ॥१६८॥
 
श्रीज्ञानेश्वरी, अ. ४, श्लो. ३४
 
गुरुसेवेचे मार्ग, साधनें, अथवा अंगें अनंत आहेत. अद्वितीय राजकारणी पुरुष, राज्यसंस्थापक पराक्रमी वीर, अलौकिक शास्त्रकार, इतिहासकार, नाटककार, विशाल बुद्धीचे शिक्षक, व्याख्याते, लेखक वगैरे थोर पुषांस आपले व्यवहारगुरु मानून त्यांचीं चरित्रें लिहिणें ही गुरुसेवा व जनसेवा आहे, परंतु ही सेवा ऐहिक स्वरूपाची असून ती कालमानानुरूप करावयाची असते. तिचें महत्त्व व फल शाश्वत नसतें. तिला देशकालाची मर्यादा असते. तिच्यांत जरी लोकशिक्षण, परोपकार बराच असतो तरी ती स्वार्थमूलकहि असते. अत एव ती परमार्थफलदायी नव्हे.
(२) पुष्कळशा साधुसंतांचीं चरित्रें लिहिणें हाहि एक गुरुसेवाप्रकार आहे; व तो परमार्थफलदायीहि आहे. परंतु हा व उपरिनिर्दिष्ट प्रकार हे दोन्ही एकदेशी किंवा एकांगी होत. यांच्या केवळ लेखनापासून पारमार्थिक अंतिम घ्येय प्राप्त होणें कठीण; किंबहुना नाहींच म्हटलें तरी चालेल.
(३) माझ्या अल्प समजुतीप्रमाणें लेखनसेवेंत सर्वांत उत्तम व खात्रीनें मोक्षफल देणारी व श्रेष्ठ सेवा म्हणजे गुर्वाज्ञेवरून अथवा आपल्या अंत:स्फूर्तीनें आपल्या सद्‌गुरूचें चरित्र लिहून त्याचें नित्य नियमानें आपण स्वत: अध्ययन व देशकाल-प्रकृत्यनुकूलतेप्रमाणें द्दढ निश्चयानें, शुद्ध अंत:करणानें, उत्कृष्ट श्रद्धेनें, निस्सीम प्रेमानें व अव्यभिचारी भक्तिभावानें शेंकडों पारायणें व सप्ताह करणें, व इतर सद्भक्तांस करावयास लावणें ही सेवा होय. ही सेवा शरीरवाङमनात्मक असून ती कुटुंबपोषणमार्ताच्या अथवा ऐश्वर्याच्या आड येत नाहीं.
(४) चरित्रलेखनांत दोन भेद असतात. संक्षिप्त किंवा विस्तृत, आणि गद्य किंवा पद्य. अध्ययन, पठण, पारायण किंवा सप्ताह करण्यास विस्तृत व पद्यचरित्रेंच योग्य होत. गद्यचरित्रांचीं पारायणें किंवा सप्ताह करण्याची वहिवाट नाहीं. गद्य पाठ करण्यास कठीण. पद्य लवकर व सुलभतेनें पाठ होतें, स्मरणांत राहातें व वेळीं आठवतें. आपलें पुरातन संस्कृत वाङमय बहुतेक पद्यांतच आहे, याचें कारण तरी हेंच असलें पाहिजे. पद्य व विस्तृत गुरुचरित्राचें अध्ययन, पठण, पारायण व सप्ताह यांनीं गुरुसेवा उत्तम होते असा सार्वत्रिक अनुभव असून  आपल्यांत प्रघातहि तसाच आहे.
(५) पारायणें व सप्ताह करण्याची चाल फार प्राचीन आहे. वेद कालापासूनची आहे. वेदांचीं, भागवताचीं, रामायणाचीं, योगवासिष्ठाचीं वगैरे गीर्वाण ग्रंथराजांचीं पारायणें व सप्ताह नित्य कोठें ना कोठें होत असतात हें आपण पाहतों व ऐकतों.
(६) त्याचप्रमाणें शीज्ञानेश्वरी, श्रीनाथभागवत, श्रीदासबोध वगैरे मराठींत लिहिलेल्या विश्ववंद्य ग्रंथराजांचींहि पारायणें व सप्ताह नित्य होत असतात. हीहि चाल पुरातनच आहे. हीं चरित्रें ग्रंथ नसून केवळ ऐहिक व पारमार्थिक ज्ञानग्रंथ आहेत. तथापि जे पुरुष या ग्रंथनिर्मात्यांस अथवा या ग्रंथांसच आपले गुरू मानतात त्यांना या ग्रंथांचें अध्ययन, पठण, पारायण व सप्ताह केल्यानें नि:संशय सर्वोत्कृष्ट, अनुपमेय व मोक्षफलदायी गुरुसेवा घडते.
(७) गुरुचरित्र म्हणजे गुरूंचा अवतार, बालपण, तरुणपण, वृद्धपण, त्यांनीं केलेल्या अद्‌भुत लीला, दाखविलेले अतुल चमत्कार, केलेली अवतार - कार्यें वगैरे गोष्टींचा लिहिलेला विश्वसनीय व सत्य ग्रंथ.
(८) वरील केवळ ज्ञानग्रंथांचा व गुरुचरित्रग्रंथांचा उपयोग मात्र दोन्ही प्रकारांनीं करण्यांनीं करण्यांत येतो. काम्य द्दष्टीनें व निष्कामबुद्धीनें. काम्य :--- ऐहिक, ऐश्वर्योपभोगासाठीं किंवा चिंता, आपत्ति,  संकट, रोगयातना, पीडानिवारण होण्यासाठीं; निष्काम :--- संसारनिवृत्ति किंवा जन्ममरणमुक्ततेसाठीं. निष्काम गुरूसेवा ही केव्हांहि श्रेष्ठच ठरणार. मग ती गुरुचरित्र-लेखन-सेवा असो वा अन्य प्रकारची असो.
(९) गुरुचरित्र-लेखन-सेवा ही नारदपुराणांत दिली आहे; यावरून ती फार प्राचीन आहे यांत शंका नाहीं.
(१०) आपल्या या भरतभूमींत अवतीर्ण झालेल्या साधुसंतांचीं त्रोटक चरित्रें आपल्याकडील पसिद्ध श्रीमन्महीपति कविमहाराजांनीं मराठींत ओंवीप्रबंधांत आपल्या प्रख्यात जगन्मान्य श्रीभक्तलीलामृत, व श्रीसंतलीलामृत या दोन ग्रंथांत लिहून ठेविलीं आहेत.
(११) तसेंच त्यानंतरच्या बहुतेक सर्व महाराष्ट्रीय अर्वाचीन साधुसंतांचीं संक्षिप्त चरित्रें आपल्याकडील प्रसिद्ध श्रीदासगणू कविमहाराजांनीं आपल्या विख्यात श्रीभक्तलीलामृत, श्रीसंतलीलामृत व श्रीभक्तिसारामृत या तीन मराठी ग्रंथांत ओंवी प्रबंधांत लिहून ठेविलीं आहेत.
(१२) या उपरिनिर्दिष्ट कविवर्यद्वयांनीं लिहून ठेविलेल्या प्रत्येक ग्रंथाचें पारायण किंवा सप्ताह करतां येईल. परंतु त्यांतील कोणत्याहि एका साधुसंतांच्या चरित्राचें स्वतंत्र रीतीनें पारायण किंवा सप्ताह करूं म्हटलें तर, तें चरित्र सर्वांगपूर्ण व, विस्तृत नसल्यामुळें व त्या चरित्रास वरील ग्रंथांत फार तर दोनतीन पानेंच खर्ची घातलीं असल्याकरणानें तें चरित्र पारायण किंवा सप्ताह करण्यास मुळींच उपयोगी पडत नाहीं.
(१३) विस्तृत पद्यमय गुरुचरित्राच्या अध्ययनानें, पठणानें, पारायणानें किंवा सप्ताहानें चरित्रलेखकास तर गुरुसेवा होतेच; परंतु इतर भक्तांनींहि जर त्या चरित्राचें अध्ययन, पठण, पारायण व सप्ताह केले तर लेखकास जनींजनार्दनाची सेवा घडून, लोकसंग्रहाच्या सेवेचें श्रेय मिळून त्या इतर भक्तजनांच्या जन्माचेंहि सार्थक होतें.
(१४) सद्रुरु ग्रंथरुपानें आपापल्या भक्तांकडून दोन प्रकारची सेवा घेतात. एक श्रीज्ञानेश्वरी, श्रीनाथभागवत, श्रीदासबोध यांसारखे महान्‌ ग्रंथ स्वत:च निर्माण करून किंवा दुसरें, आपलीं चरित्रें आपल्या सद्भक्तांकडून लिहून घेऊन त्यांचें लेखकाकडून व भक्तवृंदाकडून अध्ययन, पठण, पारायणें व सप्ताहरूपानें सेवा घेणों.
(१५) अनेक सद्भक्तांनीं आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार आजपर्यंत निरनिराळ्या प्रसंगीं व निरनिराळ्या भाषेंत आपापल्या गुरूंचीं गद्याप्रमाणें पद्य चरित्रें लिहून जगास ऋणी करून ठेविलें आहे. तथापि पारायणें व सप्ताह करण्यास योग्य, विस्तृत, पद्य, व्यापक, सर्वांगपरिपूर्ण, प्रख्यात असें निदान आपल्या महाराष्ट्रांत तरी पहिलें, फार जुनें, गोड, रसाळ, चटकदार, प्रासादिक, श्रीसरखतीगंगाधर यांनीं क्षेत्र औदुंबर, श्रीवाडी, श्रीगाणगापुरनिवासी, श्रीसमर्थ सद्नुरु नृसिंहसरखती महाराज यांचें लिहिलेलें चरित्र; जें बृहत्‌ किंवा थोरलें गुरुचरित्र म्हणून हल्लीं प्रसिद्ध आहे, जें आबालवृद्धांच्या उत्तम परिचयाचें आहे, ज्याचे नित्यश; ह्जारों ठीकाणीं नियमानें रोज अध्ययन - पठण होतें व प्रसंगानुसार ज्याचीं पारायणें व सप्ताह होतात. दुसरें अगदीं शैलधी (शिरडी), तालुके कोपरगांव, जिल्हा अहमदनगर येथील निवासी, क्षेत्रसंन्यासी, आधुनिक संतचूडामणि श्रीसच्चिदानंद समर्थ सद्‌गुरु सांईबाबामहाराज यांचें लिहिलेलें चरित्र; जें श्रीसांईसच्चरित या नांवानें श्रीसांईलीलेंत ६ वर्षें प्रत्येक अंकांत एक एक अध्याय या रूपानें प्रसिद्ध होऊन, नुकतेंच या वर्षाच्या (सातव्या वर्षाच्या) ५-६-७-८ या जोड अंकांत अवतरणिकाध्यायासह पूर्ण झालें आहे व ज्याबद्दल ही हल्लींची प्रस्तावना लिहिली आहे. अशा या दोन गुरुचरित्रांखेरीज कोणीं तिसरें इतकें विस्तृत लिहिलेलें गुरुचरित्र आढळत नाहीं.
(१६) श्रीसमर्थ सद्‌गुरु टेंभेस्वामी ऊर्फ वासुदेवानंदसरस्वती महाराज यांनीं एक विस्तृत, विद्वत्तापूर्ण, विविधवृत्त, शब्दालंकार, अर्थालंकार, शब्दार्थालंकार, कुट्टकसुभाषितयुक्त असें लिहिलेलें छापील गुरुचरित्र बरेच वर्षांपूर्वीं माझ्या पाहण्यांत आल्याचें स्मरतें.
(१७) तसेंच श्रीसमर्थसद्नुरु श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथील निवासी दत्तमहाराज यांनींहि एक गुरुचरित्र लिहिलें आहे असें ऐकतों; परंतु हें गुरुचरित्र अद्याप छापून प्रसिद्ध झालेलें दिसत नाहीं.
(१८) श्रीसमर्थसद्नुरु वासुदेवानंदसरस्वती महाराजांनीं हिलिलेलें गुरुचरित्र श्रीसरस्वतीगंगाधरांनीं लिहिलेल्या गुरुचरित्राइतकें अद्याप प्रसिद्धीस आलेलें दिसत नाहीं. कदाचित्‌ महाराजांच्या भक्तमंडळाकडून त्यांचें अध्ययन, पठण, पारायण व सप्ताहहि श्रीपुण्यमहासरित्‌ नर्मदातीरावर गायकवाडींत चांदोद-कर्नाळीपासून बर्‍याच अंतरावर असलेल्या श्रीगरुडेश्वरक्षेत्रीं महाराजांच्या समाधिमंदिरांत होतहि असतील; परंतु त्याची नक्की माहिती मिळालेली नाहीं. हें चरित्र महाराजांनीं स्वत:च लिहिलें असल्याकारणानें त्याची गणना श्रीसरस्वतीगंगाधर व कै. श्री. अण्णासाहेब दाभोलकर यांनीं लिहिलेल्या गुरुचरित्रलेखनांत करतां येणार नाहीं.
(१९) खुद्द श्रीसमर्थसद्नुरु सांईबाबा महाराज यांच्या कृपेस पात्र झालेले, व आधुनिक कविश्रेष्ठांत ज्यांची प्रामुख्यानें गणना होत आहे, व ज्यांनीं आजपावेतों मनाचे श्लोक, जलददूत काव्य, नाटकखंड, लावण्या, पोवाडे, ग्राम्यगीत, अर्वाचीन भक्तलीलामृत, संतलीलामृत, भक्तिसारामृत, ईशावास्य भावार्थमंजिरी, अमृतानुभवटीका, गोदामाहात्म्य, स्तोत्रें, अष्टकें, सुभाषितें, कीर्तनोपयोगी आख्यानें, चक्रीभजन, स्फुट कविता, वगैरे लहानमोठे पुष्कळ ग्रंथ लिहिले  आहेत व सर्वांच्या परिचयाचे असे श्रीदासगणूमहाराज यांनी श्रीबाबांचीं दोन चरित्रें-एक त्यांनीं आपल्या भक्तलीलामृतांत व दुसरें भक्तिसारामृतांत अनुक्रमें ३१, ३२, ३३. व ५२, ५३ ता अध्यायांत लिहिलीं आहेत, पहिल्याची पृष्ठसंख्या १२ असून ओंवीसंख्या ५०९ आहे व दुसर्‍याची पृष्ठसंख्या १२ असून ओंवीसंख्या ४९७ आहे.
(२०) हीं दोन्ही चरित्रें सर्वोत्कृष्ट, ह्रदयंगम, रसाळ, प्रसादजन्य आहेत यांत शंका नाहीं. तीं अध्ययन, पठण, पारायण, व सप्ताह करण्यास योग्य आहेत; फक्त तीं फारच लघु आहेत इतकेंच. त्यांतील  कथा व श्रीसांईसच्चरितांतील कथा कमीजास्त प्रमाणानें बुतेक एकच आहेत. आपल्या देशाची हीन स्थिति व तिचीं  कारणें यांचें ह्रदयस्पर्शी सुंदर चित्र श्रीदासगणू महाराजांनीं इतर ग्रंथांप्रमाणें या लघुचरित्रांतहि उत्तम रेखाटलें आहे. श्री. अप्णासाहेब या भानगडींत मुळींच पडले नाहींत.
(२१) श्रीक्षेत्र वाडी येथील  श्रीदत्तस्तवराज या छोटेखानी पुस्तकांतील माहितीवरून श्रीसस्वतीगंगाधर यांनीं लिहिलेल्या बृहद्रुरुचरित्राहून एक निराळा स्वतंत्र फक्त ७०७ श्लोकी लघुगुरुचरित्र नांवाचा ग्रंथ वाडींत आहे. तो थोरल्या गुरुचरित्रापेक्षां फार प्राचीन आहे असें दिसतें. पण हें चरित्र कोणी व कधी लिहिलें हें समजण्यास मार्ग नाहीं. यांतील चरित्रनायक तेच थोरल्या गुरुचरित्रांतील चरित्रनायक होत. या चरित्रनायक श्रीसमर्थसद्नुरु नृसिंहसरस्वती महाराजांचा समाधिकाल शके ११४० हा अहे असें लघुरुव्चरित्रांतील ७०५, ७०६, ७०७, या ओंव्यांवरून दिसतें.
(२२) श्रीसरस्वतीगंगाधर यांचें उपनांव साखरे. या साखरे कुळांतील श्रीसायंदेव हे श्रीसमर्थ सद्नुरु नृसिंहसरस्वती महाराजांच्या कृपेस पात्र झाले. त्यांच्यावर नंतर सद्नुरूंचा अनुग्रह होऊन ‘तुझे वंशजांकडून माझी निरंतर सेवा होत जाईल’ असें त्यांना वरप्रदान मिळालें. श्रीसायंदेवापासून पांचवे पुरुष हे श्रीसरस्वतीगंगाधर होत. या श्रीसरस्वतीगंगाधरांना हल्लीं प्रसिद्धा असलेलें बृहद्रुरुचरित्र लिहिण्यास स्वत: श्रीसर्थसद्नुक नृसिंहसरस्वती महाराजांनीं आज्ञा केली असें त्याच चरित्रांत लिहिलेलें आहे. यावरून हें चरित्रसुद्धां पुष्कळ वर्षांचें जुनें आहे असें दिसतें. चंरित्रलेखनाचा किंवा चरित्रलेखकाचा काल दिलेला नाहीं.
(२३) याच श्रीसमर्थ सद्नुरु नृसिंहसरस्वती महाराजांचा अवतार पुन्हां श्रीक्षेत्र आळंदी येथें होऊन ते शके १८०७ सालीं समाधिस्थ झाले असें श्रीदासगणू महाराजांनीं आपल्या श्रीभक्तलीलामृत या ग्रंथाच्या ३० वे अध्यायांत १२ व १०३ ओंवींत लिहिलें आहे. यावरून हल्लीं प्रचारांत असललें थोरलें गुरुचरित्र शके १८०७ सालानंतर लिहिलें नसून, जरी लघुगुरुचरित्राइतकें जुनें नसलें तरी, खात्रीनें १८०७ सालाच्या पुष्कळच पूर्वीं लिहिलें गेलें असलें पाहिजे यांत शंका नाहीं.
(२४) असो. आपल्याला गुरुसेवा घडावी, आपल्या हातून शक्य तितका लोकसंग्रहहि व्हावा व मातृभाषावाङमयाची सेवा व्हावी या उदात्त हेतूनें श्रीसमर्थ सद्‌गुरु सांईबाबा महाराज यांच्या आज्ञेवरून श्री. अण्णासाहेबांनी सेवावृत्तिशृंखलाविमोचन झाल्यावर हें गुरुचरित्र लिहिलें आहे.
(२५) श्रीसरस्वतीगंगाधरांच्या गुरुचरित्राप्रमाणेंच या श्रीसांईसच्चरितांत अवतरणिकाध्यायासह ५३ अध्याय आहेत. पहिल्याची ओंवीसंख्या ७३०० आहे, याची ओंवीसंख्या ९४५० आहे.
(२६) संस्कृतांत जसा अनुष्टुप्‌ छंद तसाच मराठींत ओंवीप्रबंध हा मोठया कवित्वलेखनास योग्य आहे. चरित्रग्रंथांस ओंवीप्रबंध सुगम असतो म्हणूनच मराठींतील बहुतेक मोठमोठे नामांकित विश्ववंद्य पद्यग्रंथ ओंवीप्रबंधांतच लिहिलेले आढळतात. याच कारणाकरितां श्रीसांईसच्चरितहि ओंवीप्रबंधांतच लिहिलेलें आहे.
(२७) श्रीसरस्वतीगंगाधरांच्या गुरुचरित्रांतील कथा सर्वथैव विश्वसनीय व अनुभवजन्य अशाच आहेत. परंतु त्या श्रीसरस्वतीगंगाधरांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आहेत किंवा त्यांची माहिती त्यांना मुखपरंपरेनें मिळाली आहे, किंवा ज्यांच्या कथा लिहिल्या आहेत त्या व्यक्तींनीं त्यांना समक्ष किंवा लेखनद्वारें कळविली आहे हें समजण्यास आज आपल्याजवळ कांहींच साधन नाहीं व त्या ग्रंथांतहि त्यासंबंधाचा कांहीं सुलासा केलेला नाहीं.
(२८) श्रीसाईसंच्चरितांत ज्या कथा अगर लीला वर्णिल्या आहेत त्यांपैकीं पुष्कळ श्री. अण्णासाहेबांनीं स्वत: डोळ्यांनीं पाहिल्या आहेत व बाकीच्या ज्या भक्तांस श्रीबाबांचे प्रत्यक्ष व स्वप्नांत अनुभव आले व ज्यांनीं ते अनुभव त्यांच्या समजुतीप्रमाणें जशाच्या असेच अण्णासाहेबांस लिहून कळविले अगर तोंडीं निवेदन केले व त्यांपैकीं बहुतेक अजूनहि हयात आहेत; त्या लीला व अनुभवांवर अण्णासाहेबांनीं फक्त आपल्या प्रासादिक व रसाळ वाणीनें कथास्वरूपाचा पद्यमय, मोहक व सुंदर पेहेराव चढवून त्यांचें ह्रदयंगम वर्णन श्रीसाईसच्चरितांत केलें आहे.
(२९) प्रत्येक अध्यायांत प्रथम वेदान्त, नंतर गुरुगौरव, व नंतर कथा याप्रमाणें ५१ अध्यायांची मांडणी केली आहे. ५२ व्या अध्यायांत सिंहावलोकन करून, अवतरणिका देऊन ग्रंथ संपूर्ण करूं असें पहिल्याच एका ओंवींत लिहिलें आहे. परंतु हल्लीं जो ५२ वा अध्याय प्रसिद्ध झाला आहे त्यांत सिंहावलोकनहि दिसत नाहीं व सवतरणिकाहि दिसत नाहीं. त्यांत श्रीसद्‌गुरुमाहात्म्य, श्रीसांईसच्चरित-फलश्रुति, ग्रंथकाराची प्रसादयाचना, व प्रार्थना इतक्याच गोष्टी आहेत. ‘५१ वा अध्याय प्रसिद्ध झला. आतां फक्त ५२ वा अध्याय प्रसिद्ध होणें राहिलेला या अंकीं प्रसिद्धा होऊन श्रीसाईसच्चरित ग्रंथ आतां संपूर्ण झाला आहे.’ असे खुद्द अण्णासाहेबांच्या हातचे शब्द श्रीसांईलीलेच्या ६ व्या वर्षाच्या ३ र्‍या अंकांत ८८० पानावर छापलेले आहेत. यावरून अवतरणिकेच्या व सिंहावलोकनाच्या ओंव्या लिहिलेलीं चिठोरीं कोठेंतरी गहाळ झालीं असावीं असें दिसतें. नेहमींच्या संवयीप्रमाणें अण्णासाहेबांनीं ५२ वा अध्यायहि चिठोर्‍यांवरच लिहिला होता. तीं चिठोरीं मजकडे तपासण्याकरितां आलीं होतीं. त्यांत ओव्यांचे क्रमांक नव्हते, व चिठोर्‍यांचे अंक २० पासून पुढें होते. यावरून सिंहावलोकनाच्या व अवतरणिकेच्या ओंव्या गहाळ झाल्या असाव्यात किंवा विस्मृतीनें तयार करावयाच्या राहिल्या असाव्यात असें वाटतें. हल्लीं अवतरणिकेचा नवा अध्याय तयार करून तो ५३ व अध्याय म्हणून ग्रंथास जोडला आहे. याप्रमाणें एकंदर या सांईसच्चरिताची किंवा गुरुचरित्राची रचना आहे.
(३०) श्रीबाबांचें शिरडी क्षेत्रीं प्रथमागमन, तिरोभवन पुनश्च प्रकटीकरण, त्यांच्या अद्‌भुत लीला, अप्रतिम चमत्कार, भक्तानुभव, अनुग्रह, उपदेश-ग्रंथवाचन, ग्रंथलेखन, पादुकापूजन, इष्टदेवतापूजन, ईश्वरभजन, जप, तप, नामस्मरण, आसन, उपासना, धनसुतदारा - दान, संकटनिवारण, व्याधिनाश, योगैश्वर्य, मशीदमाई-वैभव, उदीमाई-प्रभाव; धुनीमाई-प्रताप, घरट्टपेषण-पराक्रम, नित्यक्रम, आहारविहार, शयन, चिलीम, पादत्राण, पेहेराव, संताविष्करण, शंकानिरसन, पंचमहायज्ञ-सामर्थ्य, धर्मशिक्षण, व्यवहारशिक्षण, परमार्थपाठ, सर्वव्यापकत्व, सर्वज्ञता, मनोगतकथन, पूर्वकथन, पूर्वजन्मकथन, भविष्यकथन, हंडी किंवा डेग, चावडी, भिक्षा, भिक्षाधिकार, मंदीर, लेंडीबाग, उत्सव, पंचतत्त्वप्रभुत्व, परस्पर मनोमय चिच्छक्तिसंदेश, औदार्य, भक्ति, ज्ञान, वैराग्य, दया, क्षमा, शांति, निर्याण, वगैरे विषयांच्या सुमारें १०५ ते १७५ पर्य़ंत कथा, उपकथा व आडकथा, त्या श्रीसांईसच्चरितांत वर्णिल्या आहेत.
(३१) कित्येक ठिकाणीं एकेक अध्यायांत २, ३, ४, ५, पर्यंतहि कथा आल्या आहेत; तर कित्येक ठिकाणीं २ किंवा ३ अध्याय मिळून एकच कथा वर्णिली आहे.
(३२) कविता-ग्रंथ तीन प्रकारचे असतात: नैसर्गिक, प्रासादिक व कृत्रिम, कृत्रिम कविता केवळ विद्वत्तेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर केलेली असते; ती उत्तम ठरेल, परंतु शाश्वत टिकणार नाहीं; व तिच्यांत प्रतिभा, प्रसाद किंवा देणगी हे गुण कधींहि येणार नाहींत. गुरुकृपेवांचून अंगीं कितीहि विद्वत्ता असली तरी हल्लींच्या ग्रंथासारखा ग्रंथ निर्माण होणें कठीण, कोणत्याहि पारमार्थिक ग्रंथांत वरील तीन गुण असल्याखेरीज मुमुक्षु वाचकांवर त्याची छाप पडणार नाहीं व त्यांची त्यावर श्रद्धा व विश्वास बसणार नाहीं. श्रीसाईसच्चरित हा ग्रंथ प्रसादजन्य आहे व त्यामुळेंच तो कोणाहि मुमुक्षु भक्तास आवडणारा असून त्याचें नित्यश: अध्ययन, पठण होऊन त्यांचीं शेंकडों पारायणें व सप्ताह झाल्यावांचून राहणार नाहींत.
(३३) अण्णासाहेबांच्या घराण्यांत मूळपासून गुरुभक्ति होती किंवा नव्हती हें समजण्यास हल्लीं मार्ग नाहीं. परंतु अण्णासाहेबांनीं आपल्या स्वत:संबंधानें तिसर्‍या अध्यायांत जी हकीकत लिहिली आहे तीवरून पाहतां अण्णासाहेबांस प्रथमत: गुरुभक्ति किंवा गुरुप्रेम मुळींच नव्हेतें. तसेंच गुरु करणें हें थोतांड आहे असें त्यांस वाटत असून गुरु करण्याची आवश्यकताच नाहीं असें ते प्रतिपादन करीत व स्वकर्तृत्वाचाच अभिमान अधिक बाळगीत असत. परंतु श्रीबाबांची नजरानजर होऊन कांहीं नमोमय साक्षित्व शब्दोच्चर झाल्याबरोबर ते सर्वस्वी अभिमानगलित झाले व सद्रुरूवांचून तरणोपाय नाहीं अशी त्यांना फूर्ण खात्री पटली. नंतर त्यांच्यावर बाबांची कृपाहि झाली. श्रीसांईसच्चरितलेखन हें त्याच कृपेचें फल होय. अण्णासाहेबांनीं विश्ववद्य अशा पुष्कळ साधुसंतांचे जगन्मान्य काव्यग्रंथ वाचले असल्याकारणानें त्यांच्या श्रीसांईसच्चरितावर प्रामुख्येंकरून श्रीसमर्थ सद्रुरु नाथमहाराजांच्या श्रीएकनाथी भागवत भाषाथाटाची छाप पडलेली दिसते.
(३४) श्रीसाईसच्चरितलेखनाबद्दल आधुनिक विद्वन्मणि श्री. चिंतामणराव विनायक ऊर्फ नानासाहेब वैद्य यांनीं आपला अनुकूल अभिप्राय प्रकट करून अण्णासाहेबांना ‘महीपति’ ही पदवी देऊन त्यांचा व त्यांच्या ग्रंथाचा गौरव केला आहे. (श्रीसाईलीला वर्ष २, अंक ९, पान १८२) यावरून हे श्रीसांईसच्चरित नुसतें गुरुचरित्र नसून तें एक उत्कृष्ट रसात्मक काव्य आहे.
(३५) श्रीसांईसच्चरितांत भगवान्‌ श्रीज्ञानेश्वर महाराज लिहितात त्याप्रमाणें अण्णासाहेबांच्या वाणीचें व लेखनाचें सार्थक झालें आहे.
“वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वी परतत्त्व । - स्पर्शु जैसा” ॥३४७॥
(श्रीज्ञानेश्वरी अ. १८ श्लो. १४.) ग्रंथांत द्दष्टान्त, उपमा, अलंकार, रसपरिपोष यांचा भरपूर भरणा आहे.
(३६) श्रीसरस्वतीगंगाधरांनीं लिहिलेल्या गुरुचरित्राप्रमाणें याहि श्रीसांसच्चरिताचें नित्य अध्ययन व पठण होऊन त्याचीं शेंकडों पारायणें व सप्ताह व्हावेत अशी ग्रंथकर्त्याची फार फार इच्छा होती. ती इच्छा फलद्रूप झाल्याचा सोहळा पाहण्यास ते जिवंत राहिले नाहींत हा दैवदुर्विपाक आहे.
(३७) हा ग्रंथ मुमुक्ष भक्तांस एक प्रकारचा गोड, मधुर, परमार्थ - मेवाच आहे. अण्णासाहेबांच्या सदिच्छेस मान देऊन मुमुक्षु भक्तांनीं स्वत: आपण या मेव्याचें श्रद्धेनें व अंत:करणपूर्वक आकंठ सेवन करून इतर भक्तांसहि करावयास लावल्यास भगवान्‌ श्रीज्ञानेश्वरमहाराज लिहितात त्याप्रमाणें मुमुक्षुभक्तांना ज्ञानयज्ञानें श्रीसांईपरमात्मा संतुष्ट केला असें होऊन ते शरीरनाशानंतर त्याच षडगुणैश्वर्य श्रीसांईपरमात्म्याशीं एकरूप होतील यांत तिलप्राय शंका नाहीं.
 
पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढीवली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणी । आलासे जेथें ॥
तो हा सकलार्थप्रद । आम्हां दोघांचा संवाद । न करितां पदभेद । पाठेंचि जो पढे ॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुतीं । तोषविला होय सुमति । परमात्मा मी ॥
ते हे मंत्ररहस्य गीता ।  मेळवी जो माझिया भक्तां । अनन्यजीवन माता । बाळका जैसी ॥
तैसी भक्तां गीतेसी । भेटी करी जो आदरेंसीं । तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥
 
श्रीज्ञानेश्वरी, अ. १८ श्लोक ७० व ६८, ओंव्या १५२४, १५२५, १५२६, १५१२, व १५१३, कै. प्रत पान ५३०-५३१.
 
शेवटीं कर्तुमकर्तुंमन्यथाकर्तुम्‌, शक्तिमान्‌, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, श्रीसमर्थसद्नुरुसांईपरमात्म्याचे पुण्यचरणकमलीं अनन्यभावें नम्रतापूर्वक मस्तक ठेवून ही बरीच लांबलेली प्रस्तावना संपवितों.
ठाणें
ता. २०-११-३०
बाबांचें बाळ.
(कै० बाळकृष्ण विश्वनाथ देव)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती