मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:27 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
मागां गताध्यायाअंतीं ॥ दिग्दर्शन कथानुसंगती । कथिली तीच कथितों संप्रती । ती स्वस्थांचेत्तीं परिसिजे ॥१॥
करूं जातां परमार्थविचार । पंथाभिमान अडवी भयंकर । विन्घ नाहीं अति दुर्धर । या अभिमानासम दुजें ॥२॥
आम्ही निराकाराचे भजक । साकार देव हा भ्रममूलक । साधुसंत हे मानवचि देख । नमवावें कां मस्तक तयांपुढें ॥३॥
तयां न घालावें लोटांगण । तयां न द्यावें दक्षिणादान । खालवावी न यत्किंचित मान । विडंबन हें भक्तीचें ॥४॥
शिरडीसंबंधें अनेकांही । कोणीं कांहीं कोणीं कांहीं । अनेक वार्ता । कथिल्या पाहीं । विश्वसनीय नाहीं सकळ पां ॥५॥
म्हणती तेथें जातां दर्शना । साईबाबा मागती दक्षिणा । साधू जैं लागती द्रव्यसंपादना । साधुत्वा हीनपणा तयांच्या ॥६॥
अंधश्रद्धा नव्हे बरी । प्रत्यक्ष अनुभय घेतल्याउपरी । ठरवूं निर्णय आपुल्या अंतरीं । कैसियेपरी वर्तावें ॥७॥
आपण नाहीं देणार दक्षिणा । जया मनीं वित्ताची कामना । तयाचें साधुत्व येईना मना । अपात्र नमना तो आम्हां ॥८॥
असो आम्ही शिरडीस जाऊन । येऊं तयांची भेट घेऊन । करणार नाहीं चरणवंदन । अथवा प्रदान दक्षिणेचें ॥९॥
जो जो ऐसिया कुतर्कें निघे । जरी आपुल्या कृतनिश्चया जागे । अखेर तोही दर्शनयोगें । शरण रिघे साईंस ॥१०॥
जो जो साईंस पाहूं सरला । तो तो जागचे जागींच ठेला । पुनश्च नाहीं मागें परतला । पायींच रतला साईंच्या ॥११॥
धरूनियां दांतीं तृण । जैसें कोणीं यावें शरण । तैसियेपरी वंदी चरण । पावोनि विस्मरण निश्च्या ॥१२॥
पंथाभिमाना जेथें विसांवा । सौख्य वाटेल अत्यंत जीवा । तो हा अध्याय पस्तिसावा । श्रोतीं परिसावा सादर ॥१३॥
तैसीच सूचित उदीची ख्याती । बाळा नेवासकराची प्रतीती । कैसा सर्प संभाविला प्रीती । साईच तयाप्रति भावून ॥१४॥
कृपा करा श्रोते मजवर । मी तों केवळ आज्ञेचा किंकर । आज्ञा पाळूं जाणें सादर । उद्भवलें अक्षर चरित्र हें ॥१५॥
द्दष्टि ठेवितां चरणावरी । तेथूनि उमटती पदलहरी । पवित्र चरित्र कुंभांतरीं । वरिचेवरी मी भरितों ॥१६॥
कासवीचीं आम्हीं पिलीं । केवळ द्दष्टिक्षेपें पोसिलीं । नाहीं तान्हेलीं भुकेलीं भागलीं । सदैव ठेलीं संतृप्त ॥१७॥
असतां एक द्दष्टीचें सुख । नलगे आम्हां अन्नउदक । द्दष्टीच हरी तहान भूक । किती तें कौतुक वानावें ॥१८॥
आम्हांही सकल द्दष्टीचा विषय । कृपासिंधु साईराय । द्दश्य - द्रष्टा - दर्शन जाय । पुसोनि ठाय त्रिपुटीचा ॥१९॥
तैसेच आम्हां त्वचा स्पर्श । दोहीं ठायीं साईप्रकाश । अथवा घ्राण आणि वास । तेथेंही निवास साईंचा ॥२०॥
अथवा श्रवणीं शब्द पडे । पडतांच प्रकटे साईंचें रूपडें । श्राव्य श्रावक श्रवण उडे । त्रिपुटी झडे एकसरा ॥२१॥
अथवा जेथें रसना रसें । घोळली तेथें साई समरसे । रसना - रस - रसास्वाद कायसें । बापुडें कोडें त्रिपुटीचें ॥२२॥
हेच गति कर्मेंद्रियां । तिंहीं एक साई सेविलिया । सकल कर्में जाती विलया । पडेल ठाय नैष्कर्म्य ॥२३॥
असो आतां हा ग्रंथ लांबला । साईप्रेमें कोठेंच वाहवला । पूर्वानुसंधान लक्षूं चला । चालवूं आपुला कथाभाग ॥२४॥
एक मूर्तिपूजापराङमुख । निराकाराचे परम भजक । जाहले शिरडी - गमनोत्सुक । केवळ चिकित्सैकबुद्धीनें ॥२५॥
म्हणती आम्ही शिरडीस येऊन । घेऊं केवळ साधूचें दर्शन । आम्ही न केव्हांही वांकवूं मान । करूं न प्रदान दक्षिणेचें ॥२६॥
मान्य कराल या दोन शर्ती । तरी येऊं कीं शिरडीप्रती । बरें म्हणतां निजमित्रासंगतीं । जावया निघती स्थस्थ मनें ॥२७॥
काका महाजनी त्यांचे मित्र । संतार्थ जयांची भावना पवित्र । परी ते शंकाकुशंकापात्र । स्नेही होते तयांचे ॥२८॥
दोघे निघाले शनिवारीं । मुंवईहून रात्रीचे प्रहरीं । येऊनि पातले शिरडीभीतरीं । आदित्यवारीं सकाळीं ॥२९॥
दोघे गेले मशिदीस । साईदर्शन घ्यावयास । काय वर्तलें ते समयास । स्वस्थमानस परिसिजे ॥३०॥
पाऊल वेवितां पायरीवरी । तया मित्रा पाहूनि दूरी । “कां यावें जी” ऐसिये परी । बाबा मधुरोत्तरीं बाहती ॥३१॥
ऐकूनि हें प्रेमवचन । तया मित्रास पटली खूण । शब्दोच्चाराची ती ठेवण । देई त्या स्मरण वडिलांचें ॥३२॥
“कां यावें जी” हा उच्चार । काढितां बाबा करिती जो स्वर । तो ऐकतां काकांचे मित्र । विस्मितांतर जाहले ॥३३॥
परिसोन मोहक स्वराची ठेवण । गतपित्याचें झालें स्मरण । त्याचेच स्वराची तर्हा ही पूर्ण । वाटलें अनुकरण यथार्थ ॥३४॥
काय वाणीची मोहनशक्ति । ककांचे मित्र विस्मित चित्तीं । म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती । स्वर हा निश्चितीं ओळखीचा ॥३५॥
वडिलां - मुखींची तैसी ती वैखरी । ऐकतां ते मित्र द्रवले अंतरीं । वंदिले बाबांचे चरण शिरीं । विसरूनि पूर्वील निश्चय ॥३६॥
पुढें बाबा दक्षिणा मागती । तीही केवळ काकांचे प्रती । काका देती, दोघेही परतती । पुनश्च जाती दुपारा ॥३७॥
तेव्हांही हे सवेंचि जाती । दोघांही जाणें मुंबईप्रती । काका तेव्हां आज्ञा प्रार्थिती । दक्षिणा मागती बाबा त्यां ॥३८॥
तीही केवळ काकांचे पाशीं । म्हणती सत्रा रुपये दे मजसी । कांहीं न मागत तन्मित्रासी । मन ते मनाशींच चुटपुटले ॥३९॥
तंव ते काकांस हळूच पुसती । तुम्हांसचि कां दक्षिणा मागती । सकाळींही तुम्हांचप्रती । आतांही मागती तुम्हांसचि ॥४०॥
मी असूनि तुम्हांसंगतीं । दक्षिणेलागीं मज कां वगळती । काका हळूच उत्तर देती । बाबांप्रतीच पुसा हें ॥४१॥
इतुक्यांत बाबा काकांस वदती । तो काय सांगे रे तुजप्रती । तों स्वयेंच ते मित्र बाबांस पुसती । दक्षिणा म्हणती देऊं का ॥४२॥
तंव बाबा उत्तर देती । “तुझे मनीं देण्याची नव्हती । म्हणूनि नाहीं मागितली तुजप्रती । देणें चित्तीं तर देईं ॥४३॥
बाबा मागतां भक्त देत । तयां ते मित्र हिणवीत । तेच न मागतां जैं देऊं का म्हणत । आश्चर्यभरित तंव काका ॥४४॥
म्हणतां चित्तीं असल्यास देईं । तया मित्रास जाहली घाई । सत्रा रुपायंची भरपाई । केली पायीं न मागतां ॥४५॥
बाबा मग वदती तयास । “जासील रे क्षण एक बैस” । करिते झाले गोड उपदेश । निरसावया सभेदात्मता ॥४६॥
“तुम्हा - आम्हांतील तेल्याची भिंत । पाडूनियां ती टाक समस्त । होईल मग मार्ग प्रशस्त । अरस परस भेटावया” ॥४७॥
पुढें आज्ञा झाले देते । माधवराव जाहले प्रार्थिते । पाहूनि अभ्राच्छादित नभातें । पाऊस यांतें भिजवील ॥४८॥
बाबा प्रत्युत्तर त्यां देती । जाऊं दे त्यां स्वस्थचित्तीं । पाउसाची कांहींही भीती । नाहीं तयांप्रती मार्गांत ॥४९॥
अभिवंदूनि साईंचे पाय । तैसच गाडींत बसैले उमय। विजा चमकत दाटत धूय़ । गंगेस पय - पूर लोटला ॥५०॥
गडगडाटें गर्जे आकाश । नौकागमन आलें वांटयास । काका - मनीं पूर्ण विश्वास । होतें आश्वासन बाबांचें ॥५१॥
पडला विचार त्या मित्रास । कैसा सुखाचा होईल प्रवास उगीच मिघालों यावयास । होतील सायास मार्गांत ॥५२॥
असो पुढें सुखें गेले । अग्निरथांत आरूढ झाले । मेघ मग तेथून वरसूं लागले । निर्भय पावले मुंबईस ॥५३॥
पुढें जेव्हां आले सदनीं । पाहती खिडक्या द्वारें खोलुनी । गेली अडकली चिमणी उडुनी । गतप्राण दोनी आढळल्या ॥५४॥
पाहूनि ऐसा तो देखावा । वाईट बहुत वाटलें जीवा । अन्नपाण्यावांचूनि देवा । बिचार्या जीवा मुकल्या या ॥५५॥
निघालों जेव्हां जावया शिरडी । वातायनें जरी ठेवितों उघडीं । पडती नाहीं काळाची उडी । मेलीं बापुडीं मजहातें ॥५६॥
म्हणे आतां उडाली जी । तिचीच जणूं बाबांस काळजी । म्हणोनि दिधली होऊनि राजी । अनुज्ञा आजी परतावया ॥५७॥
नाहींतरी तीही मरती । अन्नावीण कैसी जगती । आयुष्य सरलें तेणें हे गती । पावली निश्चिती ती एक ॥५८॥
आणीक यांचा अनुभव एक । तोही श्रवणार्ह आहे सुरेख । एका पायांच्या टांचेचें दु:ख । भोगीत हे कित्येक मासवरी ॥५९॥
शिरडीस जाणें घडल्या आधीं । बहुत महिने भोगिली ही व्याधी । तेथून परतल्यापाठीं न बाधी । नासली अल्पावधींतचि ॥६०॥
ऐसीच आणिक दुसरी कथा । संतांचा अंत लावूं जातां । पायीं नमवावा लागला माथा । मनीं नसतां ती परिसा ॥६१॥
तैसीच दक्षिणा देण्याची नसतां । मोहपाशीं अडकले जातां । भंगूनि आपुली द्दढनिश्चयता । दक्षिणा देतात कैसी ती ॥६२॥
ठक्कर धरमसी जेठाभाई । साँलिसीटर रहिवास मुंबई । बळावली पूर्वपुण्याई । भेटूं साईंस मन झालें ॥६३॥
महाजनींचे हेच शेट । उभयतांचा परिचय दाट । वाटलें शिरडीस जाऊन थेट । घ्यावी कीं भेट प्रत्यक्ष ॥६४॥
ठक्करजींच्या पेढीवरी । काका मुख्य कारभारी । सुटी साधोनी हाहोहारी । करीत तयारी शिरडीची ॥६५॥
काका तरीं काय वेळीं परतती । आठाठ दिन शिरडीस काढिती । आज्ञा नाहीं साईंची म्हणती । ही काय रीती कामाची ॥६६॥
ऐसे कैसे तरी हे संत । बंड नव्हे हें आम्हां पसंत । निघाले शेट शिमग्याचे सुटींत । लावाया अंत साईंचा ॥६७॥
अंगीं दुर्धर देहाभिमान । निजैश्वर्याचेंच महिमान । संत तरी मानवासमान । किमर्थ मान वांकवावी ॥६८॥
पाहूनि साईंची अधिकारस्थिति । शास्त्री पंडित टेंकीस येती । तेथें बापुडे धरमसी ते किती । ते काय तगती निश्चया ॥६९॥
परी न अंधश्रद्धा बरी । करूनि घेऊं आपुली खातरी । करूनि ऐसा निश्चय अंतरीं । केली तयारी शिर्डीची ॥७०॥
वर्णिल्या एका स्नेह्याच्या वरती । धरमसीही तेच रीती । सवें काकांस घेऊनि निघती । आणीक वदती तयांस ॥७१॥
शिरडीस जातां तेथेंच रहातां । चालेना या खेपे ही वार्ता । परतलें पाहिजे मजसमवेता । हें निश्चितता जाणावें ॥७२॥
तंव काका तयां वदती । हें तों नाहीं आम्हांहातीं । तदा धरमसी सवें घेती । आणीक सांगाती मार्गार्थ ॥७३॥
न जाणों काका नाहींच परतले । सांगात्यावीण मार्गांत न चले । म्हणूनि आणिक तिजया घेतलें । तिघे निघाले शिर्डीस ॥७४॥
जगांत ऐशा कित्येक जाती । परोपकारी भक्तांच्या असती । तयांची कराया संशयनिवृत्ती । बाबा आणिती धरधरूं ॥७५॥
मग ते जेव्हां माघारा जाती । आपुले अनुभव इतरां कथिती । लिहवूनि घेती कोणाही हातीं । जना सत्पथीं लावया ॥७६॥
तात्पर्य हे जे कोणी जाती । दर्शनसुखें तृप्त होती । आरंभीं कैसीही तयांची वृत्ति । परमानंदप्राप्ति अखेर ॥७७॥
म्हणोत आपुले पायीं जाती । असे ना कां चिकित्सा - प्रीती । परी निराळी वस्तुस्थिती । कार्य साधिती बाबांचें ॥७८॥
बाबाचि तयां देती स्फूर्ती । तेव्हांचि बाहेर पाय काढ्ती । चेववूनि स्वाभाविक वृत्ति । लाविती परमार्थीं तयांस ॥७९॥
कोण जाणे तयांच्या कळा । जाणूं जातां होतील अवकळा । होऊनि निरभिमान पायीं लोळा । भोगाल सोहळा सुखाचा ॥८०॥
बरवें न जाणें रिक्तकरीं । देव - द्विज- गुरु - द्वारीं । म्हणवूनि द्राक्षांची दो - शेरी । काका खरीदीत मार्गांत ॥८१॥
पोटीं नाहीं बीज ज्यांत । असे ऐसी ही द्रक्षांची जात । परी सबीज जीं वेळीं प्राप्त । घेतलीं विक्रींत काकांनीं ॥८२॥
असो गोष्टी वार्ता करीत । पातली ही त्रयी शिरडींत । सवें तिघेही दर्शनार्थ । गेले मशिदींत बाबांच्या ॥८३॥
बाबासाहेब तर्खड भक्त । हेही होते तेथें स्थित । शेट धरमसी जिज्ञासाप्रेरित । पुसती तयांप्रत तें परिसा ॥८४॥
येथें काय आहे कां येतां । तर्खड वदती दर्शनाकरितां । शेट म्हणती ऐकिली वार्ता । येथें तों घडतात चमत्कार ॥८५॥
तंव तर्खड वदती त्यांना । ही तों नाहीं माझी भावना । जैसी उत्कंठा जयाचे मना । पावे ती कामना सिद्धीतें ॥८६॥
काकांनीं पायीं डोई ठेविली । द्राक्षें बाबांच्या करीं अर्पिलीं । वांटावयाची सुरवात झाली । मंडळी जमली होतीच ॥८७॥
बाबा तंब इतरांसमवेत । धरमसीसही कांहीं देत । परी तयां ती नावडती जात । निर्बीजीं प्रीत तयांस ॥८८॥
या द्राक्षांची तयांस चीड । आरंभींच उपजली नड । कैसीं सेवावीं वाटलें अवघड । अव्हेरही जड वाटे मना ॥८९॥
शिवाय डॉक्टरें केलें मना । द्राक्षें न खावीं धुतल्याविना । आपणचि धुणें योग्य वाटेना । उठल्या कल्पना नानाविध ॥९०॥
पुढें तैशींच टाकिलीं तोंडांत । बिया चघळूनि ठेविल्या खिशांत । साधूंचें तें स्थान पुनीत । करवेना अपुनीत उच्छिष्टें ॥९१॥
तंव ते शेट मनीं म्हणती । साधु असतां कैसें हें नेणती । कीं हीं द्राक्षें मज नावडती । बळेंच कां देती मजप्रती ॥९२॥
उठतां ऐसी तयांची वृत्ति । बाबा तींच आणीक त्यां देती । तीं सबीज जाणूनि हातींच ठेविती । मुखीं न घालिती धरमसी ॥९३॥
सबीज नावडती द्राक्षें खरीं । परी तीं बाबांनीं दिधलीं करीं । धरमसी शेट अवघडले अंतरीं । कैसियेपरी वर्तावें ॥९४॥
तोंडीं घालावया होईना मन । करूनि ठेविलीं मुठींत जतन । तंव बाबा वदती “टाक रे खाऊन” । मानिलें आज्ञापन शेटीनें ॥९५॥
“खाऊन टाक” बाबा वदतां । धरमसींनीं तोंडांत टाकितां । बीजरहित तीं सर्वही लागतां । अति आश्चर्यता पावले ॥९६॥
ऐसीं निर्बीज द्राक्षें लागतां । धरमसी होऊनि विस्मितचित्ता । मनीं म्हणे अजब सत्ता । काय या संतां अशक्या ॥९७॥
जाणोनि माझे मनींचा हेत । असतां सबीज आणि निर्धूत । साई मज जीं जीं देत । तीं तीं बीजरहित हितकारी ॥९८॥
थक्क झाली चित्तवृत्ती । चिकित्सेची पडली विस्मृती । गळाली सर्व अहंकृती । संतीं प्रीती उपजली ॥९९॥
पूर्वसंकल्प गेले विलया । साईप्रेम उपजलें ह्रदया । उत्कंठा जी शिरडीस यावया । कृतनिश्चया सारखी ॥१००॥
बाबा तर्खड हेही तेथें । बावांपाशींच बसले होते । बाबा साई जाहले वांटिते । त्यांतील त्यांतेंही काहीं ॥१०१॥
तेव्हां धरमसी तयांही पुसती । आपुलीं द्राक्षें कैसीं होतीं । बाबा जेव्हां सबीज म्हणती । विस्मित चित्तीं अतिशय ॥१०२॥
तेणें ते साधु ही श्रद्धा बसली । द्दढीकरणार्थ कल्पना स्फुरली । साधु असाल तरी हीं पुढलीं । जातील दिधलीं काकांना ॥१०३॥
बाबा वांटीत होते बहुतां । परी हें स्फुरतां शेटीचे चित्ता । काकांपासूनच शेज धरितां । अति नवलता शेटीस ॥१०४॥
ऐशा साधुत्वाच्या खुणा । ऐसा हा मनकवडेपणा । पुरा झाला धरमसीच्या मना । साधु साईंना मानावया ॥१०५॥
माधवराव होते तेथें । ते मग झाले बाबांस निवेदिते । काकांचे मालक शेट हे ते । झाले समजाविते बाबांस ॥१०६॥
“हा कुठला काकाचा मालक । त्याचा मालक आहे आणिक” । बाबा प्रत्युत्तर देती चोख । काकांस तोखदायकसें ॥१०७॥
आणिक कैसी नवलपरी । आप्पा नामें एक आचारी । उभा तेथेंच धुनीशेजारीं । बाबा तयावरी घालिती ॥१०८॥
म्हणती हे शेटजी इथवर आले । ते मजकरितां नाहीं श्रमले । आप्पालागीं प्रेम दाटलें । म्हणून पातले शिरडीस ॥१०९॥
असो ऐसें हें भाषण झालें । धरमसी आपुले निश्चय विसरले । आपण होऊन पायां पडले । मग ते परतले वाडयांत ॥११०॥
असो माध्यान्हीं आरती झाली । घरीं जाण्याची तयारी चालली । आज्ञा घेण्याची वेळ आली । मंडळी निघाअली मशीदीं ॥१११॥
धरमसी तेव्हां काकांस वदत । मी तों नाहीं आज्ञा मागत । तुम्हीच मागा तुम्हां ती लागत । तंव काय म्हणत माधवराव ॥११२॥
काकांचें तों नाहीं प्रमाण । आठवडा एक भरल्यावीण । होणार नाहीं आज्ञापन । आपणचि विचारून घ्याना कां ॥११३॥
पुढें हे तिघे जाऊन बैसतां । माधवराव आज्ञा मागतां । बाबांनीं सांगूं आंरभिली वार्ता । ती स्वस्थचित्ता परिसावी ॥११४॥
“होता एक चंचलबुद्धि । घरीं धनधान्याची समृद्धि । शरीरीं नाहीं आधिव्याधि । नसती उपाधि आवडे ॥११५॥
उगाच बोजा वाही माथां । हिंडे इतस्तत: नाहीं स्वस्थता । खालीं ठेवी उचली मागुता । नाहीं निश्चलता मनास ॥११६॥
पाहूनि ऐसी तयाची अवस्था । कींव आली माझिया चित्ता । वाटेल त्या एका ठायीं आतां । ठेव रे निश्चितता म्हणालों ॥११७॥
उगाचि ऐसा भ्रमतोस । एका ठायींच स्वस्थ बैस” । वार्ता खोंचली धरमसीस । मानीत आपणास इशारा तो ॥११८॥
असोनि वैभव यथास्थित । कारण नसतां यत्किंचित । धरमसी सदा चिंताक्रांत । डोकें पिकवीत उगाच ॥११९॥
असतां विपुल संपत्ति मान । मनास नाहीं समाधान । पाठीसी काल्पनिक दु:खें गहन । त्यांतचि निमग्न सर्वदा ॥१२०॥
ऐकतां साईमुखींची कथा । शेटजी परमविस्मित चित्ता । ही तों आपुले मनाची अवस्था । अति सादरता परिसिली ॥१२१॥
काकांस इतुकी लवकर आज्ञा । अशक्य कोटीची ही घटना । परी तीही मिळतां प्रयासाविना । धरमसी मनांत संतुष्ट ॥१२२॥
काकानें निघावें बरोबर । धरमसीची इच्छा फार । तीही बाबांनीं पाडिली पार । देऊनि होकार जावया ॥१२३॥
हाही एक शेटजींचा पण । कैसी बाबांनीं जाणिली खूण । हेंही एक साधुत्वलक्षण । पटलें विलक्षण धरमसींना ॥१२४॥
जाहली संशयनिवृत्ति । साई साधु ही अभिव्यक्ति । जया मनीं जैसी वृत्ति । तैसीच अनुभूति दाविली ॥१२५॥
ज्या ज्या मार्गें जाऊं इच्छिती । तो तोच मार्ग तया लाविती । साई जाणती अधिकारसंपत्ति । परमार्थप्राप्तिही त्या मानें ॥१२६॥
भक्त भावार्थी अथवा टवाळू । साई समत्वें दोघांसी कृपाळू । एकास टाळूं दुजिया कवटाळूं । नेणे ही कनवाळू माउली ॥१२७॥
तंव ते दोघे जेव्हां निघती । पंधरा रुपये काकांप्रती । बाबा दक्षिणा मागूनि घेती । सवेंच वदती काकांस ॥१२८॥
“दक्षिणेलागीं ज्यानें मजला । असेल एक रुपया दिधला । दशगुणें मज तया मोबदला । द्यावा लागला मोजून ॥१२९॥
मी काय कोणाचें घेईंना फुकट । मागें न मी सर्वां सरसकट । फकीर जयासी दावी बोट । तयासींच गोष्ट दक्षिणेची ॥१३०॥
तोही फकीर जयाचा ऋणी । तयासींच ही करी मागणी । दाता घेऊनि करी पेरणी । पुढें संवगणी करावया ॥१३१॥
वित्त हें केवळ धर्मद्वारा । वित्तवंता पडेल पाहें उपकारा । धर्मैकफळ हें येणेंच खरा । ज्ञानासी थारा लाधतो ॥१३२॥
दु:खसंपाद्य हें वित्त । केवळ आहे इष्टोपभोगार्थ । व्यर्थ निष्कारण वेंचितात । धर्मसंचित अवगणुनी ॥१३३॥
करूनियां कवडी । अर्बुदान्त धन जें जोडी । तें विषयस्वार्थाचिया आवडी । कदा न दवडी तो सुखी” ॥१३४॥
नादत्तमुपतिष्ठति । सकळांस ठावी कीं ही श्रुति । पूर्वदत्त ठाके पुढती । तदर्थ मागती दक्षिणा ॥१३५॥
रामावतारीं रघुनंदनें । अपार स्वर्णस्त्रियांचीं दानें । करितां षोडश सहस्र प्रमाणें । घेतलें कृष्णें तत्फल ॥१३६॥
भक्तिज्ञानवैराग्यहीन । ऐसा जो भक्त तो अति दीन । तयास प्रथम वैराग्यीं स्थापून । भक्तिज्ञान मग देती ॥१३७॥
करविती जें दक्षिणाप्रदान । तीच वैराग्याची खूण । पुढें भक्तिपंथास लावून । ज्ञानप्रवीण करवीत ॥१३८॥
“आम्ही तरी काय करितों । एकपट घेतों दसपट देतों । क्रमें क्रमें ज्ञानपथा लावितों” । लोभ उठतो धरमसीतें ॥१३९॥
आपण होऊनि रुपये पंधरा । ठेविते झाले बाबांचे कारा । विसरले पूर्वकृत निर्धारा । प्रकार साराच अपूर्व ॥१४०॥
वाटलें आधीं वृथा जल्पलों । बरें केलें समक्ष आलों । साधू कैसे असतात बोधलों । तयांचे लोधलों अनुभवीं ॥१४१॥
असो द्दढ न विचारितां मनीं । आम्ही येणार नव्हतों नमनीं । तेही आलों आपण होउनी । साधूंची करणी अगम्य ॥१४२॥
“अल्ला मालिक” मुखीं निरंतर । तयास काय आहे दुष्कर । आम्ही पहावया होतों आतुर । केवळ चमत्कार साधूंचे ॥१४३॥
वृथा झाला आमुचा पण । घातलें मानवा लोटांगण । न मागतांही दक्षिणाप्रदान । केलें आपण होऊन ॥१४४॥
वृथा आमुची सारी बडाई । आपण होऊनि आपुली डोई । पूज्यभावें साईपायीं । वाहिली, नवाई काय दुजी ॥१४५॥
काय वानूं ही साईची कुसरी । हें सर्व जरी तो स्वयेंच करी । बाह्यात्कारी अलिप्तता धरी । नवलपरी ती काय दुजी ॥१४६॥
कोणी करा वा न करा वंदन । द्या अथवा न द्या दक्षिणादान । आनंदकंद साई दयाघन । करीन अवगणन कोणाचें ॥१४७॥
पूजियाचा नाहीं आनंद । अवमानिल्याचा नाहीं खेद । हर्ष न येथें कैंचा विषाद । पूर्ण निर्द्वंद्व ते हे स्थिति ॥१४८॥
असो कोणाचा कांहींही हेत । एकदां जयासी दर्शन देत । तयाची भक्ति पायीं जडवीत । शक्ति ही अद्भुत साईंची ॥१४९॥
असो पुढें उदीप्रसाद । पावूनि घेऊनि आशीर्वाद । परतले ते निर्विवाद । ख्याती ही अगाध साईंची ॥१५०॥
करावया तेथूनि निर्गमन । लागे बाबांचें आज्ञापन । करितां आज्ञेचें उल्लंघन । निमंत्रण तें विन्घांसी ॥१५१॥
आपमतीं करितां निष्क्रमण । अनुताप आणि विटंबन । मार्गांत व्यत्यय येती दारुण । तयांचें निवारण दुष्कर ॥१५२॥
ऐसी वर्णिली तेथील निर्गती । आमुचीही तेच स्थिती । “मी न आणितां कोणी न येती” । ऐसी वदंती बाबांची ॥१५३॥
“माझी इच्छा झालियावीण । दारवंठा त्यागील कवण । कोणा स्वेच्छें होईल दर्शन । घडेल आगमन शिर्डीचें” ॥१५४॥
साईसमर्थ कृपामूर्ति । तयां आधीन आमुची गती । कृपा उद्भवेल तयांचे चित्तीं । तेव्हांच येतील दर्शना ॥१५५॥
ऐसें तेथील गमनागमन । नसतां साईंचें चित्त प्रसन्न । होई न कोणासही आज्ञापन । उदीप्रदानसमवेत ॥१५६॥
करूनियां अभिवंदन । मागूं जातां आज्ञापन । उदीसमवेत आशीर्वचन । तेंच आज्ञापन निघावया ॥१५७॥
आतां एक विभूतीचा अनुभव । श्रोतयालागीं कथितों अभिनव । मग नेवासकर भक्तिप्रभाव । महानुभाव साईकृपा ॥१५८॥
वांद्रें शहरचा एक गृहस्थ । तोही जातीचा प्रभु कायस्थ । रात्रीं निद्रा येऊं नये स्वस्थ । जाहली शिकस्ता यत्नांची ॥१५९॥
डोळ्यास डोळा लागूनि निद्रित । असतां क्षणैक अकस्मात । स्वप्नीं तयाचा मृत तात । करी जागृत प्रतिदिनीं ॥१६०॥
पूर्वील युक्तायुक्त प्रकार । गुप्त गर्ह्य क्लिष्ट विचार । शिव्याशापपूर्वक उच्चार । वाक्प्रहार प्रेरी तो ॥१६१॥
प्रतिदिनीं ऐसा प्रसंग । प्रतिदिनीं होय निद्राभंग । पडेना कांहीं उमंग । चुकेना भोग पाठीचा ॥१६२॥
तेणें तो गृहस्थ कंटाळला । उपाय कांहीं न सुचे तयाला । पुसे एका साईभक्ताला । करावा इलाज काय तरी ॥१६३॥
आम्ही न जाणूं अन्य उपाव । साईमहाराज महानुभाव । ठेवाल जरी तुम्हीही भाव । उदी निजप्रभाव प्रकटील ॥१६४॥
जैसें जैसें तया कथिलें । तैसें तैसें तयानें केलें । अनुभवाही तैसेंच आलें । दु:स्वप्न पडलें नाहीं पुन: ॥१६५॥
कर्म - धर्म - वशें ते मित्र । होते साईसमर्थछात्र । वानूनि उदीचा महिमा विचित्र । अर्पीत लवमात्र तयांस ॥१६६॥
म्हणती जातां निजावयास । लावा थोडी मस्तकास । पुडी बांधूनि ठेवा उशास । मनीं श्रीसाईंस आठवा ॥१६७॥
पोटीं ठेवा भक्तिभाव । पहा मग या उदीचा प्रभाव । तात्काळ करील पीडेचा अभाव । सहज स्वभाव हा तिचा ॥१६८॥
ऐसें होतांच लागली त्याला । गाढ निद्रा त्या रात्रीला । दुष्ट स्वप्नाचा ठावचि पुसिला । अति आनंदला गृहस्थ ॥१६९॥
मग त्या त्याच्या आनंदास । काय पाहिजे पुसावयास । पुडी ती नित्य रक्षी उशास । स्मरे साईंस नित्यश: ॥१७०॥
घेऊं लागला छबीचें दर्शन । गुरुवारीं माळासमर्पण । करी नित्य मानसिक पूजन । पीडा निवारण जाहली ॥१७२॥
ऐसी चालविली नेमनिष्ठा । पावला तो स्थाई अभीष्टा । निद्राभंगादि दु:स्वप्नानिष्टा । विसरला कष्टा पूर्वील ॥१७३॥
हा तों उदीचा एक उपयोग । कथितों आणीक अद्भुत योग । कैशाही संकटीं करितां प्रयोग । अभीष्ट भोग देई ती ॥१७४॥
होता एक भक्त थोर । बाळाजी पाटील नेवासकर । बाबांलागीं झिजविलें शरीर । सेवा लोकोत्तर करूनि ॥१७५॥
गांवांत नित्य जाण्यायेण्याचे । तैसेच लेंडीची फेरी फिरण्याचे । हे बाबांचे रस्ते झाडण्याचें । नेवासकरांचें नित्य काम ॥१७६॥
याच सेवेची परिपाटी । चालू राहिली तयांचे पाठीं । राधाकृष्णाबाईची हातोटी । अलौकिक मोठी ये कामीं ॥१७७॥
वर्ण ब्राम्हाण अखिल वंद्य । आणि ही सेवा ऐशी निंद्य । शिवलें न केव्हांही हें विचारमांद्य । तियेच्या अनवद्य अंतरा ॥१७८॥
उठोनियां सकाळचे प्रहरीं । झाडू घेऊनियां निजकरीं । स्वयें ही बाबांचे रस्ते वारी । धन्य चाकरी तियेची ॥१७९॥
काम निर्मळ आणि सत्वर । कोण अन्य पावेल ती सर । पुढें मग जातां कांहीं अवसर । अबदुल सरकला पुढारा ॥१८०॥
असा तो पाटील महाभाग । संसारीं वर्तूनि संसार - विराग । केवढा तयाचा स्वार्थत्याग । परिसा तो भाग कथेचा ॥१८१॥
होतां शेताची संवगणी । धान्य समस्त मशिदीं आणी । रिचवूनि ढिगार तेथेंच अंगणीं । समर्पी चरणीं बाबांच्या ॥१८२॥
मानूनि बाबा सर्वस्व धनी । ते जें देतील त्यांतून उचलुनी । तितुकेंच धान्य घरीं नेउनी । गुजरा करूनि राही तो ॥१८३॥
महाराजांनीं स्नान करूनी । हात पाय व तोंड धुवूनी । आलेलें मोरीचें सांडपाणी । बाळा पिऊनि रहातसे ॥१८४॥
हे नेवासकर असेपर्यंत । चालला हा नेम अव्याहत । अजूनि तयांचा प्रेमळ सुत । चालवी हें व्रत अंशत: ॥१८५॥
तोही धान्य पाठवीत सतत । त्यांतील जोंधळ्याची भाकर नित । महाराज निजनिर्वाणान्त । खात असत चार वेळां ॥१८६॥
असो एकदां काय घडलें । वर्षश्राद्ध बाळाचें आलें । अन्न शिजवूनि तयार झालें । वाढूं लागले वाढपी ॥१८७॥
येणार्यांचा अंदाज धरूनी । पाकसिद्धि होती सदनीं । वाढतेवेळीं अंदाजाहुनी । संख्या त्रिगुणित जाहली ॥१८८॥
नेवासकरीण मनीं घाबरली । सासूबाईंशीं कुजबुजूं लागली । फजीतीची पाळी आली । कैसी निवारिली जाईल ॥१८९॥
सासूबाईंची निष्ठा थोर । आपुले साईसमर्थ खंबीर । असतां किमर्थ करावा घोर । राहीं तूं निर्घोर म्हणे ती ॥१९०॥
ऐसें सासूनें आश्वासुनी । उदी एक मूठभर घेऊनी । घातली अन्नाच्या प्रत्येक बासनीं । बासनें वस्त्रांनीं आच्छादिलीं ॥१९१॥
म्हणे तूं जा खुशाल वाढ । वाढण्यापुरताच कपडा काढ । पुनश्च पूर्ववत् कपडा ओढ । खूण ही द्दढ सांभाळीं ॥१९२॥
हें साईंच्या घरचें अन्न । आपुला नाहीं एकही कण । तोच करील लज्जा रक्षण । त्याचें उणेंपण तयाला ॥१९३॥
असो जैसा त्या सासूचा निश्चय । तैसाच तिजला आला प्रत्यय । कांहींएक न येतां व्यत्यय । जेवले पाहुणेपय सुद्धां ॥१९४॥
आलेगेले सर्व जेवले । यथासाङ्ग सर्व झालें । तरीही अन्न शिल्लक राहिलें । पात्रीं भरलेलें पूर्ववत ॥१९५॥
उदीचा हा ऐसा प्रभाव । संतांचा हा सहज सवभाव । जया मनीं जैसा भाव । तया अनुभवही तैसाच ॥१९६॥
असो उदीचा महिमा गातां । नेवासकरांची आणिक कथा । पाहोनि त्यांची भक्तिमत्ता । आठवली चित्त ती ऐका ॥१९७॥
होईल काय विषयांतर । एक्दां शंकूं लागलें अंतर । होईल तें होवो परी ती सादर । प्रसंगानुसार करावी ॥१९८॥
ऐसा निश्चय विषयांतर । एकदां शंकूं लागलें अम्तर । होईल तें होवो परी ती सादर । प्रसंगानुसार करावी ॥१९८॥
ऐसा निश्चय करूनि मनीं । कथा कथितों इये स्थानीं । जरी वाटली ती अस्थानीं । क्षमा श्रोत्यांनीं करावी ॥१९९॥
एकदां शिरडीचा रहिवासी । रघू पाटील नाम जयासी । पाहुणा गेला नेवाशासी । याचेच गृहासी उतरला ॥२००॥
गुरें ढोरें दावणीसी । बांधिलीं असतां एके निशीं । भुजंग एक फूंफूं शब्देंशीं । गोठयांत प्रवेशी अवचित ॥२०१॥
पाहोनियां ऐसा प्रसंग । जाहली सर्वांची मति गुंग । करोनियां तो फणा भुजंग । यथासाङ्ग बैसला ॥२०२॥
गुरें करूं लागलीं गडबड । सुटावयालागीं धडपड । नेवासकारांचा ग्रह सुद्दढ । साईच प्रकट जाहले ॥२०३॥
आतां गुरें सोडिल्याशिवाय । येथें नाहीं अन्य उपाय । नाहींतरी पडून पाय । होईल अपाय एकादा ॥२०४॥
दुरोनि देखिला भुजंग । हर्षित नेवासकरांतरंग । जाहला पुलकित सर्वांग । केला साष्टांग प्रणिपात ॥२०५॥
म्हणे साईंची कृपाद्दष्टि । भुजंगरूपें आले भेटी । आणिली दुग्ध भरोनि वाटी । भुजंगासाठीं तयानें ॥२०६॥
काय त्या बाळाजीची वृत्ति । चित्ता न ज्याच्या अनुमात्र भीति । पहा काय वेद भुजंगाप्रती । सावध श्रोतीं परिसिजे ॥२०७॥
कां हो बाबा फों फों करितां । काय आम्हां भिववूं पहातां । घ्या ही दुधाची वाटी आतां । स्वस्थचित्ता सेवा हो ॥२०८॥
वाटीनें त्यास काय होय । तपेलें भरूनि आणिलें पय । पुढें ठेविलें अंतरीं निर्भय । भावनेचें भय सारें ॥२०९॥
दूध ठेवूनि तयाचे जवळी । जाऊनि बैसला पूर्वस्थळीं । नाहीं दूर नाहीं जवळी । मुखीं नवाळी भुजंगाची ॥२१०॥
भीतिप्रद भुजंगागमन । सर्वांचें काय सारखें मन । गेले सर्व गांगरून । कैसें हें विन्घ निरसेल ॥२११॥
बाहेर जावें तरी भीति । भुजंग गेलिया अंतर्गृहाप्रती । कठीण तेथून बहिर्नि:सृती । बैसले पाळती ठेवूनि ॥२१२॥
इकडे भुजंग तृप्त झाला । चुकवूनियां सर्वांचा डोला । नकळे गेला कवण्या स्थळा । आश्चर्य सकलां वाटलें ॥२१३॥
मग तो सर्व गोठा शोधिला । परी न यत्किंचित थांग लागला । बहुतेकांचा जीव स्थिरावला । मनीं चुकचुकला नेवासकर ॥२१४॥
आरंभीं गोठयां जेव्हां प्रवेशला । तेव्हां जैसा द्दष्टीस पडला । तैसाव जातांना असता दिसला । हीच तयाला चुकचुक ॥२१५॥
बाळास होत्या स्त्रिया दोन । पुत्रसंतती होती लहान । कधीं कधींनेवाशहून । येती दर्शन घ्यावया ॥२१६॥
बाबा तयां दोघींप्रत । चोळ्या लुगडीं विकत घेत । आशीर्वाद तयां अर्पीत । ऐसा तो भक्त बाळाजी ॥२१७॥
हा सच्चरित मार्ग धोपट । जेथें याचा पाठ । तेथेंच द्वारकामाईचा मठ । साईही प्रकट निश्चयें ॥२१८॥
तेथेंच गोदावरीचें तट । तेथेंच शिरडी क्षेत्र निकट । तेथेंच साई धुनीसकट । स्मरतां संकट निवारी ॥२१९॥
जेथें साईचरित्रपठण । तेथें सदैव साईनिवसन । श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ॥२२०॥
स्मरतां साई स्वानंदघन । जपतां तन्नाम अनुदिन । नलगे इतर जपतप - साधन । धारणाध्यान खटपट ॥२२१॥
साईचरणीं ठेवूनि प्रीती । जे जे या साईंची विभूती । नित्यनेमें सेविती लाविती । ते ते पावती मनेप्सित ॥२२२॥
धर्माद चारी पुरुषार्थ । पावोनि होती ते कृतार्थ । प्रकट होतील सकल गुह्यार्थ । स्वार्थपरमार्थसमवेत ॥२२३॥
महापापादि पापें प्रबळ । तैसींच उपपातकेंही सकळ । उदीसंपर्कें होती निर्मूळ । लाधे निर्मळता सबाह्य ॥२२४॥
ऐसें हें विभूतिधारण । भक्तांसी ठावें हें महिमान । श्रोत्यांचेंही व्हावें कल्याण । म्हणून हें वर्णन वाढविलें ॥२२५॥
वाढविलें ही भाषा असार्थ । नेणें मीही महिमा यथार्थ । तरीही श्रोत्यांचिया हितार्थ । संकलितार्थचि निरूपिला ॥२२६॥
म्हणूनि श्रोतयांस हीच प्रार्थना । करूनि साईंप्रति वंदना । आपणचि आपुला अनुभव घ्याना । इतुकेंचि माना मद्वच ॥२२७॥
येथें नाहीं तर्काचें काम । पूज्यभाव व्हावा प्रकाम । नलगे बुद्धिचापल्योपक्रम । पाहिजे परम श्रद्धाळू ॥२२८॥
श्रद्धाविहीन केवळ तार्किक । वादोन्मुख आणि चिकित्सक । तया नं संतज्ञान सम्यक । शुद्ध भाविक तें पावे ॥२२९॥
कथांतर्गत न्यूनातिरिक्त । सर्व मानूनि साईप्रेरित । होऊनि दोषद्दष्टीविरहित । साईसच्चरित वाचावें ॥२३०॥
साई परम कनवाळू प्रीतीं । रसिक वाचकवृंद चित्तीं । येणें मिषें स्थापो निजमूर्ति । नित्य स्मृति व्हावया ॥२३१॥
कोठें गोमांतक कोठें शिरडी । तेथील चोरीची कथा उघडी । साई साद्यंत कथी सुख - परवडी । कथा चोखदी पुढारा ॥२३२॥
म्हणूनि हेमाड साईचरणीं । ठेवी मस्तक अंत:करणीं । विनवी श्रोतयां अति नम्रपणीं । सादर श्रवणीं व्हावया ॥२३३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । चिकित्साखंडन - विभूतिमंडनं नाम पंचत्रिंशत्तमोऽध्या: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥