शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:15 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
ज्यांचें क्षणैक देखिल्या वदन । होय अनंतजन्मदु:खदलन । तें परमानंद - जननस्थान । धन्य श्रीवदन साईंचें ॥१॥
ज्यांचें झालिया कृपावलोकन । तात्काळ कर्मबंधविमोचन । स्वानंदपुष्टी निजभक्तजन । न लागतां क्षण लाधती ॥२॥
ज्यांचिया कृपाद्दष्टीपुढें । कर्माकर्माचें फिटे बिरडें । यत्कृपासूर्याचिया उजियेडें । भवखद्योत दडे निस्तेज ॥३॥
जगाचीं पापें भागीरथी धूते । तेणें ती स्वयें मलयुक्त होते । सांचला निजमल निरसावयातें । साधूंचे इच्छिते चरणरज ॥४॥
कधीं साधूंचे पाय लागती । कधीं मजमाजी स्नानार्थ येती । त्यावीण निजपापाची निर्गती । नव्हे, हें निश्चिती जाणे ती ॥५॥
ऐसिया साधूंचा मुकुटमणी । समर्थसाई यांची ही वाणी । जाणूनि अत्यादरें भाविक सज्जनीं । आकर्णिजे पावनी ही कथा ॥६॥
नवल या कथेचें महिमान । श्रोते सज्ञान वा अज्ञान । परिसतां तुटेल कर्मबंधन । परमपावन कथा हे ॥७॥
नयनांचाही नयन साई । श्रवणांचाही श्रवण पाहीं । तेणेंचि रिघोनि माझिये ह्रदयीं । वार्ता जी ही निवेदिली ॥८॥
साई स्वयें महानुभाव । परिसतां या कथेचा नवलाव । श्रोते विसरतील देहभाव । अष्टप्रेमभाव दाटतील ॥९॥
साईमुखींची हे कथा । लक्ष लावूनि तिच्या ह्रद्नता । तात्पर्यावरी द्दष्टी ठेवितां । कृतकर्तव्यता श्रोत्यांस ॥१०॥
तरी विनंती परिसिजे श्रोतां । जरी मी या कथेचा वक्ता । मीही तुम्हांसारिखाच रिता । न घेतां मथितार्था येथील ॥११॥
आठवितां तयांचें भक्तप्रेम । मन विसरे मनोधर्म । होय संसारत्रस्ता । उपरम । याहूनि परम लाभ काय ॥१२॥
पूर्वकथेचें अनुसंधान । श्रोतां परिसिजे सावधान । होईल जीवा समाधान । कथा अव्यवधान परिसतां ॥१३॥
गताध्यायाचिये अंतीं । ऐकिली शेळ्यांची कथा श्रोतीं । तयां ठायीं बाबांची प्रीती । गतजन्मस्मृती तयांची ॥१४॥
तैसीच आतां हेही कथा । द्रव्यलोभाची परमावस्था । कैसी नेई अध:पाता । सावधानता परिसावी ॥१५॥
साईच पूर्ण कृपाद्दष्टी । कथा सूचवी उठाउठी । येऊं न देई श्रवणा तुटी । सुख - संतुष्टी वाढवी ॥१६॥
कथा वक्ता आणि वदन । स्वयें साईसमर्थ आपण । तेथें हेमाड किमर्थ कवण । उगाच टोपणनांवाचा ॥१७॥
वैसलों साईकथाब्धितटीं । त्या आम्हां काय कथांची आटाआटी । कल्पतरूचिया तळवटीं । कामना उठी तों सिद्धी ॥१८॥
काय दिनकराचिया घरीं । कोण दीपाची चिंता करी । जया अमृतपान निरंतरी । विषाची लहरी काय तया ॥१९॥
असतां आम्हां साईंसारिखा । सदैव आमुचा पाठिराखा । वाण काय कथापीयूखा । यथेच्छ चाखा त्या हरिखा ॥२०॥
कर्मसूत्र मोठें गहन । कोणासही ना होई आकलन । ठकिजेति महासज्ञान । भावार्थी अज्ञन तरिजेत ॥२१॥
तैसाच दुर्गम ईश्वरी नियम । कोण करील त्याचा अतिक्रम । आचरा नित्य लौकिक धर्म । करावें तत्कर्म सर्वदा ॥२२॥
नाहीं तरी अत्यंत अधर्म । पावूनियां मरणधर्म । जैसें जैसें जयांचें कर्म । पावती जन्म तदनुरूप ॥२३॥
यथाकर्म यथाश्रुत । शुक्रबीज - समन्वित । कांहीं योनिद्वारीं प्रवेशत । स्थावरभावाप्रत कांहीं ॥२४॥
यथाप्रज्ञं हि संभवा: । शुत्यर्थ नाहीं कवणा ठावा । जन्म घेणें तरी तो घ्यावा । रुचेल जीवा जो जैसा ॥२५॥
जाणा हे मूढ अविद्यावंत । शरीरग्रहणालागीं उद्यत । जैसें जयांचें उपार्जित । शरीर प्राप्त तैसें तयां ॥२६॥
म्हणून शरीरपाताआधीं । नरजन्माची अमोल संधी । दवडी ना जो आत्मबोधावधी । तो एक सुधी जाणावा ॥२७॥
तोच संसारबंधमुक्त । इतर संचारचक्रीं पडत । कधींही शरीरत्वासी न मुकत । यातना न चुकत जन्माच्या ॥२८॥
आतां या कथेचा नवलाव । दुष्टवृत्तीसी अंतर्भाव । बुजे मी देह ही आठव । सात्त्विक अष्टभाव उठतील ॥२९॥
गांठीं असतां अमूप धन । स्वभावें जो अत्यंत कृपण । धिग् धिग् तयाचें जीवन । आमरण शीण अनुभवी ॥३०॥
त्यांतही वैरवृत्तीचा वारा । कदाकाळींही नव्हे बरा । तयापासाव मनासी आवरा । करील मातेरा जन्माचा ॥३१॥
परस्परवैराचा परिणाम । उत्तमाचा जन्मे अधम । ऋण - वैर - हत्यांचा धर्म । फिटे तों जन्मपरंपरा ॥३२॥
ये अर्थींची अमृत वाणी । साईमुखोद्नार परमपावनी । करितों सादर श्रोतयांलागुनी । असावें श्रवणीं सावधान ॥३३॥
तीही कथा जैसी ऐकिली । जैसी माझिया स्मरणीं राहिली । तैसीच कथितों त्याच बोलीं । जे ती माउली वदली ते ॥३४॥
साईच स्वयें चरित्रकार । लिहवून घेई कथाविस्तार । हेमाड केवळ निमित्तमात्र । सूत्रधार ज्याचा तो ॥३५॥
एके प्रात:काळचे प्रहरीं । आठ वाजावयाचे अवसरीं । करूनियां नित्याची न्याहारी । पडलों बाहेरी फिरावया ॥३६॥
मार्गीं जातां जातां श्रमलों । नदीकिनारीं एका पातलों । पाय धुतले स्नान केलों । अंतरीं धालों बहुवस ॥३७॥
नदी तरी होती केवढी । या राहत्याच्या नदीएवढी । पाणी भरलें होतें दुथडी । कांठासी झाडी लव्हाळ्यांची ॥३८॥
होती तेथें पायवाट । गाडीमार्गही होता स्पष्ट । वृक्षही कांठीं होते घनदाट । छायाही उत्कृष्ट पडलेली ॥३९॥
वायु वाहे मंद मंद । तेणें मनाला बहु आनंद । द्दष्टीं देखोनि वृक्षवृंद । बैसलों स्वच्छंद छायेसी ॥४०॥
जातां चिलीम भरावयाला । तदर्थ छापी भिजवावयाला । डरांव डरांव शब्द ऐकिला । ध्वनि मज वाटला बेडकाचा ॥४१॥
नवल काय पाणीच जेथें । बेडूक असणें सहज तेथें । छापी भिजवून तंव मी परतें । घेतली हातें चकमक ॥४२॥
गारेवरी ठिणगी पाडून । चिलीम तयार झाली पेटून । तोंच एक वाटसरू येऊन । बैसला वंदून मजपाशीं ॥४३॥
नम्रपणें मजकडून । चिलीम आपुले हातीं घेऊन । लई लांब झुकलांत म्हणून । आदरें मज पुसून राहिला ॥४४॥
मशीद फार लांब येथून । तेथें जातां होईल ऊन । हें पलीकडे माझें सदन । चिलीम पिऊन जाऊं कीं ॥४५॥
तेथें वांईच खा कीं भाकर । स्वस्थ आराम करा विळभर । मग ऊन खालीं झालियावर । खुशाल माघारां परतावें ॥४६॥
मीही येईन बरावर । ऐसें भाषण झालियावर । चिलीम पेटवूनियां वाटसर । देई मज सादर ओढावया ॥४७॥
तिकडे तो बेडूक आर्त स्वरें । ओरड करूं लागे गजरें । चौकशी केली त्या वाटसरें । कोण बरें हा ओरडतो ॥४८॥
तंव मी वदें नदीकांठीं । बेडूक सांपडलासे संकटीं । लागलें त्याचें कर्म त्यापाठीं । ऐक ती गोठी तुज कथितों ॥४९॥
पूर्वजन्मीं जैसें करावें । इये जन्मीं तैसें भरावें । कर्मभोगा सादर व्हावें । आतां रडावें किमर्थ ॥५०॥
मग ऐसें हें परिसून । चिलीम माझिया हातीं देऊन । निघाला वाटसरू तेथून । म्हणे मी पाहून येतों जरा ॥५१॥
असे खरोखर तो बेडूक । अथवा कोणी प्राणी आणिक । मन तरी करूं नि:शंक । काय त्या दु:ख आहे तें ॥५२॥
ऐसी तयाची इच्छा बघुनी । म्हणालों मी जा ये पाहोनी । एका मोठया सर्पाचे वदनीं । बेडूक पडुनी ओरडतसे ॥५३॥
दोघेही महा हरामखोर । दोघांचींही कृत्यें अघोर । पूर्वजन्मींचीं पापें भयंकर । पावले देहान्तर । भोगावया ॥५४॥
असतां चालले ऐसे विचार । गेला वाटसरू त्या जाग्यावर । आला पाहूनि प्रत्यक्ष प्रकार । म्हणे तो साचार वृत्तान्त ॥५५॥
सर्पही तो जैसा काळ । ऐसा मोठा जबडा विशाळ । बेडूकही मोठा विक्राळ । परी तो फराळ सर्पाचा ॥५६॥
घडी अर्धघडीचा सोबती । पडली सर्पामुखीं आहुती । काय विचित्र कर्मगती । क्षणांत निश्चिंती होईल त्या ॥५७॥
तंव मी म्हणालों तयांतें । तो काय करितो निश्चिंतीतें । त्याचा मी बाप आहें ना येथें । मग मी कशातें पाहिजे ॥५८॥
सोडूनियां आपुलें स्थान । बैसलों जो येथें येऊन । तो काय बेडूक खाऊं देईन । पहा मी सोडवीन त्या कैसा ॥५९॥
आतां ही झुंज सोडविल्यावरी । आपण जाऊं आपुले घरीं । जा जा एकदां चिलीम भरीं । पाहूं मग काय करी सर्प ॥६०॥
चिलीम तात्काळ तयार केली । वाटसरूनें स्वयें चेतविली । झुरका मारून मजपुढें केली । हातीं मीं घेतली ओढावया ॥६१॥
मारिले म्यां झुरके दोन । वाटसरूला सवें घेऊन । गेलों त्या लव्हाळ्यामधून । पावलों तें स्थान विवक्षित ॥६२॥
पुनश्च सर्प अवलोकून । वाटसरू तो गेला भिऊन । केवढें हें धूड म्हणून । निवारी मजलागून भीतीनें ॥६३॥
म्हणे नका हो जाऊं पुढें । सर्प तो येईल आपुलेकडे । पळूं म्हणतां स्थळ हें सांकडें । नका हो तिकडे जाऊं नका ॥६४॥
अवलोकितां ऐसा देखावा । वाटसरू तो भ्याला जीवा । मग त्या दोघांचिया वैरभावा - । संबंधें परिसावा उपदेश ॥६५॥
अरे बाबा वीरभद्राप्पा । अझून हा तुझा वैरी बसाप्पा । पावला नाहीं का अनुतापा । दर्दुररूपा आला तरी ॥६६॥
तूंही आलासी सर्पयोनी । तरीही हाडवैर अजुनी । आतां तरी शरम धरुनी । वैर त्यजुनी स्वस्थ रहा ॥६७॥
शब्द पडतां मुखांतुनी । सर्प जो पळाला बेडूक सोडुनी । सत्वर खोळ पाण्यांत शिरुनी । अद्दश्य तेथुनी जाहला ॥६८॥
मृथूचिये मुखामधला । बेडूक टणकर उडून गेला । तोही झाडींत जाऊन लपला । वाटसरू झाला साश्चर्य ॥६९॥
म्हणे हें काय न कळे मजला । शब्द मुखींचा तो काय पडला । बेडूक कैसा सापानें सोडिला । सापही दडला तो कैसा ॥७०॥
यांतील वीरभद्राप्पा कोण । तैसाच यांतील बसाप्पा कोण । वाटसरू पुसे वैराचें कारण । म्हणे मज निवेदन करा कीं ॥७१॥
बरें आधीं झाडाखालती । जाऊं ओढूं चिलीम मागुती । म्हणालों करीन जिज्ञासापूर्ती । मग मी स्वस्थळाप्रती जाईन ॥७२॥
आलों दोघे झाडाखालीं । पडली होती दाट साउली । गार वार्याची झुळुक चालली । पुनश्च सळगावली चिलीम ॥७३॥
वाटसरूनें आधीं ओढिली । पश्चात् माझिये करीं दिधली । ती मीं ओढितां कथिली । कथा त्या वहिली वाटसरूस ॥७४॥
पहा माझिये स्थळापासून । कोस दोन अथवा तीन । इतकेंच दूर पवित्रस्थान । महिमासंपन्न होतें जुनें ॥७५॥
तेथें एक महादेवाचें । मोडकें देऊळ कधीं काळाचें । तयाचिया जीर्णोद्धाराचें । आलें सर्वांचे मनांत ॥७६॥
तदर्थ मोठी वर्गणी केली । बरीच रक्कम गोळा झाली । पूजेअर्चेची व्यवस्था ठरविली । पूर्ण आंखिली रूपरेषा ॥७७॥
तेथील एक मोठा धनिक । नेमिलें त्या व्यवस्थापक । पैसा केला तयाचे हस्तक । पूर्ण निर्णायक तो केला ॥७८॥
तयानें कीर्द ठेवावी पृथक् । तींत आपुली वर्गणी रोख । जमा करावी हें कार्यही अचूक । करावें प्रामाणिकपणानें ॥७९॥
परी तो जात्या मोठा कंजूष । खार न लागावा पदरास । ऐसिया धोरणें चालवी कामास । तेणें तें तडीस जाईना ॥८०॥
खर्च केली सारी रकम । अर्धेंमुर्धें जाहलें काम । खर्चीना हा पदरचा दाम । गांठींचा छदाम सोडीना ॥८१॥
जरी मोठा सावकार । कृपणपणाचा पूर्णावतार । बोलाची नुसती पेरी साखर । कामासी आकार येईना ॥८२॥
पुढें त्याच्या जमली घरीं । मंडळी पैसा जमविणारी । म्हणे ही तुझी सावकारी । काय तरी रे कामाची ॥८३॥
महादेवाचा जीर्णोद्धार । तूं न लावितां हातभार । पडेल कैसा नकळे पार । कांहीं विचार कर याचा ॥८४॥
करूनि लोकांची मनधरणी । पुनश्च मिळवूं आणिक वर्गणी । तीही देऊं तुज पाठवुनी । आण कीं ठिकाणीं हें काम ॥८५॥
पुढें आणिक पैसा जमला । उत्तम प्रकारें हातीं आला । कांहीं न त्याचा उपयोग झाला । धनिक बैसला तो स्वस्थ ॥८६॥
असो जाताम कांहीं दिवस । आलें देवाजीच्या मनास । याच धनिकाचिया कुटुंबास । जाहला ते समयास द्दष्टान्त ॥८७॥
तूं तरी हो जागी ऊठ । बांधीं जा त्या देउळा घुमट । जे खर्चशील त्याची शतपट । तुज तो नीळकंठ देईल ॥८८॥
दुसरे दिवशीं तो द्दष्टान्त । पतीच्या कानीं घातला साद्यंत । कवडी खर्चतां जया प्राणान्त । तया हा अत्यंत उद्वेगक ॥८९॥
करावा अहर्निश वित्तसंचय । दुजा न ज्याच्या चित्ता विषय । तयास या स्वप्नाचा आशय । द्रव्याचा व्यय केवीं पटे ॥९०॥
त्यानें सांगितलें पत्नीस । मी न मानीं द्दष्टान्तास । मुळींच नाहीं माझा विश्वास । मांडला उपहास तियेचा ॥९१॥
जैसी जयाची चित्तवृत्ति । तैसीच तया जगत्स्थिति । स्वयें असलिया शठप्रकृति । इतरही दिसती तैसेच ॥९२॥
जरी असतें देवाचे मनीं । माझाच पैसा घ्यावा काढुनी । मी काय दूर होतों तुजपासुनी । तुझेच स्वप्नीं कां गेला ॥९३॥
तुलाच कां हा द्दष्टान्त झाला । मलाच कां तो देवें न दिधला । म्हणोनि येईना भरंवसा मजला । याचा न समजला मज भाव ॥९४॥
असावें हें खोटें स्वप्न । अथवा हा असेल ईश्वरी यत्न । नवराबायकोंत व्हावी उत्पन्न । दुही हें चिन्ह दिसतें मज ॥९५॥
जीर्णोद्धाराचिये कामीं । साह्य माझें आहे का कमी । महिन्या महिन्यास होते रिकामी । थैली आम्हीं भरलेली ॥९६॥
लोक आणिती रक्कम सारी । दिसतें खरें हें बाह्यात्कारीं । जमाखर्चाची पद्धति व्यापारी । नुकसानकारी मज बहु ॥९७॥
लोकांनाही नाहीं अवगत । कळावें तें कैसें तुजप्रत । तेव्हां हा जो तुझा द्दष्टान्त । येईना यथार्थ मानावया ॥९८॥
खरा मानितां होईल फसगत । निद्राभंगें पडती द्दष्टान्त । ते काय कोणी मानी यथार्थ । धनिकें हा सिद्धान्त ठरविला ॥९९॥
ऐकून बाईल बसे निवान्त । पतीपुढें ती निरुत्तर होत । पैसा जरी लोक जमवीत । संतोषें देत व्कचितचि ॥११०॥
प्रेमेंवीण भिडेभाडें । पडतां आग्रह अथवा सांकडें । जें दिधलें तें देवा नावडे । गोडीचें थोडेंही बहु मोल ॥१०१॥
जैसा जैसा पैसा जमत । कामही तैसें तैसें होत । पैसा थकतां कामही थकत । ऐसें तें दिरंगत चाललें ॥१०२॥
धनिक काढीना कृपण जैसा । आपुल्या पिशवींतील एकही पैसा । पुनश्च झाला द्दष्टान्त कैसा । कांतेस तो परिसा धनिकाच्या ॥१०३॥
नको आग्रह करूं पतीस । पैसा देण्यास देउळास । भाव तुझा पुरे देवास । द्यावें तव इच्छेस येईल तें ॥१०४॥
पैसा एक मनोभावाचा । स्वसत्तेचा तो लाखाचा । अर्पण देवास करीं साचा । विचार पतीचा घेऊन ॥१०५॥
करूं नको व्यर्थ शीण । मना येईल तें द्यावें आपण । स्वसत्तेचें अल्प प्रमाण । असेना, अर्पण करीं तें ॥१०६॥
तेथें केवळ भाव कारण । तुझा तो आहे हें जाणून । कांहीं तरी दे दे म्हणून । आग्रह जाण देव धरी ॥१०७॥
तरी जें असेल अल्प वित्त । देऊनि होईं तूं निश्चिंत । भावावीण देणें तें अनुचित । देवा न यत्किंचित आवडे ॥१०८॥
विनाभाव जो देईल । त्याचें तें सर्व मातीमोल । अंतीं समूळ होईल निष्फळ । अनुभव हा येईल अविलंबें ॥१०९॥
असो हा द्दष्टान्त ऐकुनी । केला तिनें निश्चय मनीं । पितृदत्त अलंकार वेंचुनी । मागणें परिपूर्ण करावें ॥११०॥
मग तिनें पतीलागून । केला तो निश्चय निवेदन । पतीनें तें घेतलें ऐकून । अंतरीं उद्विग्न जाहला ॥१११॥
लोभ तेथें कैंचा विचार । नाहीं देव धर्म आचार । मनीं म्हणे हा काय अविचार । भ्रांतिष्ट साचार ही झाली ॥११२॥
म्हणे हे तिचे अलंकार । करूनियां सर्वांचा आकार । मोल ठरवूनि एक हजार । जमीन खाजण । होती जी गहाण कोणाची ॥११४॥
जमीनही ती होती ओसिक । पर्जन्यकाळींही नापीक । पत्नीस म्हणे करून टाक । अर्पण पिनाकपाणीस ॥११५॥
हजाराची ऐसी जमीन । करितां देवालागीं दान । द्दष्टान्तानुरूप होईल प्रसन्न । होसील उत्तीर्ण ऋणांतुनी ॥११६॥
असो मानूनि पतीचें वचन । कृपणकांता तंव जमीन । प्रेमभावें करी अर्पण । शंकरसंतोषण व्हावया ॥११७॥
वस्तुस्थिति पाहूं जातां । दोनशेंच्या कर्जाकरितां । धनिकापाशीं गहाण असतां । डुबकीची सत्ता हिजवर ॥११८॥
डुबकी एक अनाथ बाई । जमीन तिच्या सत्तेची ही । तीही जमीन गहाण देई । आपत्तिपायीं द्र्व्याच्या ॥११९॥
परी धनिक महालोभी । शंकराही फसवितां न भी । कांतेचें स्त्रीधन दावी । कपटलाभीं सुख मानी ॥१२०॥
बहु खोटी हे विषयलालसा । करी विषयासक्ताचे नाशा । गुंतूं नये या विषयपाशा । जीविताशा असेल जरी ॥१२१॥
श्रवणलालसे मरे कुरंग । सुंदरमणिधारणें भुजंग । तेजावलोकन - गोडिये पतंग । ऐसा हा कुसंग विषयांचा ॥१२२॥
विषयभोगा लागे धन । तदर्थ यत्न करितां गहन । विषयतृष्णा वाढे दारुण । अशक्य निवारण तियेचें ॥१२३॥
नि:संशय बुडीत जमीन । प्रयत्नेंही न पिके कण । ती म्हणे करा कृष्णार्पण । काय तें पुण्य दानाचें ॥१२४॥
जेथें न यत्किंचितही संकल्प । कृश्पार्पण तें निर्विकल्प । ऐसें नव्हे तें जोडिलें पाप । अंतीं जें संतापकारक ॥१२५॥
येरीकडे गरीब ब्राम्हाण । जो त्या देवाचें करी पूजन । देवार्थ जमीन होतां संपादन । पावला समाधान अत्यंत ॥१२६॥
असो पुढें कांहीं कालें । विपरीतचि होऊनि गेलें । कृत्तिका नक्षत्र अपार वरसलें । तुफान झालें भयंकर ॥१२७॥
एकाएकीं वीज पडली । इमारत ती सारी खचली । धनी तेवढी सुरक्षित राहिली । दग्ध झाली अवशेष ॥१२८॥
धनिकावरही पडला घाला । निजकांतेसह तोही निमाला । डुबकीही पावली पंचत्वाला । शेवट हा झाला तिघांचा ॥१२९॥
पुढें हा धनिक मथुरा नगरीं । एका गरीब ब्राम्हाणाउदरीं । तयाची ती भाविक अंतुरी । पुजार्या घरीं जन्मली ॥१३०॥
नांव तिचें ठेविलें गौरी । डुबकीचीही आणीक परी । शंकराचिया गुरवाचे उदरीं । तिये नारीचा नर झाला ॥१३१॥
तया नराचें बारमें केलें । चनबसाप्पा नाम ठेविलें । ऐसें तिघांचें स्थित्यंतर घडलें । फलोन्मुख झालें तत्कर्म ॥१३२॥
धनिक पावतां पुनर्जन्म । वीरभद्र ठेविलें नाम । हेंच कीं प्रारब्धकर्माचें वर्म । भोगेंच उपरम तयासी ॥१३३॥
शंकराचा जो पुजारी । तयाची मज आवड भारी । नित्य येऊनि आम्हां घरीं । चिलीम मजबरोबरी पीतसे ॥१३४॥
मग आम्ही आनंदनिर्भर । गोष्टी कराव्या रात्रभर । गौरी वाढली झाली उपवर । तीसही बरोबर आणीतसे ॥१३५॥
तीही माझी भक्ति करी । एके दिवशीं पुसे पुजारी । धुंडूनि पाहिलीं स्थळें सारीं । कुठेंही पोरीचें जमेना ॥१३६॥
बाबा ठिकाण पाहतां थकलों । प्रयत्न हरले टेकीस आलों । किमर्थ वाहसी चिंता मी वदलों । वर मार्ग चालों लागला ॥१३७॥
मुलगी तुझी भाग्यशाली । होईल मोठी पैसेवाली । तिलाच शोधीत आपुले पाउलीं । वर तिचा चालीस लागला ॥१३८॥
अल्पावकाशें तुझिया सदना । येईल पुरवील तुझी कामना । करील गौरीचिया पाणिग्रहणा । तुझिया वचनानुसार ॥१३९॥
येरीकडे वीरभद्र । गरीबीचा घरसंसार । आईबापांस देऊनि धीर । सोडोनि जो घर निघाला ॥१४०॥
तो गांवोगांवीं भिक्षाटन । कधीं मोलमजूरी करून । कधीं जें मिळे तेंच खाऊन । संतुष्ट राहून फिरतसे ॥१४१॥
फिरतां फिरतां दैवें आला । पुजार्याचिये सदना पातला । अल्लामियाची अघटित लीला । आवडूं लागला सकळांस ॥१४२॥
होतां होतां लोभ जडला । वाटलें गौरी द्यावी त्याला । नाडी - गोत्र - गण - योग जुळला । आनंद झाला पुजारिया ॥१४३॥
सवें घेऊनि वीरभद्राला । एके दिवशीं पुजारी आला । दोघाम पाहूनि त्या समयाला । विचार स्फुरला एकाएकीं ॥१४४॥
विचारासरिसा उच्चार झाला । सांप्रत लग्नाला मुहूर्त असला । तर तूं याला या गौरीला । देऊनि मोकळा हो आतां ॥१४५॥
घेऊनियां कांतेचें अनुमत । वर वीरभद्र केला निश्चित । पाहोनियां विवाहमुहूर्त । विवाह यथोचित लाविला ॥१४६॥
पूर्ण होतां निजकार्यार्थ । कुटुंब आलें दर्शनार्थ । आणिक माझिया आशीर्वादार्थ । प्रपंचीं कृतार्थ व्हावया ॥१४७॥
दिधलें उल्हासें आशीर्वचन । मिळूं लागतां सुखाचें अन्न । वीरभद्राची मुद्रा प्रसन्न । जाहली सुखसंपन्न होतांचि ॥१४८॥
तोही माझे भक्तीस लागला । अल्पावकाशें संसार थाटला । परी भाग्याचा कोण आथिला । येथें न जो विटला पैशाविण ॥१४९॥
या पैशाचा मोठा पेंच । थोरांमोठयांसही त्याचा जाच । वीरभद्राही समयीं टांच । द्रव्याचा असाच हा खेळ ॥१५०॥
बाबा ही बेडी मोठी दुर्धर । पैशावांचून होतों बेजार । कांहीं तरी सांगा प्रतिकार । जेणें मज संसार झेपेल ॥१५१॥
घालितों पायीं लोटांगण । आतां न बरवें प्रतारण । करा माझें संकट निवारण । तुम्हीच या कारण लग्नाला ॥१५२॥
मीही त्याला बहु बोधावें । प्रेमें आशीर्वचना द्यावें । अल्ला मालीक त्या हें ठावें । संकट निरसावें त्यानेंच ॥१५३॥
जाणोनि वीरभद्र - मनोगत । पुरावे इच्छित मनोरथ । म्हणोनि मी त्यातें आश्वासित । व्हावें न दुश्चित्त यत्किंचित ॥१५४॥
निकट तुझा भाग्यकाळ । करूं नको व्यर्थ तळमळ । द्रव्य तुझ्या हाताचा मळ । होईल सुकाळ तयाचा ॥१५५॥
द्रव्यानें मांडिली माझी हेळणा । विसंबेना कांतेचा आणा । पुरे पुरे ही आतां विटंबना । नको हा मोठेपणा लग्नाचा ॥१५६॥
असो पुढें झालें अभिनव । पहा गौरीच्या ग्रहांचें गौरव । खाजण जमिनीस चढला भाव । कळेना माव देवाची ॥१५७॥
आला एक खरेदीदार । लाख रुपये द्यावया तयार । अर्धे रोख दिधले जागेवर । अर्धे हप्त्यावर ठरविले ॥१५८॥
प्रतिवर्षीं दोन हजार । सव्याज द्यावे झाला विचार । पैका पंचवीस वर्षांनंतर । भरपाई भरपूर गौरीची ॥१५९॥
ठराव सर्वांस पसंत पडला । चनबसाप्पा गुरव उठिन्नला । पैका म्हणे जो शंकरा अर्पिला । गुरव पहिला मालिक त्या ॥१६०॥
तो म्हणे मज गुरवासाठीं । अर्धें व्याज वर्षाकाठीं । मिळावें माझिया हिशापोटीं । त्यावीण संतुष्टी मज नाहीं ॥१६१॥
वीरभद्राप्पा नेदी कांहीं । चनबसाप्पा स्वस्थ न राही । जुपंली वादावादी पाहीं । आले ते दोघेही मजकडे ॥१६२॥
शंकर तियेचा पूर्ण स्वामी । जमीन येईना ती इतरा कामीं । न पडावें व्यर्थ लोभसंभ्रमीं । दोघांस मग मीं सांगितलें ॥१६३॥
अर्पिली जी शंकराप्रती । तिचेंच मोल आहे हें निश्चिती । गौरीवीण जे जे अभिलाषिती । तयांच्या माती तोंडांत ॥१६४॥
देवाचिया अनुज्ञेवीण । शिवेल जो या पैशाला कोण । होईल देवाचे कोपास कारण । मत्ता ही संपूर्ण देवाची ॥१६५॥
प्रभुत्व जीवर पुजारियाचें । गौरीचें नातें वारसपणाचें । काय चाले तैं परकीयांचें । गौरीचें स्वसत्तेचें तें धन ॥१६६॥
म्हणोनि मग मी त्या दोघांतें । वदलों गौराईचिया सत्तें । वर्ततां घेऊनि तिच्या अनुमतातें । कृतार्थतेतें पावाला ॥१६७॥
वर्तल्या तिचिया इच्छेबाहेर । देव नाहीं राजी होणार । वीरभद्राप्पास नाहीं अधिकार । स्वतंत्र व्यवहार करावया ॥१६८॥
ऐसा जरी मीं माझा विचार । केला परिस्फुट तेथें साचार । तरी वीरभद्र रागावला मजवर । शिव्यांचा गजर वरसला ॥१६९॥
तो म्हणे बाबा तुमचिया मनीं । माझिया पत्नीची मालकी स्थापुनी । सर्व रकमेचा ढेंकर देउनी । निजहित साधुनी बैसावें ॥१७०॥
परिसोनि हे तयाचे शब्द । झालों मी जागचे जागीं स्तब्ध । अल्लामियाची करणी अगाध । उगाच कां खेद करावा ॥१७१॥
वीरभद्राप्पा मज हें बोलला । घरीं कांतेवरी अति तणाणला । ती तंव दुपारीं दर्शनाला । येऊनि विनवायाला लागली ॥१७२॥
बाबा कोणाचिया बोलावर । लक्ष देऊनि अवकृपा मजवर । न करावी मी पसरितें पदर । लोभ मज कन्येवर असावा ॥१७३॥
ऐसे तिचे शब्द परिसोन । म्यां तीस दिधलें पूर्ण आश्वासन । सात समुद्र न्यहाल करीन । तुज, त्वां खिन्न नसावें ॥१७४॥
तेच रात्रीं असतां निद्रिस्त । गौरीबाईस झाला द्दष्टान्त । शंकरानें येऊनि स्वप्नांत । कथिलें ती मात परिसावी ॥१७५॥
पैसा हा सर्व तुझा पाहीं । देऊं नको कोणास कांहीं । व्यवस्था तुज वदतों तीही । सदा राहील ऐसें करीं ॥१७६॥
देवळाप्रीत्यर्थ जो जो पैसा । चनबसाप्पा सांगेल तैसा । लावावा मज त्याचा भरंवसा । निर्बंध हा ऐसा राखावा ॥१७७॥
इतर कार्या पैसा लावितां । व्हावी न पैशाची अव्यवस्था । म्हणून मशिदींतील बाबांस न पुसतां । कांहींही व्यवस्था न करावी ॥१७८॥
गौरीबाईनें तो मजला । द्दष्टांत साद्यंत कथन केला । मींही सल्ला यथोचित दिधला । मानावयाला द्दष्टान्त ॥१७९॥
मुद्दल तुझें तूंच घेईं । चनवसाप्पास व्याजाची निमाई । ऐसें नित्य करीत जाईं । संबंध नाहीं वीरभद्रा ॥१८०॥
ऐसें आम्ही असतां बोलत । दोघेही ते आले भांडत । परस्परांनीं व्हावें शांत । उपाय मीं अत्यंत वेंचले ॥१८१॥
शंकराचा तो द्दष्टान्त । झाला जो होता गौराईप्रत । दोघांसही कथिला साद्यंत । परिसोनि उन्मत्त वीरभद्र ॥१८२॥
वीरभद्रें शिव्यांची लाखोली । प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली । अद्वातद्वा । भाषणें केलीं । वृत्ति गांगरली दुजियाची ॥१८३॥
तयास झाला उन्मत्त - वात । शिव्याशापांची बडबड करीत । सांपडशील तेथें घात । करीन मी म्हणत मुखानें ॥१८४॥
चनबसाप्पास अनुलक्षून । वीरभद्राप्पा उन्मत्त होऊन । म्हणे मी तुझे तुकडे करीन । खाईन गिळीन सगळेच ॥१८५॥
चनबसाप्पा भीतित्रस्त । पाय माझे घट्ट धरीत । म्हणे करा मज संकटमुक्त । अभय मग देत मी त्याला ॥१८६॥
तंव मी दीन चनबसाप्पातें । धीर देऊनि वदलों तेथें । वीरभद्राचिया हस्तें । मरूं मी तूतें देईना ॥१८७॥
असो पुढें होऊनि वात । वीरभद्राचा जाहला अंत । तो मग जन्मला सर्पयोनींत । ऐसें त्या दोहान्तर जाहलें ॥१८८॥
चनबसाप्पास पडली दहशत । तींतचि जाहला त्याचा अंत । जन्म पावे दर्दुरयोनींत । ऐसें हें चरित तयाचें ॥१८९॥
पूर्वजन्मींच्या वैरासाठीं । जन्म आला सापापोटीं । लागला बसाप्पा - दर्दुरापाठीं । धरी त्या शेवटीं वीरभद्र ॥१९०॥
दर्दुररूपें बसाप्पा दीन । भद्राप्पा - सर्पामुखीं पडून । परिसून तयाचें करुणावचन । हेलावलें कीं मन माझें ॥१९१॥
पूर्वदत्तवचन स्मरून । सर्पाचिया तोंडामधून । चनबसाप्पा मुक्त करून । पाळिलें वचन मीं आपुलें ॥१९२॥
अल्ला निजभक्तांलागून । संकटसमयीं ये धांवून । त्यानेंच येथें मज पाठवून । करविलें रक्षण भक्ताचें ॥१९३॥
हें तों प्रत्यक्ष अनुभवा आलें । वीरभद्राप्पास हांकून लाविलें । चनबसाप्पास संकटीं तारिलें । सकल हें केलें देवाचें ॥१९४॥
असो आतां भर कीं चिलीमी । पिऊन जाईन आपुले धामीं । तृंही जाईं आपुले ग्रामीं । लक्ष मन्नामीं असूं दे ॥१९५॥
ऐसें वदोनि चिलीम प्यालों । सत्संगाचें सौख्य लाधलों । फिरत फिरत परत आलों । परम मी धालों निजांतरीं ॥१९६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईमुखश्रुतकथाकथनं नाम सप्तचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥