रशिया युक्रेन युद्ध : रशियन लोक आम्हाला मारू शकतात पण आम्हीही त्यांना जिवंत सोडणार नाही- झेलेन्स्की

शनिवार, 16 एप्रिल 2022 (23:49 IST)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की युरोपीय देशांवर आरोप लावताना म्हणाले की, "जे देश अजुनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत ते लोकांच्या रक्तातून मिळालेल्या पैशातून कमाई करत आहेत."
 
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी जर्मनी आणि हंगेरीवर टीका केली. ते म्हणाले की, त्यांच्यामुळे रशियावर तेल खरेदीसाठी लागलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. या निर्यातीमुळे रशियाला या वर्षी 326 अरब डॉलरचा फायदा होऊ शकतो, असं ते म्हणाले.
 
गेल्या काही दिवसांत जर्मनीच्या नेत्यांबद्दल युक्रेनच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. जर्मनीने रशियावर घातलेल्या निर्बंधांचं स्वागत केलं आहे मात्र तेल खरेदीबाबत कडक पावलं उचलण्याचं पूर्णपणे समर्थन केलेलं नाही.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका सिच्युएशन रुममध्ये गुरुवारी (14 एप्रिल) झेलेन्स्की म्हणाले, "आमच्या काही मित्र देशांना ही बाब समजली आहे की काळ आता आधीसारखा राहिलेला नाही. आता हे प्रकरण पैशाचं नाही. हा अस्तित्वाचा संघर्ष आहे."
 
रशियाला कठोर प्रत्युत्तर देता यावं यासाठी युक्रेनला अधिकाधिक शस्त्रास्त्रं देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार झेलेन्स्की यांनी केला आहे.
 
ते म्हणाले, "अमेरिका, ब्रिटन आणि अन्य काही युरोपीय देश आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मदत करतही आहेत. मात्र आम्हाला लवकरात लवकर आणखी मदतीची गरज आहे."
 
गेल्या काही दिवसात राजधानी आणि युक्रेनच्या मध्य आणि उत्तर भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियाने आपले सैनिक तिथून हटवले आहेत. रशियाने आपल्या ताकदीच्या बळावर संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सोडून दिले आहेत.
 
युक्रेनच्या अधिकाधिक भागावर ताबा मिळवण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात हा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.
 
शांततेच्या चर्चा धूसर
युक्रेनच्या दक्षिणेला असलेलं मारियोपोल शहर रशियाच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मते, हे शहर राजनैतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शहर आहे.
 
झेलेन्सिकी यांच्या मते, या शहरात दहा हजारपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
 
ते म्हणाले, "आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार या शहरात दहा हजारपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्याशिवाय अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यांची कागदपत्रं बदलली आहेत अशीही माहिती आमच्याकडे आहेत. त्यांना रशियाचा पासपोर्ट दिला आहे आणि त्यांना रशियाला घेऊन जाण्यात आलं आहे. त्यांच्याबरोबर काय होतंय याची कोणालाही माहिती नाही. किती लोक मृत्युमुखी पडलेत याचीही काही निश्चित आकडेवारी नाही."
 
मारियोपोल आणि राजधानी कीव्हच्या बाहेर असलेल्या बुचा आणि बोरदोयंका या शहरात रशियाने ज्या पद्धतीने विद्ध्वंस केला आहे त्यावरून त्यांच्याशी चर्चेची शक्यता आणखी धुसर झाली आहे.
गेल्या आठवड्यात बुचा भाग युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या तावडीतून सोडवला. युक्रेनच्या सैन्यानुसार या शहरात शेकडो मृतदेह सापडले आहेत. त्यांच्यात अनेक सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. त्यात अनेक लोकांचे हात मागे बांधलेत आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या आहेत. लैगिंक अत्याचाराच्या अनेक बातम्याही या भागातून येत होत्या.
 
झेलेन्स्की पुढे म्हणाले, "बुचा मुळे शांततेच्या चर्चांना खीळ बसली आहे. हे माझ्या किंवा अन्य कोणाबद्दल नाही तर रशियाबद्दल आहे. त्यांना आमच्याशी चर्चा करण्याची फारशी संधी मिळणार नाही"
 
ते म्हणाले मागच्या आठवड्यात जेव्हा 'बुचा'च्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा अनेक भावन दाटून आल्या. दिवस संपला तसा रशियन सैन्याबद्दल त्यांच्या मनात संताप दाटून आला.
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि रशियन सैन्य वरून खालपर्यंत युद्ध अपराध्यांनी भरलं आहे.
 
फेब्रुवारी मध्ये रशियाने हल्ला केल्यावर देशाच्या नेतृत्वाचा बचाव करतान झेलेन्सकी दिसले. यादरम्यान त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं.
 
त्याचं सरकार शस्त्रांना अत्यावश्यक वस्तुंच्या वर्गवारीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच युद्धाच्या काळात लोकांमध्ये भीती पसरू नये याबाबतही ते प्रयत्नशील आहेत कारण त्यामुळे बँकांवर मोठ्या प्रमाणात दबाव येऊ शकतो आणि अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते असं ते म्हणाले.
"रशियाला हेच हवं होतं पण आम्ही ते होऊ दिलं नाही. रशिया इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करेल याची आम्हाला कल्पना नव्हती." झेलेन्स्की म्हणाले.
 
रशिया आता कीव्ह सोडून पूर्व आणि मध्य भागात तीव्र हल्ले करत आहे आणि युक्रेन हे भाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी रशियाने 2014 मध्ये क्रायमिया भागावर हल्ला केला होता.
 
झेलेन्स्की यांच्या मते, पूर्व भागात युक्रेनची स्थिती अतिशय नाजूक आहे. मात्र याच भागात त्यांचं सगळ्यात शक्तिशाली सैन्य तैनात असल्याचं ते म्हणाले.
 
ते सांगतात, "ते आम्हाला नेस्तानाबूत करू शकतात पण आम्ही त्याचं उत्तर देऊ. ते आम्हाला मारू शकतात पण ते स्वत:ही मरतील. ते इथे का आलेत आणि मुख्य म्हणजे काय करायला आलेत मला समजत नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती