रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. ताज्या वृत्तानुसार रशियन सैन्याने खेरसन भागातून माघार घेतली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही खेरसन आता आमचा असल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असेही म्हणतात की युक्रेनच्या सैन्याच्या विशेष तुकड्या खेरसन शहरात दाखल झाल्या आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की त्यांनी युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन प्रदेशातील नीपर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून आपले सर्व सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण केले आहे. युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थांनी मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की शुक्रवारी पहाटे 5 वाजता सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण झाले आणि तेथे एकही लष्करी तुकडी उरली नाही. ज्या भागातून रशियन सैन्याने माघार घेतली आहे त्यात खेरसन शहराचाही समावेश आहे.
युक्रेनचे सैन्य खेरसन शहरात दाखल झाले आहे. रशियन सैन्य पळून गेल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रध्वज उंचावून युक्रेनच्या लष्कराचे स्वागत केले. युक्रेनियन लष्कराच्या गुप्तचर सेवेने खेरसन नियंत्रणात असल्याची माहिती दिली. लष्कराच्या तुकड्या तेथे पोहोचल्या आहेत. खेरसन सोडण्यापूर्वी रशियन सैन्याने संग्रहालये, सरकारी इमारती, रुग्णालये आणि घरे लुटली. मॉस्को अजूनही खेरसनला रशियन भाग मानतो.