रशिया आणि युक्रेनमधील 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. दरम्यान, रशिया युक्रेनवर पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने आक्रमक झाला आहे. शुक्रवारी रात्री रशियाने युक्रेनच्या विविध भागांवर शेकडो ड्रोन आणि डझनभर क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला, ज्यामुळे युद्धबंदीच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने 300 हून अधिक इराणी बनावटीचे ड्रोन आणि 30 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी युक्रेनियन लक्ष्यांना लक्ष्य केले. हा हल्ला अलिकडच्या काही महिन्यांतील सर्वात मोठा आणि सर्वात संघटित हल्ला असल्याचे वर्णन केले जात आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या अनेक निवासी भागात आग लागली. युक्रेनियन अग्निशमन दल आग विझवण्यात व्यस्त होते.
ओडेसा शहराचे महापौर हेनाडी ट्रुखानोव्ह यांनी शनिवारी 'टेलिग्राम'वर सांगितले की, रशियाने काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ओडेसा शहरावर 20 हून अधिक ड्रोन आणि एका क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर एका उंच इमारतीत आग लागली. यामध्ये एका मुलासह किमान सहा जण जखमी झाले आहेत.
युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, परंतु काही अजूनही त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. स्थानिक नागरिकांना बंकरमध्ये राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.