सौरव नावाचे वादळ निवृत्त

PTIPTI
उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची पाचावर धारण बसली आणि तो सर्वांत यशस्‍वी कर्णधार ठरला. मात्र त्‍याचा हाच स्‍वभाव नंतरच्‍या काळात त्‍याला अडचणीचाही ठरला. मात्र त्‍यावरही मात करून आज तो आपली सर्वार्थाने गाजलेली कारकीर्द संपवित आहे. भारतीय क्रिकेटची जिंकण्‍याची भूक वाढविणारा जिगरबाज खेळाडू सौरव चंडीदास गांगुली त्‍याचे नाव. तुम्‍ही-आम्‍ही आणि भारतीय संघातला प्रत्‍येक खेळाडू त्‍याला 'दादा' म्‍हणून संबोधतो.

आपल्‍या दीर्घकाळच्‍या कारकिर्दीत एका लढवय्या सारख्‍या लढलेल्‍या सौरवने ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍दचा नागपूर येथील कसोटी सामना आपल्‍या कसोटी कारकिर्दीतीला शेवटचा असल्‍याचे जाहीर केल्‍याने दादाचे चाहते नक्‍कीच निराश झाले. मात्र दीर्घकाळापासून अपयशाचा सामना करत असलेल्‍या या वरिष्‍ठ खेळाडूने निवृत्त होताना ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द ठोकलेल्‍या धावांनी आपल्‍यात अजूनही बरीच आग शाबूत असल्‍याचे दाखवून दिल्‍यानंतर निवृत्ती स्‍वीकारली हे दिलासा देणारेही आहे.

संघातील युवा खेळाडूंना सतत पाठबळ देणे. त्‍यांच्‍यात धावांची आणि बळी घेण्‍याची भूक वाढविणे, आणि प्रतिस्‍पर्धी संघाला त्‍यांच्‍याच शब्‍दात अगदी संत तुकारामांच्‍या 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्‍या माथी हाणू काठी' शैलीतून उत्तर देणा-या दादाला म्‍हणूनच तर 'दादा' म्‍हणतात. ऑस्ट्रेलियासारखा बलाढय देश असो किंवा पाकिस्‍तान सारखा कट्टर पारंपरिक प्रतिस्‍पर्धी सौरवच्‍या नेतृत्‍वाखाली संघाने या देशांना त्‍यांच्‍याच भूमीवर पाणी पाजण्‍याचा इतिहास घडविला आहे.
  आपली संपूर्ण कारकिर्द अनेक वाद-विवाद आणि चढ-उतारांचा सामना करण्‍यातच घालवाव्‍या लागलेल्‍या या खेळाडूने आंतराराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आपली 'दादागिरी' तशीच शाबूत ठेवली. आणि आता निवृत्ती घेऊन हे वादळ शांत झाले आहे.      


जितकी आग गांगुलीची बॅट धावा करून ओकत असे तितकीच गांगुलीच्‍या बॉडी लॅग्वेजमधूनही झळकायची. आणि म्‍हणूनच गांगुलीच्‍या नेतृत्‍वाखालील भारतीय संघ एकेकाळी जगातील बलाढ्य संघ समजला जात असे. विश्‍व चषकात अंतिम सामन्‍यापर्यंत मजल मारण्‍याची कामगिरीही त्‍याच्‍याच काळातली. आज भारतीय संघात तरुण खेळाडूंमध्‍ये जिंकण्‍याचा जो स्पिरिट दिसतो हे दादाच्‍या मेहनतीचेच फळ म्‍हणावे लागेल. दादाला आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पहिल्‍यांदा संधी मिळाली ती देखिल या लढाऊ वृत्तीमुळेच.

क्रिकेटमध्‍ये प्रत्‍येक यशस्‍वी खेळाडूला विशेषणे दिली जात असतात. तद्वतच सौरवलाही 'द रॉयल बेंगॉल टायगर' म्‍हणून संबोधले जाते. मात्र हा वाघ केवळ कागदी नव्‍हता तर त्‍याची डरकाळी प्रतिस्‍पर्ध्‍यांना गर्भगळीत करणारी होती. हे त्‍याने अनेकदा सिध्‍द करून दाखविले आहे.

PTIPTI
एका बंगाली कुटुंबात जन्‍मलेल्‍या सौरवचा जन्‍म 8 जुलै 1972 साली कोलकात्‍यात झाला. वयाच्‍या 20 व्‍या वर्षी 1992 च्‍या सुमारास लढवय्यावृत्तीचा म्‍हणूनच सौरवला पहिली संधी मिळाली ती ऑस्ट्रेलियाच्‍या भूमीवर. त्‍यानंतर मात्र सलग चार वर्ष तो संघात नव्‍हता. 1996 च्‍या इंग्लंड मालिकेसाठी मिळालेल्‍या संधीचे सोने करीत त्‍याने या मालिकेत सलग दोन शतक कुटून आपल्‍यात किती क्षमता आहे हे दाखवून दिले.

त्‍यानंतर मात्र दादाला मागे वळून पाहण्‍याची गरज भासली नाही. केवळ काहीच महिन्‍यात सौरव भारतीय संघातला सचिननंतरचा तगडा खेळाडू बनला. भारतीय संघाला एक तगडी धावसंख्‍या उभारून देण्‍यासाठी मैदानावर उतरणा-या या खेळाडून कधी सचिनच्‍या तर कधी सहवागच्‍या मदतीने अनेकदा संघाला तारून नेले आहे.

आपल्‍या संघ सहका-यांवर पूर्ण विश्‍वास टाकणा-या आणि त्‍यांच्‍या मैदानावरील बॉडी लॅग्‍वेजमध्‍ये प्रचंड बदल घडवून आणणा-या दादाने कर्णधारपदाच्‍या काळात अनेक नव्‍या चेह-यांना संधी दिली. लॉर्ड्सच्‍या मैदानावर ब्रिटीशांना त्‍याच्‍याच भूमीवर पराभूत केल्‍यानंतर टी-शर्ट काढून ज्‍या पध्‍दतीने सौरवने उत्तर दिले होते ते कधीही विसरण्‍यासारखे नाही.

सौरवचे फटके आणि मैदानावरची फलंदाजीच त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाबद्दल बरेच काही सांगून जायची विशेषतः षटकार ठोकण्‍याची त्‍याची ती खास 'स्‍टाईल'. क्रिकेटची पंढरी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या लॉर्डसच्‍या मैदानावर शतक ठोकण्‍याची इच्‍छा प्रत्‍येक फलंदाजाच्‍या मनात असते. क्रिकेटचा देव म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सचिनलाही या मैदानावर शतक ठोकता आलेले नाही. त्‍या मैदानावर एकाच मालिकेत दोन शतके ठोकण्‍याचा भीमपराक्रम दादाने करून दाखविला आहे.
PTIPTI



त्‍याच्‍या कौशल्‍याने संघाच्‍या कामात सातत्‍याने सुधारणा होत गेल्‍याने दादाच्‍या शब्‍दालाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळात एक वजन होते. म्‍हणूनच त्‍याच्‍या सांगण्‍यावरूनच मंडळाने संघाच्‍या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपल यांची नियुक्‍ती केली. मात्र नंतर हेच चॅपल गुरूजी गांगुलीवर भारी पडू लागले. त्‍यांनी गांगुलीचीच पाळमुळे खणून काढण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला. त्‍यानंतर अनेक वाद झाले. आणि अखेर चॅपल बाहेर पडले.

नंतरच्‍या काळात संघाच्‍या कामात सुधारणा होत गेली. गांगुलीची वैयक्‍तीक कामगिरी मात्र ढासळत गेली. भारतीय संघातील 'फॅब्‍युलिअस फोर' पैकी एक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या खेळाडूच्‍या बॅटीतून धावांचा रतिब कमी झाला. सातत्‍याने अपयशाने त्‍याचा सामना केला. संघाच्‍या व्‍यवस्‍थापनातही मोठे बदल झाले. नवख्‍या खेळाडूंना अधिक संधी दिल्‍या जाऊ लागल्‍या आणि नंतर गांगुली एकाकी पडला. अशा परिस्थितीतूनही त्‍याने स्‍वतःला सावरत जेव्‍हा-जेव्‍हा संधी मिळाली आपला नैसर्गिक खेळ करून क्रिकेटची सेवा केली आहे. आज निवृत्तीच्‍या टप्‍प्‍यात आल्‍यानंतरही गांगुलीने आपल्‍यात आणखी किती क्षमता आहे, हे सिध्‍द करून दाखविले आहे.

सचिन तेंडुलकर नावाच्‍या क्रिकेटच्‍या एका वादळासोबत आयुष्‍यातील अनेक सामने गाजविलेल्‍या या खेळाडूच्‍या निवृत्तीने सचिन खूपच दुःखी झाला आहे. क्रिकेटच्‍या मैदानावर जरी दादा आता यापुढे दिसणार नसला तरीही वेगवेगळ्या सामाजिक कामांतून तो सतत आपल्‍या चाहत्‍यांना दिसणार आहे. म्‍हणूनच दादाच्‍या चांगल्‍या आणि वाईट प्रत्‍येक प्रसंगांमध्‍ये त्‍याला पूर्णपणे पाठिंबा देणा-या त्‍याच्‍या राज्‍याच्‍या विकासासाठी तो आता कार्य करणार आहे.

आयुष्‍यभर क्रि‍केटमध्‍ये व्‍यस्‍त राहिलेल्‍या सौरवच्‍या निवृत्तीनंतर त्‍याच्‍या कुटुंबीयांना आनंद होत असला तरीही क्रिकेटवर सच्‍चे प्रेम करणा-या प्रत्‍येकाला सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी आहे.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा