महिलांसाठी संमिश्र वर्ष

महिलांसाठी सन 2008 संमिश्र ठरले. अनेक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. वर्षाच्या सुरवातीस मालती राव यांच्या कादंबरी डिस्आर्डरली वुमनला सन 2007 मध्ये इंग्रजी साहित्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. तर वर्षाच्या शेवटी चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदाची धूरा स्वीकारून आपली प्रतिभा सिध्द केली.

जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतास पहिली महिला राष्ट्रपती याच वर्षी मिळाली. अमेरिकेचे नवीन राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या सोनल शाह यांची आपल्या सल्लागाराच्या टीममध्ये निवड केली. केरळमधील कॅथलिक नन सिस्टर अल्फोंजा यांना व्हॅटिकनमधील एका समारंभात संतपद बहाल करण्यात आले. हा दर्जा मिळवणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

नोकरी करणार्‍या महिलांना केंद्र सरकारने मोठे बक्षिसच दिले. त्यांची प्रसूतीरजा 90 दिवसांवरून 180 दिवसांपर्यंत वाढवली. तसेच मूल 18 वर्षाचे होईपर्यंत दोन वर्ष अतिरिक्त सुट्टी देण्याचेही जाहीर केले.

चित्रपटसृष्टीतील महिलांसाठी हे वर्ष लाभदायक ठरले. मधुर भंडारकर यांनी प्रियंका चोपड़ा आणि कंगना राणावत या महिला कलाकारांच्या माध्यमातून फॅशन चित्रपटास यश मिळवून दाखविले. राजकारणात शीला दीक्षित यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे सिंहासन ताब्यात घेतले. परंतु, राजस्थानात वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशात उमा भारती यांचे नेतृत्व अपयशी ठरले. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतून जास्त संख्येने महिला आमदार सभागृहात आल्या नाहीत. तर दुसरीकडे महिला आरक्षण विधेयक अद्याप धुळखात पडले आहे.

खेळात भारतीय महिलांना संमिश्र यश मिळाले. टेनिसमध्ये सानिया मिर्झा फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. मात्र, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला बॅडमिंटन फेडरेशनकडून 'मोस्ट प्रोमिसिंग प्लेयर ऑफ द ईयर' हा पुरस्कार मिळाला. सायनाने मलेशियामधील वर्ल्ड सिरीज सुपर मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहचून इतिहास निर्माण केला. एकंदरीत सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्यास सिध्द करुन दाखविले.

वेबदुनिया वर वाचा