Toxic Relationships प्रेमात पडलेल्या धाडसी मुलींनो, हिंसक नात्यातून असं बाहेर पडता येतं...
- नासिरुद्दीन
मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एकाने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मागच्या सहा महिन्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.
आजकाल मुली आपल्या पसंतीचा जोडीदार निवडतात. पण पूर्वी आईवडिलांनी निवडलेल्या जोडीदाराकडून किंवा खुद्द स्वतःच्या आई वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून मुलींची हत्या झाल्याच्या घटना सर्रास घडत होत्या.
पण आता प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्यांची आयुष्यभरासाठी सोबत करतो म्हणणारे जोडीदारसुद्धा त्यांची हत्या करू लागलेत.
समोर येणारी प्रत्येक घटना पहिल्या घटनेपेक्षा अधिक भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे.
आधी मुलीची हत्या केली जाते. नंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला जातो. मृतदेहाची काटछाट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि हत्यारं वापरली जातात. या छिन्नविछिन्न शरीरासोबत ते एकच घरात राहतात. नंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्या शरीराच्या एकेका भागाची विल्हेवाट लावतात.
जसं की, जाळणं, उकळणं, फेकणं, कुत्र्यांना खाऊ घालणं, सुटकेस मध्ये भरणं, फ्रीजरमध्ये ठेवणं... आणि एवढं सगळं करून बाहेरच्या जगात एकदम आनंदात राहतात.
आणि हे सगळं कोणासोबत? तर जिला साताजन्माची वचनं दिली आहेत तिच्यासोबत..
लिव्ह-इन म्हणजेच सहजीवनात दोन लोक त्यांच्या इच्छेने एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो, त्यामुळे या नात्यात समानता, आदर, अहिंसा, प्रेम असेल अशी अपेक्षा असते.
पण आता हे संबंधही डागाळू लागलेत. पण अशा काही घटनांचा वापर लिव्ह-इनच्या संपूर्ण संकल्पनेविरोधात करणं चुकीचं ठरेल.
पुरुषांसाठी हे सर्व करणं इतकं सोपं का असतं?
मुला-पुरुषांनी कधी प्रेमात पडलेल्या मुलींच्या डोळ्यात पाहिलं नाही का?
तुम्ही जर त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर त्यात तुम्हाला प्रेम, विश्वास दिसेल. त्यांना फसवणं चुकीचं ठरेल. तुम्ही किती मोठा गुन्हा करताय याचा जरा विचार करा.
तसं तर बऱ्याच मुलांना आणि पुरुषांना प्रेम करणं कधी जमतच नाही. ते प्रेमात अस्वस्थ आणि गर्विष्ठ होतात. ते स्वतःला विजेता समजतात. त्यांना प्रेम जिंकायचं असतं.
प्रेमात आपलं सर्वस्व पणाला लावायचं असतं हे त्यांना माहीतच नाही.
आणि इतकंच नाही तर पुरुषांना प्रेमाची सुरुवात शरीरापासून होते असं वाटतं. आणि त्यामुळे ते सुरुवात देखील तशीच करतात. शरीर जिंकून घेण्यासाठी ते बळजबरी करतात.
पण एखाद्याचं मन जिंकायला माणूस व्हावं लागतं आणि माणूस बनूनच राहावं लागतं. थोडक्यात तुम्हाला अहिंसक व्हावं लागतं आणि हे सगळं करणं सोपं नसतं.
पुरुषी अहंकार दाखवून प्रेम होणं शक्य नाही
जोपर्यंत मुलगी त्यांच्या ऐकण्यात येत नाही तोपर्यंत ते अती साळसूदपणे वागतात. पण ज्याक्षणी त्यांना कळतं की ही माझीच आहे तेव्हा त्यांच्यातला पुरुष जागा होतो.
किंवा जर त्यांना हे समजलं की, या मुलीला मागेपुढे कोणी नाहीये किंवा तिच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही, ही माझ्या तावडीत सापडली आहे, त्यानंतर पुरुषाचं वागणं बोलणं बदलतं.
लग्न न करता राहणाऱ्या मुलींना सामाजिक मान्यता मिळणार नाही या गोष्टीचाही त्यांना चांगलाच अंदाज आलेला असतो. लाज आणि सन्मानाच्या नावाखाली ती गप्प राहणं पसंत करेल हे त्यांना माहीत असतं.
मुलींच्या या मन:स्थितीचा फायदा पुरुष अगदी चांगल्या पद्धतीने घेतात. हिंसाचाराचा पाया असाच रचला जातो.
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि भूतकाळात हत्या झालेल्या बहुतेक मुली अशाच परिस्थितीतून जात असाव्यात. म्हणूनच त्यांच्यापैकी बहुतेकांच्या नातेवाईकांना त्यांच्या आयुष्याची माहिती नव्हती किंवा त्यांना माहिती असलं तरी त्यांनी त्यांच्या मुलींशी संबंध तोडले होते.
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या मुली धाडसी असतात
आपल्या समाजात मुलीचं लग्न हे केवळ सामाजिक संरक्षणाचं छत्र नसून सामाजिक आदर आणि नातेसंबंधांची मान्यता मिळवण्याचं एक साधन आहे.
बहुतेक मुली ज्या पद्धतीने वाढलेल्या असतात, त्यात त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा किंवा त्यांच्या जीवनाचा उद्देश लग्न असल्याचं शिकवलं जातं.
त्यामुळे लग्न न करता 'लिव्ह-इन' मध्ये राहणं मुलांसाठी आणि मुलींसाठी पूर्णपणे वेगळं आहे. मुलीने लिव्ह-इनचा पर्याय निवडणं हे धाडसाचं काम आहे.
समाज नेहमी मुलींकडे बोट दाखवतो, मुलींनाच नेहमी प्रश्न विचारले जातात. कलंक नेहमी मुलीलाच सहन करावा लागतो.
आज अशा खूपच कमी मुली आहेत ज्या लग्नसंस्था नाकारून धाडसाने लिव्ह-इनचा पर्याय निवडतात. आणि विशेष म्हणजे ते उघडपणे स्वीकारण्याची त्यांच्यात हिंमत असते.
बहुतेक मुली हा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून लपवून ठेवतात. कधीकधी तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला ही याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. असं का?
एवढंच नाही तर आपण निवडलेल्या जोडीदारासोबत धैर्याने उभं राहणं मुलांपेक्षा खूप धाडसाचं काम आहे. म्हणूनच जर कोणी आपल्या जोडीदाराच्या प्रेमाखातर घर सोडते तेव्हा जर तिच्यासोबत फसवणूक झाली तर हा खूप मोठा गुन्हा आहे.
लिव्ह-इनचा निर्णय घेणाऱ्या मुलींच्या पाठीशी सहसा त्यांचं कुटुंब उभं राहत नाही. जेव्हा या मुलींचे साथीदार त्यांच्याशी गैरवर्तन करतात, तेव्हा त्यांच्याकडे दुसरा कोणता आधारच नसतो ज्याच्याकडे त्या व्यक्त होऊ शकतील. किंवा त्या व्यक्तीच्या भरवशावर वाईट वागणाऱ्या जोडीदाराशी नातेसंबंध तोडू शकतील. त्यांच्यासाठी अशी कोणती जागाही नसते जिथे त्या राहू शकतील. त्यांच्या जुन्या मैत्रिणी सुद्धा त्यांच्यापासून तुटलेल्या असतात.
आणि असं ही मुलींना लहानपणापासून एकच शिकवलेलं असतं ते म्हणजे कसंही असो नातं निभवायचं असतं. त्यामुळे मुलीही ते सहन करतात. त्यांच्या सहनशीलतेमागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे त्यांना तो त्यांच्या निर्णयाचा परिणाम वाटतो. त्यामुळे त्या सहन करतात.
दुसरीकडे अशा नातेसंबंधातून बाहेर पडणं मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी नेहमीच सोपं असतं. त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून तुटत नाही. पुरुष आहे म्हणून चालून जातं. या सगळ्याला त्याचं पौरुषत्व मानलं जातं.
आणि मुलाच्या घरचे सुद्धा जाणूनबुजून त्यांचं लग्न लावून देतात. एकी सोबत नातेसंबंधात असताना हा पुरुष दुसऱ्या मुलीशी लग्नही करतो. लग्नासाठी तो लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या मुलीला मारून तंदूर मध्ये जाळतो. समाज, कुटुंब आणि मित्रांमध्ये त्याचं हे पाप सहज स्वीकारलं जातं.
पुरुषांनी प्रेम करणं शिकायला हवं
मुलींमध्ये खूप बदल घडले पण त्यांच्यासोबत मुलं बदलली नाहीत. ते आजही पुरुषी स्वभावाने वागतात. त्यांच्यासाठी नातेसंबंध पितृसत्ताक पद्धतीप्रमाणेच असतात.
ते प्रेमात बऱ्याचदा फसवणूक करतात. त्यांचे विचार पितृसत्ताक असतात मात्र आपण मातृसत्ताक आहोत असं त्यांना दाखवायचं असतं. इन्स्टाग्रामवर स्त्रीवादी पोस्ट आणि रील्स टाकून त्यांना मुलींचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. पण त्या पोस्टनुसार त्यांना वागायचं मात्र नसतं.
पुरुषांनी समानता आणि प्रेमात आदर करायला शिकलं पाहिजे. यासाठी सर्वप्रथम मुलीला आदर दिला पाहिजे.
आई-वडील, नातेवाईक किंवा मित्रमंडळीही खूप काही करू शकतात.
सहसा मुलीचे कुटुंबीय, नातेवाईक, गाव-समाज तिच्या आवडीच्या जोडीदाराला नाकारतात. यातून मुलगी एकटी पडते आणि मुलांना मात्र पुरुषार्थ दाखवायचा आणखीन एक मार्ग सापडतो.
त्यामुळे जर एखादी मुलगी स्वतः जोडीदार निवडत असेल तर तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तिला समजून घेऊन तिला प्रोत्साहन द्यायला हवं. तिला इतकं विश्वासात घ्यायला हवं की तिने आपलं म्हणणं बिनधास्त मांडलं पाहिजे.
मुलीच्या या निर्णयाला तुमच्या प्रतिष्ठेशी जोडून न बघता तिला पाठिंबा दिला पाहिजे. जेणेकरून भविष्यात जर तिच्याबरोबर वाईट काही घडलंच तर ती त्या पुरुषाचा सामना धीराने करेल.
मुलींनी काय करायला हवं?
लिव्ह-इन हा एक मोठा निर्णय आहे. साधारणपणे नोकरी करणाऱ्या मुलींना वाटतं की त्या असे निर्णय घ्यायला समर्थ असतात त्यामुळे त्या असे निर्णय घेतात.
पण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे आर्थिकदृष्टया सक्षम होणं किंवा नोकरी करणं असा नाही. सशक्त असण्याची पहिली अट म्हणजे मानसिकदृष्ट्या स्वतंत्र व्यक्तिमत्व. मानसिक गुलामगिरीतून मुक्त असं जीवन.
मुलीने जर कुटुंबापासून स्वतंत्र आणि स्वतःच्या हिताचा निर्णय घेतला तर त्यांनी आयुष्यातील प्रत्येक निर्णयात हे स्वातंत्र्य जपलं पाहिजे.
मुलींनी एकीकडे कुटुंबीयांपासून स्वातंत्र्य मिळवलं आणि आपल्या पुरुष जोडीदाराजवळ ते गहाण ठेवलं असं अजिबात व्हायला नको.
पुरुषाला हवं तसं आयुष्य त्यांनी जगावं, त्यांचे निर्णय ऐकावेत, त्यांची गुलामगिरी पत्करावी याला सशक्त होणं म्हणत नाहीत.
म्हणूनच मुलींना प्रेमाच्या नावाखाली सहन कराव्या लागणाऱ्या गुलामगिरीत फरक करता आला पाहिजे.
'चांगली मुलगी' नामक बंधनं झुगारून द्यावीत
पितृसत्ताक समाजाने निर्माण केलेली सहनशील, सज्जन, त्यागी, नोकरदार, चांगली मुलगी या बंधनातून मुलींना बाहेर पडावं लागेल. मुलगी परक्याचं धन असते किंवा पती परमेश्वर ही विचारसरणी सोडून द्यावी लागेल.
पुरुष त्यांच्यासोबत कसाही वागू शकतो हे पहिल्यांदा मनातून काढून टाकावं लागेल. जसं की तो प्रेम करू शकतो तर मारू ही शकतो, माझ्या एखाद्या चुकीसाठी त्याने मारलं तर काय मोठा गुन्हा केला? तो प्रेमही करतो माझ्यावर... असा विचार करणाऱ्या मुलींसाठी प्रेमाची परिभाषा नेमकी काय आहे? त्या कोणत्या प्रेमाबद्दल बोलत आहेत?
प्रेमात हिंसेला स्थान नाही
प्रेमात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला स्थान असू शकत नाही. हिंसेचा अर्थ केवळ शारीरिक इजा करणं नव्हे, तर मानसिक त्रास देणं देखील आहे.
मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध असणारी प्रत्येक एक गोष्ट हिंसा आहे. प्रेम करणारा माणूस कधीही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू शकत नाही, हत्या तर कदापि नाही. तो मुलीच्या जाण्यायेण्यावर, कोणाशीही बोलण्यावर बंधनं लादू शकत नाही.
आणि मुलींनी हे रोखठोकपणे सांगायला हवं. कारण हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच, जे काही त्यांच्या सन्मानाच्या विरोधात असेल, स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही प्रयत्न असेल, तो अगदी पहिल्या टप्प्यावर थांबवणं अत्यंत आवश्यक आहे.
सन्मान आणि स्वातंत्र्याशी केलेली पहिली तडजोड तुम्हाला नेहमीच तडजोडीचा मार्ग स्वीकारायला भाग पाडते. या तडजोडीत संपतं ते म्हणजे मुलीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व.
अशा कोणत्याही हिंसेचा प्रतिकार अहिंसक पद्धतीने करणं आवश्यक आहे. अहिंसा हे दुर्बलतेचं लक्षण नाहीये. महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे अहिंसा हे बलवानांचं शस्त्र आहे.
आणि इतकंच नाही तर मुलींनी हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की त्यांनी लिव्ह-इनसारखा धाडसी निर्णय स्वतःहून घेतला आणि त्यासाठी लोकांशी संबंध तोडले म्हणून सगळं सहन करायलाच पाहिजे असं नाही.
कोणत्याही परिस्थितीत हिंसा खपवून न घेण्याची सवय लावली पाहिजे. तुमच्या नात्यात हिंसेने एकदा प्रवेश केला तर ती आपली पाळंमुळं पसरत राहील. अशा नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे हे मुलींनाही कळायला हवं.