यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा, आठ वर्ष जुने आहे प्रकरण

शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:09 IST)
महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारणे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांना भोवले आहे.  
 
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती