वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून शाहरूखचा सन्मान

बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:26 IST)
बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरूख खान मनोरंजनासोबतच सामाजिक कार्यातही पुढे असतो हे अनेकांना माहीत आहे. कॅन्सरग्रस्त मुले, अ‍ॅसिड हल्ला पीडितांसह समाजातील अनेक गरजूंना शाहरूख नेहमीच सढळ हस्ते मदत करत
असतो. महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या शाहरूखला त्याच्या या योगदानासाठी 'वर्ल्ड इकॉनॉकिम फोरम'कडून दिल्या जाणार्‍या 24व्या वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
शाहरूखने सुरू केलेल्या 'मीर फाउंडेशन'तर्फे अ‍ॅसिड हल्ला पीडित महिलांची मोफत चिकित्सा केली जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन दिले जाते तसेच या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतही केली जाते. 'मीर फाउंडेशन' ही इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लहान मुलांसाठी रुग्णालयात स्पेशल वॉर्ड, कॅन्सरग्रस्त मुलांसाठी वैद्यकीय व निवासाची मोफत व्यवस्था असे अनेक उपक्रमही राबवते.
 
येत्या 22 जानेवारीला स्वीत्झर्लंडमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. शाहरूखबरोबरच हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँचेट आणि प्रसिद्ध हॉलिवूड गायक एल्टन जॉन यांनाही हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती