शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले

गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (09:41 IST)
अहमदनगर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले यांना २०१४ साली भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आहे. सध्या मोदी मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.
 
रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला भेट दिली. विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी ते संगमनेर तालुक्यात आले होते. यावेळीच त्यांनी त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांना शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे.
 
२००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी रामदास आठवले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता. शिर्डी हा मतदार संघ त्यावेळी आघाडीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक मतदार संघ मानला जात होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती