२ लाख मुंबईकरांच्या सूचना गोळा करणार-आशिष शेलार

मंगळवार, 26 मार्च 2024 (09:42 IST)
मुंबई भाजपने १५ मार्चपर्यंत नागरिकांकडून २ लाख सूचना गोळा करण्याचा निर्धार केला आहे.
दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी विकसित भारत संकल्प पत्र अभियानाची माहिती दिली. अन्य राजकीय पक्षांपेक्षा भाजपने निवडणूक प्रचाराच्या तयारीत प्रचंड आघाडी घेतल्याचे सांगून शेलार म्हणाले, विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-अपेक्षांचे चित्र उमटावे म्हणून मुंबईकरांकडे जाऊन दोन लाख सूचना गोळा करणार आहे.
 
समाजाच्या सर्व घटकांमधून या सूचना संकलित केल्या जाणार आहेत. या मोहिमेत मुंबईतील मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आघाडीवर असतील. तसेच  सर्व रेल्वेस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी सूचना पेटी ठेवण्यात येणार आहेत. भाजपचे पदाधिकारी घरोघरी जाऊनही सूचना गोळा करणार आहेत. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, वकील, शिक्षक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल्स, व्यापारी, गायक, अभिनेता, खेळाडू, अभियंते, माजी सैनिक, पत्रकार आदी मान्यवर घटकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक लोकसभा विधानसभा क्षेत्रातून संकलन पेटीच्या माध्यमातून सूचनांचे संकलन केले जाईल, असे शेलार म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती