काय सांगता ! शनिदेवाला देखील चोरट्यांचा फटका !

सोमवार, 12 जुलै 2021 (15:53 IST)
अहमदनगर कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य हतबल झाले आहेत.त्यात परत वाढती महागाई या एकापाठोपाठ आलेल्या संकटाने पुरते वेढलेले असताना आता चोरट्यांनी अनेक भागात धुमाकूळ घातला आहे.
 
चोरट्यांचा जसा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे तसाच आता अनेक देवस्थानाला देखील बसत आहे. इतकेच काय या चोरांनी शनिदेवाला देखील सोडले नाही. शनिमंदिरातील दानपेटीच अज्ञात चोरटयांनी लांबवली आहे.
 
ही घटना नगर शहरातील माळीवाडा परिसरात घडली आहे. शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी,चांदीची कपाळ पट्टी व डोळे,काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्‍वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला आहे.
 
या प्रकरणी मंदिराचे पुजारी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली असून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याने जाळीवरून उडी मारून मंदिरातील आतील दरवाजाचे कडीकोयंडा तोडला.
 
शनि मंदिरातील दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी, डोळे तसेच भैरवनाथ महाराज, जोगेश्‍वरी मातेचे डोळे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ करीत आहेत .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती