महाराष्ट्रात सिनेमा-नाट्यगृह सुरु करण्यासाठीचे नियम काय आहेत?
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (21:02 IST)
महाराष्ट्रातील कोव्हिडची स्थिती पाहता, राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबर 2021 पासून परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राज्य सरकारनं 25 सप्टेंबर 2021 रोजी केली होती.
मात्र, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयानं सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर कार्यक्रम सुरू करण्यासाठीचे नियम आज (12 ऑक्टोबर) जाहीर केले आहेत. कोव्हिडची स्थिती लक्षात घेऊन हे नियम बनवण्यात आलेत. त्यानुसारच कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलीय.
या नियमांचं पालन करूनच नाट्यगृह, सिनेमागृह आणि इतर कार्यक्रम सुरू करावे लागतील, अन्यथा नियमानुसार कारवाईचा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आलाय
सिनेमागृहांसाठी 'हे' आहेत नियम
कंटेन्मेंट झोनमध्ये सिनेमे दाखवता येणार नाहीत.
दोन सीट्समध्ये सहा फुटांचं अंतर असणारी आसनव्यवस्था असावी.
प्रेक्षकांना मास्कशिवाय सिनेमागृहात प्रवेश देऊ नये.
स्पर्श न करता वापरता येणारं सॅनिटायझर यंत्र प्रवेशद्वारावर आणि कॉमन एरियात असावं.
थुंकण्यास सक्त मनाई करावी.
फूड कोर्ट, सफाई किंवा इतर ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत किंवा पहिला डोस घेतला असल्यास 14 दिवसांनंतरच त्यांना कामावर घ्यावं.
मॉलमध्ये मल्टिप्लेक्स असल्यास दोन्ही डोस पूर्ण न झालेले आणि 18 वर्षांखालील व्यक्तींना परवानगी देऊ नये.
प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंगची सोय असावी.
सिनेमागृह एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्केच क्षमतेत सुरू करता येईल.