विवाहाचा मंडप उडाला, वऱ्हाडी जखमी

बुधवार, 30 मार्च 2022 (12:28 IST)
अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले आणि पाहुण्यांनी भरलेला विवाहाचा मंडप आकाशात उडाला. ही विचित्र घटना यवतमाळ तालुक्यातील भांब येथे घडली. 
 
येथील जिल्हा परिषद शाळेत एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि लग्नाचे विधी करण्यास सुरुवात झालीच होती की पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला. या विचित्र घटनेत एक चिमुकली आणि एक-एक महिला आणि पुरुषही जखमी झाले आहेत. सुदैवाने मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केला आणि मोठी हानी टळली.
 
या घटनेमुळे एकच हलकल्लोळ उडाला आणि वऱ्हाडाची पळापळ सुरु झाली. यात पाच वर्षांची चिमुकली जखमी झाली तर एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत. तसेच एक वऱ्हाडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
 
हे भयावह चित्र बघून कुणी कुणाला तुडवत स्वतःचा जीव वाचवण्याची प्रयत्न करत होते. या विवाहाला 400 हून अधिक वऱ्हाडी असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण देखील वाया गेले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती