आता विठुरायाच्या ‘ऑनलाइन दर्शना’साठी देखील शुल्क

बुधवार, 11 डिसेंबर 2019 (12:51 IST)
पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या ‘ऑनलाइन दर्शन’ सेवेसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. आजवर ही सेवा मोफत होती आता यासाठी शुल्क द्यावा लगाणार आहे. ही सेवा सशुल्क करण्यास मंदिर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. लवकरच याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. 
 
सध्या ऑनलाइन दर्शनासाठी कुठलेच शुल्क आकारले जात नाही. परंतु ऑनलाइन दर्शनसेवा घेतलेल्या भाविकांना दर्शन रांगेतील भाविकांना थांबवून अनेकदा सोडले जाते. हे प्राधान्य देण्यासाठी आता ऑनलाइन दर्शनासाठी शुल्क आकारण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
 
याशिवाय नवीन वर्षांपासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून श्री विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यावरही बंदी घालण्यात आल्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 
 
मंदिराच्या सुरक्षेसाठी तसेच मंदिरातील पावित्र्य, शांतता कायम राखण्याच्या हेतूने नवीन वर्षांपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाविकांकडून मंदिरात मोठया प्रमाणात होत असलेल्या मोबाईल वापरावर सतत नाराजी व्यक्त केली जात होती. मंदिरात आल्यावर भाविकांकडून फोटो काढणे, मोबाईलवर बोलणे या सारखे प्रकार वाढू लागल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.
 
मंदिर समितीकडून भाविकांना मोबाईल ठेवण्यासाठी ‘लॉकर्स’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती