बाप्पांला निरोप देतांना राज्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू

बुधवार, 6 सप्टेंबर 2017 (11:32 IST)

गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देतांना विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे.  

औरंगाबाद : तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी ही लहान मुले गेली असताना ही दुर्घटना घडली आहे.  तर औरंगाबादमधील दौलताबाद तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला, आकाश साठे असे या मुलाचे नाव होते.  

पिंपरी-चिंचवड :  मुळा नदीत दोन मुले बुडाली

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाली आहेत. मुळा नदीत बुडालेली ही मुलं गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे.  मुळा नदीत बुडालेल्या सोनाजी धनाजी शेळके (वय १६) आणि रखमाजी सुदामराव वारकड (१७ ) अशी दोघांची नावे आहेत.  

पुणे :  2 तरुण तलावात बुडाले
पुण्यातील वडकी येथील  तलावात दोन मुले गणपती विसर्जन करतांना बुडाली. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावे आहेत.  

नाशिकमध्येही विसर्जनाला गालबोट  

नाशिकरोड चेहेडी पंपिग स्टेशन बंधारा येथे  विसर्जजनासाठी आलेला युवक भाविक किशोर कैलास सोनार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर  विसर्जनावेळी डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू, मुंगसरे गावाजवळ गणेश मराळेचा मृ्त्यू झाला. 

याशिवाय बीडमध्ये  आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एकाचा तर जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती