विशेष करून नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून येत आहे.हे बिबटे रहदारीच्या रस्त्यावर अचानक वाहनांसमोर येत असल्याने अनेकदा बिबट्या आणि वाहनाची धडक होत असते. मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सर्वसाधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास मौजे नाशिक शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावाच्या अलीकडे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच तातडीने नाशिक वन विभागाचे पथक पोहोचले आणि बिबट्याला रेस्क्यू करून तातडीने रोपवाटिकेत दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले, मात्र तोंडाला जबर मार लागल्याने उपचार सुरु करण्याआधिच बिबट्या मृत झाला. अंदाजे ६ वर्षे वयाचा नर बिबट्या मृत्यू पावल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोस्टमार्टम करून घेण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात आली.