विखे भाजप सोडण्याच्या तयारीत?

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (16:44 IST)
परतीच्या प्रवासाची चाचपणी सुरू
महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार म्हणून विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर करणार्‍या अनेक नेत्यांची राजकीय कोंडी झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हळूहळू स्थिरावत असल्याने हे राजकीय नेते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच काही नेत्यांनी  परतीच्या प्रवासाची चाचपणी सुरू केली असून भाजप नेते राधाकृष्ण पाटील हे नाव त्यात सर्वाधिक चर्चेत आहे. राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर श्रीरामपुरात जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून हा उद्‌घाटनाचा कार्यक्रम अनेक चर्चांना तोंड फोडणारा ठरला आहे.
 
विखेंच्या श्रीरामपुरातील संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनास पक्षविरहित स्वरूप होते. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर 'चलो एक पहल की जाए... नए रस्ते की ओर...' असे एक वाक्य लिहिलेले होते. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल आहेत.
 
विखे यांच्याविरूद्ध पक्षातील पराभूत आमदारांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अद्याप सुरुच आहे. तर दुसरीकडे मधल्या काळात विखे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता हा नवा रस्ता कोणता, अशी चर्चा नगर जिल्ह्यात रंगली आहे. 
 
१५ हजारांच्या जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन   
 
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्यामुळे नागपूर कनिष्ठ न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले होते. त्यानुसार सुनावणी झाल्यानतंर १५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.
 
जामिन मिळाल्यानतंर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, १९९५ ते १९९८ च्या दरम्यान झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यावर दोन खासगी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख मी केला नव्हता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मला समन्स बजावले होते. मी हजर राहिलो. मला पीआर बाँड देऊन पुढची तारिख दिली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. सर्वच्या सर्व आंदोलनातील केस आहेत. या दोन केसचा उल्लेख करण्याचे कोणतेही कारण नव्हते.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती