‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. गोरेगाव येथील शिवसैनिक मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ‘गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतला.
आता यापुढे मी कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही. मी निखाऱ्यावर चालणार आहे. तुम्हालाही माझ्यासोबत निखाऱ्यासोबत चालावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवेल. शिवसेना महाराष्ट्रात कुठेही युती करणार नाही. यापुढे कुणासमोरही कटोरं पसरणार नाही, असेही ते म्हणाले. ‘राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणा. हिम्मत असेल तर राज्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना कॅबिनेटच्या बैठकीत घ्या, पत्रकारांना बोलवा, लोकायुक्तांनाही बोलवा मग घोटाळ्याचे आरोप होणार नाही, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे. शरद पवार यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचा उल्लेख करून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘ देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार ‘गुरूदक्षिणा’ म्हणून दिला गेला अशी चर्चा आहे.’ असे त्यांनी सांगितले.